परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!
सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांचे प्रतिपादन
कणकवली (प्रतिनिधी):- “परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा येईल आणि महागाईत होरपळणाऱ्या जनतेचे हाल होतील. त्यामुळे परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा एक दिवसही बंद करण्यात येऊ नये!” असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय – हक्क – अधिकार या अनुषंगाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या रास्त असून त्यांची पूर्तता होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्यशासनाने तात्काळ सकारात्मक विचार करून नियमोचित निर्णय घेणे आवश्यक आहे; परंतु असे होत नसल्याने एस टी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला राज्यव्यापी संप व आंदोलन हे समर्थनीयच मानावे लागेल. त्यामुळेच समाजातील विविध पक्ष व संघटनांसह विविध स्तरांतून एस टी कर्मचाऱ्यांच्या संप व आंदोलनास जाहीर पाठींबा देखील मिळत आहे.
तथापि, सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली एस टी बस प्रवासी वाहतूक सेवा ही मागील काही दिवस बंद असल्याने आधीच महागाईच्या भस्मासुरात होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. असे असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या संप व आंदोलन काळात पर्यायी प्रवासी वाहतूक सेवा म्हणून परवानाधारक तीन व सहा आसनी रिक्षा व्यावसाईकांनी सर्वसामान्य जनतेस माफक दरात सुविधा उपलब्ध करून दिल्याने नक्कीच सर्वसामान्य जनतेस कुठेतरी थोडाफार दिलासा मिळाला आहे.
आजही ग्रामीण भागातील परिस्थिती लक्षात घेता एस टी इतकीच व वेळप्रसंगी सहज उपलब्ध होणारी परवानाधारक तीन व सहा आसनी रिक्षा ही सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेली आहे. त्यामुळे एस टी बस प्रवासी वाहतूक सेवा बंद असताना एस टी कर्मचाऱ्यांच्या संप व आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी परवानाधारक तीन व सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा एक दिवस देखील बंद राहिल्यास सर्वसामान्य जनतेचे जनजीवन निश्चितच विस्कळीत होणारे आहे.
जर अशा पद्धतीने सर्व परवानाधारक अधिकृत प्रवासी वाहतूक सेवा देणारी यंत्रणा बंद राहिल्यास व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक मूलभूत सोई – सुविधा उपलब्ध न झाल्यास व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणत्याही हानीस अथवा असुविधेस सामोरे जावे लागल्यास सदरची बाब मानवी अधिकारांवर गदा आणणारी ठरणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित शासन आणि प्रशासनाची असणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांच्या प्रतिक्रियेवर अनेक परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक चालक मालकांनी आणि सामान्य प्रवाशांनी सहमती दर्शविली आहे.
हेही वाचा- संपादकीय- सामान्यांना संकटात टाकणारा रिक्षा बंद यापुढे होता कामा नये!