शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे निर्णय घेऊ नयेत!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात श्रीगणेशोत्सव कसा साजरा करावा? परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींसाठी विलगीकरणाचा कालावधी किती असावा? कोरोनाची चाचणी कोणी करावी? ती चाचणी निगेटिव्ह आल्यास किती दिवसाचे गृह विलगीकरण करावे? आरती, भजन कसं करायचं? आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढायची की नाही? अशा अनेक नियमांचे विवेचन करण्यात आले आहे. हेच नियम प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणार असून ते गावातील प्रत्येक वाडीला कायद्याने बंधनकारक असतील. तरीही सिंधुदुर्गातील काही गावातील काही वाडीतील तथाकथित पुढाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे नियम लादले आहेत.

१) शासनाने परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींसाठी १० दिवसाचे गृहविलगीकरण करण्याचा नियम जाहीर केला असताना १४ दिवसाचे गृहविलगीकरण करण्याचा तोंडी आदेश काढण्यात आला आहे.
२) वाडीतील-गावातील लोकांची काळजी असल्याने गृहविलगीकारणाचे ४ दिवस वाढविले; असे एक वेळ मानले तर श्रीगणेशोत्सवात वाडीत प्रत्येकाच्या घरी पन्नास ते शंभर लोकांनी एकत्र जाऊन भजन करण्याचा अट्टाहास का? शासनाने श्रीगणेशाची आरती कुटुंबापुरती मर्यादित ठेवावी; असे जाहीर केलेले असताना अशा पद्धतीने लोक एकत्र जमल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक नाही का?
३) मिरवणूक न काढता श्रीगणेशाचे आगमन आणि विसर्जन करणे, घरगुती गणेशोत्सव घरातीलच मंडळींपुरता मर्यादित ठेवणे, आरती, भजन किंवा इतर कार्यक्रम फक्त घरातील कुटुंबापुरते मर्यादित ठेवणे; अत्यावश्यक असताना अनेकांनी एकत्र येऊन आरती करणे, भजन करणे, इतर कार्यक्रम घेणे, सभा घेणे कायद्याचे उल्लंघन आहे. जर कोणी ह्या नियमाच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधी कायदेशीर कारवाई होऊ शकते.
४) शासनाने परजिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींसाठी १० दिवसाचे गृहविलगीकरण करण्याचा नियम जाहीर केला असताना १४ दिवसाचे गृहविलगीकरण करण्याचा तोंडी आदेश काढायचा आणि अशा चाकरमान्यांच्या घरी भजन न करण्याचा निर्णय घ्यायचा; हे अनुचित असून हा वाळीत टाकण्याचाच गंभीर प्रकार आहे.
५) आजूबाजूच्या गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडलेले असताना आणि अशा रुग्णांशी थेट संपर्कात आलेल्यांना फक्त चार-पाच दिवसांचे गृहविलगीकरण मान्य करायचे आणि थेट त्याने वाडीच्या भजनात येऊन बसायचे; त्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा नाही; कारण तो चाकरमानी नाही. (तथाकथित पुढाऱ्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना कोरोना होत नसावा बहुतेक) कोरोनाबाधित रुग्णांशी थेट संपर्क आलेल्या व्यक्तीची चाचणी आवश्यक असताना त्याला विलगीकरणाचे नियम का नाहीत? चाचणी न करता त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली, असं मुद्दाम का खोटं बोललं जात आहे?
६) एकत्र आल्याने कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्याने होतो, हे जगातील वैद्यकीय तज्ञ ओरडून सांगताना; भजनासाठी एकत्र येणे जीवघेण्या गंभीर संकटाला सामोरं जाण्यासारखं आहे. वाडीत अनेक घरात वृद्ध, लहान मुले, गरोदर महिला, इतर गंभीर आजार असलेले अनेक व्यक्ती असतात. त्यांचा विचार करायलाच पाहिजे.
७) गेले पाच महिने प्रत्येकाने कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. जर वाडीतील सर्व लोकांनी एकत्र येऊन भजन- आरती केली आणि जर दुर्दैवाने वाडीत एकदा रुग्ण कोरोनाबाधित आढळला तर काय दुष्परिणाम होईल? संपूर्ण वाडीला त्याचा नाहक त्रास भोगावा लागेल. ह्याचा विचार करायला नको का?
८) कोरोना महामारीच्या काळात शासनाचे नियम पाळायलाच पाहिजेत. ते नियम पायदळी तुडविण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण कोरोनाचा प्रसार तीव्र गतीने होईल.
९) गावच्या सरपंचांनी अशा अयोग्य-अनुचित, नियमांना हरताळ फासणाऱ्या व्यक्तिंविरोधात पोलीस स्टेशनसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

म्हणूनच सिंधुदुर्गातील असलेल्या गावातील वाड्यांनी भजन, आरतीसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करू नये; असे आमचे आवाहन आहे. कोरोनाचे संकट अधिकाधिक ग्रामीण भागात पसरत असताना आपण सर्वांनी काळजी घ्यायलाच पाहिजे. कमीतकमी वेळा एकमेकांशी संपर्कात राहावे. त्यातच आपल्या सर्वांचे भले आहे. सिंधुदुर्गातील अनेक गावच्या लोकांशी बोलताना काही खटकणारे मुद्दे लक्षात आले आणि ते ह्या लेखात मांडले आहेत. सिंधुदुर्गात कोरोनाचा कमीतकमी प्रसार व्हावा; हीच लेख लिहिण्यामागील सदिच्छा!

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

-मोहन सावंत

You cannot copy content of this page