सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत कालभैरव दर्शनाची सहल संपन्न!

मुंबई (मोहन सावंत):- कोकणासह महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानासह विश्वात राहणाऱ्या सावंत-पटेल भावकीची कुलस्वामिनी श्री गढकालिका माता (धार-उज्जैन), कुलदैवत महाकाल (उज्जैन) दर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला. सन्माननीय श्री. बी. डी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली गेली आठ वर्षे अशाप्रकारे दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२३ दरम्यान मुंबई ते मध्यप्रदेशातील उज्जैन आणि त्यांनतर उज्जैन धार येथे जाऊन कुलाचार दर्शन सोहळा झाला. यावर्षी सावंत-पटेल समाजातील २३० बांधव-भगिनींनी ह्या यात्रेमध्ये सहभाग घेतला.

१७ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई येथून निघून शनिवार १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्व बांधव-भगिनींनी उज्जैन येथील श्रीगढकालिका मातेचे दर्शन, श्री कालभैरव दर्शन, श्री महाकाल दर्शन, श्री हरसिद्धी माता दर्शन व दिपआरतीमध्ये भक्तिभावाने सहभाग घेतला.

१८ नोव्हेंबर २०२३ रोजी उज्जैन येथून धार येथे प्रस्थान करून श्रीमातेचे गढकालिका दर्शन घेऊन सामुदायिक अभिषेक केला. यावेळी माजी आमदार विजय सावंत आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सुवासिनींनी श्री गढकालिका मातेची ओटी भरून आशीर्वाद घेतले. दुपारी सर्व बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सोमवार २० नोव्हेंबर २०२३ रोजी वैयक्तिक देवदर्शन करून बांधवांनी खरेदीचा आनंद घेतला. असा हा भरगच्च आणि सुनियोजित कार्यक्रम बी. डी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुहास सावंत, श्याम सावंत आणि इतर स्वयंसेवक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. खूप सुंदर नियोजन आणि उत्कृष्ट राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सहभागी झालेल्या सर्व बांधव भगिनींनी ह्याबाबत समाधान व्यक्त करून बी. डी. सावंत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

आज अनेक लोक आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवताचा शोध घेण्यासाठी आटापिटा करीत असतात. आपले पूर्वज कोण? हे जाणून घेण्यासाठी व खरी वंशावळ मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी फिरताना दिसतात. कुलदेवी, कुलदैवत आणि वंशावळ हे संशोधन बी. डी. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कित्येक वर्षे अपार मेहनत व संशोधनपर अभ्यास करून सर्व सावंत-पटेल बंधू भगिनींसाठी खुले केले आहे. एवढेच नाहीतर मध्यप्रदेशमधील उज्जेन आणि तिथूनच सुमारे १०० किलोमीटरवर असलेल्या धार गावातील कुलस्वामिनी श्री गढकालिका माता आणि कुलदैवत महाकाल (उज्जेन) यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आजपर्यंत अनेकदा आध्यात्मिक सहलीचे यशस्वीरीत्या आयोजन केलेले आहे.

२००७ पासून हे सर्व महत्वाचे कार्य बी. डी. सावंत आणि त्यांच्या सहकारी करीत असून २०१२ पासून सावंत- पटेल उत्कर्ष मंडळाच्यावतीने सर्व सावंत- पटेल भावकीला संघटित करण्याचे कार्य केले जात आहे. सावंत- पटेल उत्कर्ष मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, शेती विकासासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत; अशी माहिती बी. डी. सावंत यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

You cannot copy content of this page