समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!

सतराव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाला भारतीय मतदारांनी भरघोस दान दिले. सलग दुसऱ्यांना बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असून भारतीयांना अभिमान वाटेल असं त्यांच्याकडून कार्य होईल; अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक अभिनंदन!

लोकसभेचे निकाल पाहता मतदारांना आपली बाजू समर्थपणे समजावून सांगण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे भारताला सर्वच पातळीवर यशस्वी आघाडी घेण्याचे दिव्यत्व मोदी यांच्या नेतृत्वाखाली येईल; अशी आशा आहे.

मागील पाच वर्षात मोदी सरकारने धडाकेबाज योजना आणल्या; हे जरी सत्य असले तरी अनेक प्रश्न निर्माण झाले, ते प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी त्या अनुत्तरित प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणे महत्त्वाचे आहे.

जागतिक पातळीवर मोठ्या उलाढाली होत असताना भारताला समर्थ नेतृत्वाची आवश्यकता होती; ती भारतीयांनी सहजतेने उपलब्ध करून दिली. जग तिसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभिक भीषणतेचे चटके सोसत असताना भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या वणव्यात भारताचे कमीत कमी नुकसान कसे होईल आणि भविष्यात भारत जगात कसा सुस्थिर होईल? यासाठी विशेष योगदान पंतप्रधान मोदी यांना द्यावे लागणार आहेत.

देशात अनेक कारणांनी आर्थिक मंदी आल्याने रोजगार निर्मितीत अडथळे निर्माण झाले आहेत. युवकांच्या हाताला काम नाही. शेतकरी अतिशय संकटात आहे. दुष्काळाने देशातील ४० टक्के भाग होरपळून निघत आहे. गरीब कष्टकरी जनता हलाखीचे जीवन जगत आहे. अद्यापही शिक्षण आणि आरोग्य संपन्नता आलेली नाही. या सगळ्या गंभीर समस्यांवर मात करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे.

२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले; तेव्हा सुद्धा त्यांचे अभिनंदन करताना देशातील प्रशासकीय कारभार सुधारण्याची अपेक्षा बाळगल्या होत्या. परंतु त्यात म्हणावी तशी सुधारणा झालेली नाही. राज्यकर्त्यांच्या मनात मतदारांचे कल्याण करण्याऱ्या कितीही योजना असल्या तरी प्रशासनातील अधिकारी चाकोरीबाहेर जाऊन काम करण्यास तयार नसतात. त्यामुळे शासनाच्या अनेक जनकल्याणाच्या योजनांचा बट्ट्याबोळ होतो म्हणूनच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

भारताची लोकसंख्या ही जगात दोन नंबरची आहे. त्यात सुशिक्षित युवकांचा भरणा अधिक आहे. देशाच्या विकासासाठी त्यांचा सहभाग वाढविण्याचे कौशल्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना करावे लागणार आहे.

निवडणुकीचे आव्हान लीलया पार पडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला समर्थ करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना आखतात? ते महत्त्वाचे आहे. अशा उपाययोजना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली समर्थपणे आखल्या जाव्यात; तसेच देशाचा स्वाभिमान, देशाची सुरक्षा, देशाचा विकास आणि देशातील संघभावना-एकोपा अबाधित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश लाभो; ही आदिमाता जगदंबेच्या चरणी प्रार्थना!

समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *