संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!

उद्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यापैकी एकजण निवडून येईल! जिंकणाऱ्या आणि पराभूत होणाऱ्या दोघाही सन्मानिय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवणे गरजेचे आहे. कारण ही निवडणूक पाच वर्षांसाठी असेल; एवढेच नाहीतर पुढील सहा महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कोणीही कायमचा विजयी नसतो; म्हणून जिंकून येणाऱ्याने पुढील पाच वर्षासाठी आपल्या मतदार संघात सर्वांगिण विकासाला प्राधान्य दिले पाहिजे आणि पराभूत उमेदवाराने ज्या समस्या आहेत त्यावर प्रकाश टाकला पाहिजे. हीच संसदीय लोकशाहीची ओळख असते. ती जपण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न व्हायला पाहिजेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदार संघ बॅरिस्टर नाथ पै आणि प्रा. मधु दंडवते यांचा आहे. सुरेश प्रभू यांनी तोच वारसा पुढे चालविला. प्रा. मधु दंडवते यांचा प्रचार पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. गावागावात निष्टेने काम करणारे लोक आम्ही पाहिले; मात्र त्यानंतर हळूहळू निवडणुकीत आर्थिक व्यवहार सुरु झाले. आतातर प्रत्येक गावात यादी काढून रात्रीच्या अंधारात पैसे पोहचविले जातात; हे उघड गुपित आहे. सर्वसामान्य माणसांना गावातील पुढाऱ्याने दिलेले पैसे ठेवावेच लागतात. तो ते नाकारू शकत नाही. कारण गावाचा पुढारी त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देऊ शकतो. ह्या आर्थिक व्यवहारातून नंतर जीवघेणे हल्ले प्रतिहल्ले होतात आणि त्याची दबक्या आवाजात दीर्घकाळ चर्चा सुरु राहते. पैसे देऊनही ज्या गावात मतदान होत नाही; तेथे गावातील पुढाऱ्यांची नेत्यांसमोर नाचक्की होते. निवडणूक आयोगाने स्वतःची कितीही पाठ थोपटून घेतली तरी हे आर्थिक व्यवहार होतातच! इथेच मतदार राजा हरतो! पण यंत्रणाच सडलेली असल्यावर कोणी कोणास दोष द्यावा? आतातर नवीनच ट्रेंड महाराष्ट्राच्या राजधानीपासून गावच्या गल्लीपर्यंत पोहचलाय… तो म्हणजे पक्षांतर! आता आमच्या पक्षात या आणि आठ दिवसात गावाचा विकास करून घ्या! हा विकास दिसायला छान दिसेल; पण तो खराखुरा विकास असतो का? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. निवडणुकीदरम्यान अशा अनेक गंमती घडत असतात. सर्वसामान्य मतदार लांबून मजा पाहत असतो. असो!

निवडून येणाऱ्या खासदाराकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांच्या काही मागण्या मांडाव्या लागतील!
१) मुंबई गोवा महामार्ग त्वरित पूर्ण करावा! महामार्गाच्या संबंधित सर्व समस्या सोडविल्या जाव्यात!
२) सावंतवाडी-मुंबई व मुंबई सावंतवाडी अशा नवीन ट्रेन सुरु कराव्यात!
३) सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांचा रेल्वे प्रवास व रस्त्यावरील प्रवास सुखकर होण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
४) व्हेंटिलेटरवर असलेली सरकारी आरोग्य यंत्रणा उत्तम दर्जाची करावी. उठसुठ सरकारी रूग्णालयातून बांबुळी गोवा येथे रूग्णांना पाठविणे थांबले पाहिजे!
५) अवैध दारू धंदे, मटका, जुगार आणि विशेषतः अंमली पदार्थांचा व्यापार थांबण्यासाठी कठोरता दाखविली पाहिजे.
६) सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्ग संपन्नता अबाधित राहून प्रदूषण विरहित उद्योगधंदे उभे राहिले पाहिजे, तसेच पर्यटन व्यवसायास पूरक गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत.
७) सर्वाधिक पाऊस पडूनही पाण्याची कमतरता निर्माण होते; त्यासाठी पाण्याच्या व्यवस्थापनेत आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत.
८) चोवीस तास वीज उपलब्ध राहावी; ह्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. भूमिगत विद्युत वाहिन्या झाल्याच पाहिजेत. तसेच सर्वसामान्य लोकांची लूट करणारा आणि कर्मचाऱ्यांना देशोधडीस लावणारा विद्युत स्मार्ट मीटर लागता काम नयेत.
९) सरकारी शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. कारण सर्वसामान्य कष्टकरी जनता खाजगी शाळेत आपल्या मुलांना पाठवू शकत नाहीत.
१०) सर्वसामान्य जनतेची प्रशासनाकडून होणारी अडवणूक थांबली पाहिजे.

उद्याच्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कवित्व पुढील अनेक वर्षे लोकांच्या मनात राहणार आहे. कारण ह्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी आपापले अस्तित्व पणास लावले आहे आणि त्याचे परिणाम पुढील पाच वर्षात होणाऱ्या इतर निवडणुकीत दिसणार आहे.

You cannot copy content of this page