जादूई बोटं

माझ्या आवडत्या युवा संवादिनी वादकांमध्ये ओंकार अग्निहोत्री हे नाव अगदी आवर्जून माझ्याकडून घेतले जाते. स्वतंत्र संवादिनी वादनासोबतच साथसंगतीचे कौशल्य ओंकार ला एक प्रतिभावंत कलाकार म्हणून स्थापित करते. इंडियन कउन्सिल फोर कल्चरल रिलेशन्स (ICCR) या भारत सरकारच्या पॅनलवर ओंकार ची वयाच्या 21 व्या वर्षी कलाकार म्हणून निवड झालेली आहे. तसेच तो ऑल इंडिया रेडिओ चा ग्रेडेड आर्टिस्ट आहे.

आजोबा पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांच्याकडून आलेला संगीताचा वारसा ओंकार आपल्या कलेतून पुढे चालवत आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून त्याने संवादिनी वादन आणि शास्त्रीय गायन शिकण्यास प्रारंभ केला. त्यानंतर पुढील बारा वर्षे ओंकार सूरलयरत्न पंडित विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडून संवादिनेची शिक्षण गुरुकुल पद्धतीने घेतले आणि अजूनही तो कान्हेरे गुरुजींकडून तालीम घेत आहे. तसेच मेवाती घराण्याचे खलिफा उस्ताद सिराज खान यांच्याकडूनही सांगीतिक तालीम त्याची सुरू आहे. शास्त्रीय संगीता सोबतच पियानो व कीबोर्ड याचे शिक्षण ओंकार ने अद्वैत बिवलकर आणि निलेश देवस्थळी यांच्याकडून घेतले.

2017 सालाच्या ऑल इंडिया रेडिओ च्या स्पेशल प्राईज चा तो मानकरी ठरला त्याकरिता त्याला ए आय आर ची ‘बी’ ग्रेड मिळाली.

झी युवा वाहिनी वरील संगीत सम्राट या रियालिटी शोमध्ये ओंकारने 2017 साली भाग घेतलेला. या सीझनमध्ये तो एकमेव संवादिनी वादक निवडला गेला होता. संगीत सम्राट त्या पर्वात ‘चमकदार 24’ मध्ये ओंकारची त निवड झाली होती. त्याला ‘परफॉर्मन्स ऑफ द डे’ हा किताब संगीत सम्राटमध्ये मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्याकडून मिळाला होता.

मिर्झापूर 2 या ॲमेझॉन प्राईम च्या गाजलेल्या वेबसीरीज मध्ये 2 गाण्यासांठी ओंकारने हार्मोनियम वाजवलेली आहे. ओंकारने 2 बिग बझारच्या टेलिव्हिजन कमर्शियल ऍडव्हर्टाईस साठी जिंगल्स वाजवले आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील एकदम कडक या कार्यक्रमात ओंकारने संवादिनी वादक प्रस्तुत केले होते. साम मराठी, टीव्ही नाईन मराठी, झी न्यूज, लोकशाही न्यूज, न्यूज 18 लोकमत या मराठी चॅनल वरही बऱ्याच कार्यक्रमांमध्ये ओंकार चा सहभाग होता.

ओंकार ची स्वतंत्र संवादिनी वादनावर खूप चांगल्या प्रकारे हुकुमत आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुंदगोळ, कर्नाटक श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान, भीमसेन महोत्सव गदग, गंधर्व महाविद्यालय पुणे, ऑल इंडिया कीबोर्ड इंस्ट्रूमेंट फेस्टिवल, पंडित नाथ नेरळकर फाउंडेशन प्रस्तुत बाल संगीत संमेलन अशा अनेक ठिकाणी ओंकारने स्वतंत्र संवादिनी वादन प्रस्तुत केले आहे. सोलो हार्मोनियम वादनासोबतच त्याने अनेक ज्येष्ठ कलाकारांना साथसंगत केली आहे जसे की पंडित अरविंद मुळगावकर, पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार, पंडित अजय पोहनकर, विदुशी शुभडा परडकर, पद्मश्री विदुषी सुमित्रा गुहा, पद्मश्री विदुषी शोमा घोष, विदुषी अर्चना कान्हेरे, पंडित राम देशपांडे, शाल्मली जोशी, पंडित सुरेश बापट इत्यादी. तसेच युवा पिढीतील अनेक प्रतिभावंत कलाकार डॉक्टर सलील कुलकर्णी, सायली तळवलकर, निराली कार्तिक, यशवंत वैष्णव, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, अंजली गायकवाड या कलाकारांनाही त्याने संवादिनी साथसंगत केली आहे. उपशास्त्रीय कलाकारांपैकी आर्या अंबेकर, शरयू दाते, नचिकेत लेले, सावनी रविंद्र, रोंकिणी गुप्ता, श्रीनिधि घटाटे, गायत्री अशोकन अशा अनेक गायकांना ओंकार ने संवादिनी साथ केली आहे. सुषमा देशपांडे, अमोल बावडेकर, प्रभाकर मोरे, शशीकांत केरकर, प्रसाद खांडेकर, श्वेता पेंडसे, नंदिता पाटेकर इत्यादी टीव्ही अभिनेत्यांसोबत सुद्धा ओंकारने अनेक कार्यक्रमांमधून सांगीतिक प्रस्तुती केलेली आहे. पंडित राजेंद्र गंगानी, निकिता बाणावलीकर अशा कथक कलाकारांसोबत ओंकार ने आपली कला पेश केली आहे.

हृदयेश आर्ट्स अवॉर्ड, पंडित जितेंद्र गोरे स्मृती पुरस्कार, सिटी एनसीपीए स्कॉलरशिप, महाराष्ट्र गव्हर्मेंट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी स्कॉलरशिप, भारतीय युथ फेस ऑफ इंडिया, आर्टबिट्स फाउंडेशन महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने ओंकारला गौरविण्यात आले आहे. कोरोनाच्या या काळात ओंकार च्या युट्यूब चॅनल (Omkar Agnihotri Officials) वरून ही त्याच्या ओरिजिनल कंपोजिशन्स चा आनंद रसिकांना घेण्यात आला.

अशा या गुणी संवादिनी वादकाला भरभरून शुभेच्छा. त्यांची सांगीतिक कारकीर्द अशीच बहरत राहो. आपल्या संगीतातून त्याने अनेकानेक रसिकांना आनंद मिळो हीच सदिच्छा. येत्या नवीन वर्षात ओंकारकडून अशीच छान सांगीतिक पर्वणी आम्हा रसिकांना मिळो.

– मयुर कुलकर्णी, कोळोशी
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.
मोबा. 7397935542

You cannot copy content of this page