रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!
श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!
आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हटला की मित्रमंडळींना पार्टी देणं, मौजमस्ती करणं आलंच! ह्यात काही वाईट नाही; पण तोच वाढदिवस जेव्हा सामाजिक बांधिलकी स्वीकारून केला जातो तेव्हा त्याचे मोल अनमोल होते. ते कार्यही समाजासाठी आदर्शवत ठरते. तो वाढदिवसही खऱ्याअर्थाने सार्थकी लागतो. सन्मानिय संतोष वाळके यांनी आपला पन्नासावा वाढदिवस सामाजिक बांधिलकी स्वीकारून केल्याने त्यांचे विशेष कौतुक वाटते.
काल श्री. संतोष वाळके यांनी आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते. त्या रक्तदान शिबिरात ३३ जणांनी रक्तदान करून श्री. संतोष वाळके यांच्या हितचिंतकांनी सामाजिक आदर्श जपला. एस. एस. पी. एम, मेडिकल कॉलेज आणि लाइफटाईम हॉस्पिटल ब्लड सेंटर (पडवे, ता. कुडाळ) ह्या रक्तपेढीमार्फत झालेल्या रक्तदान शिबिरास अनेक राजकीय – सामाजिक व्यक्तींनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्यात.
रुग्णालयांमध्ये उन्हाळ्यामध्ये रक्ताची कमतरता भासत असते. जर रुग्णांना वेळेवर रक्त मिळाले नाहीतर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते. एका रक्तदात्याने दान केलेले रक्त सुमारे तीन रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. रक्त कृत्रिम पद्धतीने तयार होत नाही. त्याचप्रमाणे रक्तदान करणाऱ्याला ते रक्त कोणाला वापरले हे समजत नाही. त्यासाठी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदानाला जसे सामाजिक महत्व आहे तसं आध्यात्मिकही महत्व आहे. म्हणून वाढदिवसाला रक्तदान शिबीर घेऊन ते यशस्वी करण्याचे परमभाग्य श्री. संतोष वाळके यांना लाभले. म्हणून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
श्री. संतोष वाळके नेहमीच सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजसेवा करीत असतात. गावाच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. केंद्रीयमंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या कायम संपर्कात राहून श्री. संतोष वाळके आपल्या पंचक्रोशीत विकासाबाबत कार्य करीत असतात. शासकीय नोकरीत असूनही त्यांचे सामाजिक कार्य नियमित सुरु असते. अशा समाजसेवा करणाऱ्या आमच्या मित्राला पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! रक्तदान शिबीर यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
श्री. संतोष वाळके आणि त्यांच्या कुटुंबियांना सदृढ आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो! ही सदिच्छा!
-नरेंद्र हडकर