मुंबईकरांना सुखाने गणपतीला येऊ द्या; त्यांना चुकीच्या नियमांची आडकाठी करू नका!

मार्च २०२० पासून कोरोना महामारीने जगाला ठप्प केले. कोरोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे; कारण कोरोना महामारी काही वर्षभरात जाणारी नाही. असे जगातील वैद्यकीय तज्ञांनी अनेकवेळा सांगितले. सुरुवातीच्या काळात नक्कीच राज्यकर्ते गोंधळले, त्यामुळे प्रशासन गोंधळले; परंतु ह्या १७ महिन्याच्या काळानंतरही प्रशासन गोंधळलेलेच दिसते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोय. नियम फक्त सामान्य लोकांना… सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र मोठ मोठे कार्यक्रम घेतात; कुठेही ये-जा करतात. त्यांना नियम नाहीत. त्यांच्याकडून शारीरिक दुरी ठेवणे, मास्क वापरणे, गर्दी न करणे असे साधेसुधे नियम पाळले जात नाहीत. तरीही प्रशासनामध्ये त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याची धमक नसते. मात्र आजही सामान्यांना वरील नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईस सामोरं जावं लागतं. हा प्रशासनाचा दुटप्पीपणा अयोग्य ठरतो. त्याचप्रमाणे प्रशासनाच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात; त्याची उत्तरं प्रशासनही देऊ शकत नाही. त्यामुळे कोरोनाचे कारण सांगून नियमांचे आदेश काढण्यात येतात. ते आदेश अक्षरशः चेष्टेचे विषय ठरतात. त्या आदेशांचा आधार घेत गेल्यावर्षी चाकरमान्यांना अक्षरशः मानसिक शारीरिक त्रास देण्यात आला.

ह्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण पाहूया…
आता सिंधुदुर्गात जाण्यासाठी
१) कोविड प्रतिबंध लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असाव्यात किंवा
२) ७२ तासापूर्वीचा RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असावा किंवा
३) वय १८ वर्षापेक्षा कमी असावे.
अन्यथा RT-PCR टेस्ट करावी लागेल.

कणकवली रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी कोणत्या वेळेत आणि कशी केली जाते? ते पाहूया.

कणकवली स्टेशनवर मुंबई, पुणे, दिल्ली, मडगाव मेंगलोर या ठिकाणावरून ट्रेन येतात आणि जातात. कणकवली स्टेशनला असणारी आरोग्य व्यवस्था साधारणपणे सकाळी पाच ते रात्री सात वाजेपर्यंत कार्यरत असते. कणकवली स्टेशनला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबई, पुणे, गुजरात, दिल्ली या ठिकाणाहून सहा ते सात गाड्या येतात. या ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मुंबईवरून येणारे प्रवासी सुमारे ९९ टक्के असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे अर्थात प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून (फक्त सकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत) वरीलप्रमाणे तपासणी केली जाते.

सकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कणकवली स्टेशनवर उतरणारेच प्रवासी कोविड-१९ चा फैलाव करू शकतात; असे निदान बिनडोक प्रशासनाने कसे काय काढले? इतर वेळेत येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कोणतेही नियोजन नसते. कणकवली स्टेशनवर आरोग्य यंत्रणेकडून RT-PCR टेस्ट केली जाते; त्याचा रिपोर्ट तीन ते चार दिवसांनी येतो. तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या गावात जाते. ह्यालाच म्हणतात मूर्खपणाचा कळस! RT-PCR टेस्ट किट संपविण्यासाठीच प्रशासन अशापद्धतीने RT-PCR टेस्ट करते; असा लोकांचा आरोप आहे आणि तो वरील गोष्टी पाहता खरा ठरतो.

किमान कणकवली स्टेशनवर आजपर्यंत RT-PCR टेस्ट किती केल्या आणि त्यातून किती पॉसिटीव्ह रुग्ण सापडले? ह्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावी; असे आमचे आवाहन आहे. कोविड प्रतिबंध लसीच्या कमतरतेमुळे असंख्य नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नाही; त्यामुळे त्यांना RT-PCR टेस्ट सक्तीने करावी लागणार आहे.

मुंबईतील चाकरमान्यांना गणेश चतुर्थीच्या सणाला येऊ द्या; त्यांना त्रास देणारे नियम आता गुंडाळून ठेवा. कारण हेच नियम राजकीय पुढाऱ्यांना लावण्याची प्रशासन हिम्मत दाखवत नाही. गेल्यावर्षी गणेश चतुर्थीच्या सणाला जाण्यासाठी ट्रेन नव्हत्या. मुंबईतील चाकरमान्यांना त्याचा जबरदस्त आर्थिक फटका बसला. येणाऱ्या प्रवाशाचे टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेव्हल चेक करून आजाराची लक्षण असलेल्या प्रवासाची टेस्ट करायला हरकत नाही. मात्र सरसकट RT-PCR टेस्ट करू नका. ह्या वर्षीतरी प्रशासनाने मुंबईकर चाकरमान्यांचा विचार करावा.

-विजय हडकर

You cannot copy content of this page