संपादकीय- सामान्यांना संकटात टाकणारा रिक्षा बंद यापुढे होता कामा नये!

काल रात्री उशिराने सोशल मीडियावरून बातमी आली की, उद्या म्हणजे २१ नोव्हेंबरला संपकरी एसटी कामगारांना पाठींबा देण्यासाठी रिक्षा, सहा सीटर, मॅझिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक कणकवली तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत दुसरी बाजू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकवेळी `बंद’ ठेऊन गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक मालकांना आणि जिल्ह्यातील प्रवाशांना वेठीस धरणे अयोग्य असून त्याचा संघटनांनी आणि प्रशासनाने जरूर विचार करावा. उद्याचा बंद हा चुकीचा असून तो होऊ नये म्हणून बंद पुकारलेल्या संघटनेने आणि शासनाच्या पोलीस यंत्रणेने, परिवहन खात्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

एसटी कामगारांना न्याय मिळायला हवा; ह्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहेच आणि ती प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. त्यासाठी रिक्षा बंद पुकारणाऱ्या संघटनांनी एसटी कामगारांना पाठींबा देणारे पत्र द्यावे, (सिंधुदुर्गात अनेक सामाजिक संघटनांनी एसटी कामगारांना पाठींब्याची पत्रे दिली आहेत. जिल्हा रिक्षा संघटना आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग यांनीही पाठींब्याची पत्रे संपकरी एसटी कामगारांना सुपूर्द केली आहेत. हा योग्य मार्ग आहे.) एसटी कामगारांबरोबर धरणे आंदोलनात सहभाग घ्यावा, आंदोलन करणाऱ्या एसटी कामगारांना आर्थिक मदत करावी, मोर्चा काढावा, लाक्षणिक उपोषण करावं! एसटी कामगारांना पाठींबा देण्याचे असे अनेक मार्ग असताना जिल्ह्यातील गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक मालकांना आणि जिल्ह्यातील प्रवाशांना वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आणि अन्यायकारक आहे.

ह्यासंदर्भात रिक्षा चालक मालक संघटनेचे माजी पदाधिकारी, रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नांचे अभ्यासक, सामाजिक नेते आणि ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सन्मानिय संतोष नाईक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. “बंद करून प्रवाशांचे हाल होणार आहेत, त्याचा सर्वाधिक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास वृद्धांना, महिलांना, रुग्णांना होणार आहे. हे योग्य नाही. मानवाचे अधिकार शाबूत ठेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यास आमचाही पाठींबा मिळेल; परंतु प्रवाशांचे हालअपेष्टा होता कामा नयेत. एसटी कामगारांचा प्रश्न हा राज्यव्यापी, शासनाच्या धोरणात्मक निर्णयाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. हे लक्षात घेऊन तालुक्यात आणि जिल्ह्यात रिक्षा बंद ठेवल्यास ते उचित होणार नाही!” असे मत संतोष नाईक यांनी मांडले.

 

कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा आणि खाजगी प्रवासी वाहन चालक मालक यांची आर्थिक परिस्थिती एसटी कामगारांनापेक्षा अत्यंत हलाकीची झाली आहे. गेल्या दीड वर्षात त्यांच्या डोक्यावर प्रचंड कर्ज झालेले आहे. बँकांचे हप्ते थकले आहेत, इंधनाचे दर प्रचंड वाढल्याने व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा परिस्थितीत प्रवासी वाहतूक नुकतीच पूर्वपदावर येत असताना `बंद’ करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना वेठीस धरल्यासारखे आहे; म्हणून उद्याचा बंद संबंधितांनी मागे घ्यावा अन्यथा प्रशासनाने हस्तक्षेप करावा; अशी अनेक रिक्षा चालक मालकांची मागणी आहे.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक मालक अनेक समस्यांतून मार्ग काढत असताना कधीही कोणीही त्यांना मदतीचा हात दिला नाही, सहकार्य केले नाही. गरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य असणारा रिक्षा चालक मालक आर्थिक ओझ्याखाली दबलाय! तरीही तो प्रवाशांची सेवा करतोय. एसटी सेवा पूर्णपणे ठप्प असताना तो प्रवाशांची नेआण करतोय, शेकडो आजारी व्यक्तींना रुग्णालयात घेऊन जातोय, वृद्धांना, महिलांना, बालकांना अत्यावश्यक प्रवास घडवतोय. जर रिक्षा, सहा सीटर, मॅझिक चालक मालकांनी ही सेवा दिली नसती तर उपचाराविना खेड्यापाड्यातील गरीब लोक मेले असते. हे लक्षात घ्यायला हवे. उद्या बंद झाला आणि आजारी माणसाला रुग्णालयापर्यंत रिक्षाच्या माध्यमातून पोहचता आले नाही तर त्याचा जीवही जाऊ शकतो. असा विचार करणेही माणुसकीला काळिमा फासण्यासारखे आहे. म्हणूनच उद्याचा पुकारलेला बंद मागे घ्यावा; अशी अपेक्षा कणकवली तालुक्यातील सर्व रिक्षा, सहा सीटर, मॅझिक चालक मालकांची आणि सामान्य प्रवाशांची आहे.

ह्या लेखात आम्ही कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. त्यात आम्हाला स्वारस्य नाही. पण गरीब, कष्टकरी रिक्षा, सहा सीटर, मॅझिक चालक मालकांची न्याय बाजू घेण्यासाठी आम्हाला राजकीय भाष्य करावे लागेल. राजकारणातून सामान्य माणसाचे भले होत नाही; हा गरीब कष्टकरी जनतेतील समज अधिकाधिक दृढ होत आहे. आतातरी राजकीय नेत्यांना शहाणपण यायला नको का? तूर्तास प्रवासी वाहतूक बंद ठेवता कामा नये; एवढंच आमचं म्हणणं आहे.

कणकवली तालुक्यातील पुकारलेल्या बंदमध्ये जे रिक्षा, सहा सीटर, मॅझिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणारे चालक-मालक सहभागी होणार नाहीत त्यांना पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कार्यवाही करावी; अशी अनेकांची मागणी आहे आणि ती रास्तच आहे.

परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!

You cannot copy content of this page