संपादकीय… सामंजस्यता महत्वाची!

युद्ध, दंगल, हाणामारी यामधून दोन्ही बाजूंची हानी होते. दोन देशांमधील युद्धाने दोन्ही देशांची जी अपरिमित हानी होते त्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वाधिक भरडला जातो तो सर्वसामान्य गरीब, कष्टकरी माणूस आणि त्याचे कुटुंबिय! दोन धर्मांमधील वाद – दंगल सुद्धा असेच दुष्परिणाम प्रकट करते. दोन व्यक्तींमधील भांडण दोघांच्याही विकासाला मारक ठरते. म्हणून दोन धर्मांमधील, जातीमधील, समुहामधील संवाद वाढला पाहिजे! ह्या संवादातून कोणत्याही समस्येवर सहजपणे मार्ग सापडू शकतो; पण त्यासाठी दोन्ही बाजूंनी सामंजस्यता दाखविली पाहिजे! मात्र राजकीय पक्षांचा त्यामध्ये काडीचाही संबंध असता कामा नये! वादामध्ये राजकीय विचार आले की तिथे वाद शमण्याऐवजी वाढणार; हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे! या वादाचे दुष्परिणाम दोन्ही बाजूंना दीर्घकालीन त्रासदायक-तापदायक ठरतात!

सिंधुदुर्गातील असलदे गावात तसेच आजूबाजूच्या नांदगाव पंचक्रोशीत दोन्ही धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदताहेत! असे असताना पोलिसांनी असलदे गावात येऊन शांतता बैठकीचे आयोजन केले. “कोणत्याही आरोपीला जात – धर्म नसतो. `आरोपी’ हा आरोपीच असतो!” असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे अगदी बरोबर आहे. पण एखादी तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचे काम पोलीस का करतात? हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तोच आजच्या वादाचे मूळ कारण आहे. ही जबाबदारी पोलीस प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. जर तक्रारीकडे दुर्लक्ष झाले आणि उचित कारवाई झाली नाही की जो असंतोष तयार होतो, त्याचे स्वरूप गंभीर होते.

गेल्या दहा- बारा वर्षात नांदगाव पंचक्रोशीत अवैद्य दारू धंदे, मटका, जुगार या विरोधात तक्रारी करूनही पोलिसांनी नेहमीच दुर्लक्ष केला. दुर्लक्ष केल्यानंतर लोकांनी उठाव करताच दिखाऊ कारवाई करायची; हे पोलिसांचे संशय निर्माण करणारे सूत्र! ह्या कार्यपद्धतीतून एका तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून कणकवली पोलिसांनी जी चूक केली ती लोकांचा संताप वाढविणारी ठरली. योग्य वेळेत उचित कारवाईचे सूत्र पोलिसांनी पाळले नाही! (यापूर्वी नांदगाव पंचक्रोशीत काम करणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलबाबत अवैध धंद्यांबाबत अनेक तक्रारी असूनही पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली नव्हती.) आता तरी पोलिस यंत्रणेने जबाबदारीचे भान ठेवलेच पाहिजे!

ज्याप्रकारे पोलिसांनी आपल्या कर्तव्यामध्ये कुसूर करता कामा नये; त्याचप्रमाणे दोन्ही समाजाच्या लोकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. एकाने जबाबदारी टाळायची म्हटल्यावर दुसऱ्याने गप्प बसायचे का? यातूनच कुठल्याही वादाला इंधन मिळून आणि वादाचे स्वरूप कोणत्याही थराला जाऊ शकते. आमच्या पंचक्रोशीमध्ये हिंदू-मुस्लिम समाजाचे सलोख्याचे संबंध आहेत व ते तसेच ठेवण्यासाठी दोन्ही समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. साधक-बाधक चर्चा झाली पाहिजे. सुसंवाद घडला पाहिजे. पत्रकार नात्याने मी या दोन दिवसात दोन्ही बाजूच्या लोकांशी बोललो! धार्मिक द्वेषाचे विष पसरता कामा नये; एवढीच इच्छा आमची आहे; तशी ती अनेकांची आहे!

प्रेम प्रकरणातून काही विवाह ह्यापूर्वी झाले. त्यामध्ये ठराविक समाजाच्याच मुली असणे; हा वादाचा मुद्दा आहे. खरं तर प्रेमप्रकरण, विवाह व्यक्ती सापेक्ष असतात. तरीही भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून दोन्ही समाजांनी बऱ्याच गोष्टींचा साधक-बाधक विचार करावा. `प्रेम हे आंधळं असतं!’ पण धार्मिक अभिमान ती गोष्ट आंधळेपणाने घेणार नाही म्हणूनच धार्मिक तेढ संपविण्यासाठी समाज, वाडी, आणि भावकी स्तरावर सामोपचाराने निर्णय घ्यावे लागतील; जे घेतले जातात! सगळ्याच गोष्टी कायद्याने होत नाहीत. जे जुनेजाणते, अनुभव संपन्न लोक आहेत त्यांनी आता पुढे यायला पाहिजे! नांदगाव पंचक्रोशीतील विवाहाचा मुद्दा धार्मिक तेढामध्ये परावर्तित होणार नाही, ह्याची खबरदारी घ्यावी लागेल.

`धर्म ही अफूची गोळी असते!’ कार्ल मार्क्सचे हे विधान अनेकांना वादातीत वाटते; पण तत्वज्ञान शास्त्राच्या कसोटीवर ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. धार्मिकतेबद्दल स्वाभिमान जरूर असावा पण धर्मांधता गावाला-समाजाला विनाशाकडे नेणारी असते. याबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे, भविष्यात नक्कीच लिहू! पण हा स्थानिक पातळीवरील धार्मिक वादाकडे जाणारा कळीचा मुद्दा अधिक गंभीर होऊ नये; हीच माझी इच्छा व प्रामाणिक भावना आहे.

-नरेंद्र हडकर

हेही वाचा… खालील लिंकवर क्लिक करा!

(३१ जानेवारी २०२२ रोजी लिहिलेले संपादकीय…) 

असलदे वल्ली आल्ला आबाचा आज उर्स मुबारक!

You cannot copy content of this page