संपादकीय… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा अभिनंदन!
भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांनी सत्ता बहुमताच्या जोरावर प्रभावी केली. तो प्रभाव जेवढा सकारात्मक होता त्याहीपेक्षा कमी प्रमाणात नकारात्मक होता. म्हणूनच तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदींना इतर पक्षांच्या साहाय्याने सत्तेत यशस्वी व्हावे लागले. गेल्या दहा वर्षात लोकसभेत विरोधी पक्ष होण्याएवढे बळ काँग्रेसला देण्याचे मतदारांनी नाकारले होते; आता मात्र त्याच काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यास समर्थ केले. हीच लोकशाहीची ताकद आहे. सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षाला काय वाटते ह्यापेक्षा मतदारांना काय वाटते? हे लोकशाहीत महत्वाचे ठरते. त्याहीपेक्षा भारतीय संविधानाचे ते सामर्थ्य आहे.
गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनेक चांगली कामे झाली; त्याचप्रमाणे अनेक वाईट कामांचा दुष्परिणाम दिसून आला. ह्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता जनतेच्या विकासासाठी अग्रक्रम दिला पाहिजे. धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होणार नाही, ह्याची दक्षता घेतली पाहिजे. जो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो त्याला गद्दार, देशद्रोही ठरविणे पूर्णतः थांबले पाहिजे. शेतकऱ्यांच्या आणि महिला खेळाडूंच्या आंदोलनातून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बाजू मांडणाऱ्या नेत्यांनी उधळलेली मुक्ताफळे भारतीय मतदार विसरणार नाहीत. मणिपूर शांत करण्यास आलेल्या अपयशामुळे आणि महाराष्ट्रात मराठा आंदोलनाकडे केंद्राने केलेल्या दुर्लक्षामुळे सत्ताधारी मागे खेचले गेले. हे निवडणुकीच्या आकडेवारीने मुळीच नाकारता येणार नाही. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ह्यातून सकारात्मक तोडगा काढावाच लागेल. बेरोजगारी, महागाई, कोमात गेलेली आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ निर्णय घ्यावे लागतील.
आज देशाची लोकसंख्या जगात पहिल्या क्रमांकावर वर पोहचली असताना भारतीय अर्थव्यवस्था सुद्धा जगात पाचव्या क्रमांकावर पोहचलेली आहे. देश आयटी-सॉफ्टवेअर, अंतराळ क्षेत्रात प्रगतीपथावर असताना दुसरीकडे ८० कोटी जनतेला ५ किलो धान्य मोफत देण्याच्या योजनेसाठी सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. कारण ८० कोटी जनतेला ५ किलो धान्य मोफत देण्याच्या अवस्थेतून सुधारण्यासाठी गेल्या दहा वर्षात प्रयत्न झाले नाहीत; असा त्याचा दुसरा अर्थ निघतो. तरीही ३७० कलमाबाबत असो वा श्रीराममंदिराबाबत सत्ताधाऱ्यांनी दाखविलेली तत्परता कायमच स्मरणात राहील. ह्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला द्यावेच लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करताना प्रशासकीय व्यवस्था प्रामाणिक, कार्यक्षम आणि जबाबदारी स्वीकारणारी करायला पाहिजे; ज्यामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाचे सत्ताधारी यशस्वी झाले नाहीत; हे खेदाने म्हणावे लागते. प्रशासनाने केलेल्या खराब कामगिरीचा फटका पाच वर्षांनी सरकारला बसत असतो. म्हणूनच प्रशासनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठोस भूमिका घ्यावी लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा अभिनंदन करताना काही मुद्दे त्रोटकपणे मांडणे गरजेचे वाटले. तरीही पुढील पाच वर्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमच्या खूप खूप शुभेच्छा!
-नरेंद्र हडकर