पादुका प्रदान सोहळा आणि रामराज्य-२०२५

|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ ||

काल परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या पादुका प्रदान सोहळा खऱ्या अर्थाने सफळ संपूर्ण झाला; असंच म्हणावं लागेल. प्रत्येक श्रद्धावानाकडे ओसंडून वाहणारा उत्साह आणि पादुका घेताना आणि घेतल्यानंतर होणारा जल्लोष पाहिल्यानंतर आनंदाचा महासागर सद्गुरूंवरील अभंगाच्या तालावर नाचत होता. हे चित्र प्रत्यक्षात पाहता येत होतं. एवढंच नाहीतर हा महासागर स्पष्टपणे सांगत होता की, आम्ही हा आनंद त्या सच्चिदानंद स्वरूप अनिरुद्धांकडून घेतलाय. व्यासपीठावर मोठी आई महिषासुरमर्दिनीच्या साक्षीने परमपूज्य नंदाई, परमपूज्य सुचितदादा आणि पूजनीय समीरदादा यांच्या मार्गदर्शनाखाली महाधर्मवर्मन डॉ. योगिंद्रसिंह जोशी, महाधर्मवर्मन डॉ. विशाखावीरा जोशी आणि इतर आध्यात्मिक सेवेकरी मंडळी उपासना केंद्रांना परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या पादुका प्रदान करीत होते; तर विविध उपासना केंद्रातील श्रद्धावान पादुका स्वीकारत होते. हा अख्खा सोहळाच जणू काही भर्गलोकातील सुख, आनंद, उत्साह देत होता. अशा उत्साहात सामील होण्याचे भाग्य आमच्या नशिबी आले; ह्याचा अर्थ आमच्यावर सद्गुरूंची कृपा आहेच.

दरवर्षी हा अत्यानंद देणारा सोहळा होतो. मात्र दरवर्षी तो जीवनातील सद्गुरूंचे अधिष्ठान अधिकाधिक दृढ करणारा असतो. त्याच्या अकारण करण्याचा स्रोत सदैव प्रवाहित असतो; त्याच अकारण कारुण्याच्या स्त्रोताच्या प्रवाहात मिसळून जाण्यासाठी पादुका प्रदान सोहळा निमित्त ठरत असतो. म्हणूनच तो श्रद्धावानांसाठी अतिशय प्रिय असतो. रामराज्य-२०२५ ही परमपूज्य बापूंच्या संकल्पनेतून साकारत असणारा काळ जसा जसा जवळ येत आहे तसा प्रत्येक श्रद्धावान अधिकाधिक सदगुरुंच्या चरणांशी घट्ट बांधला जात आहे. ह्याची प्रचिती काल पुन्हा आली.

पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली ह्याच नव्हेतर ह्यापेक्षा मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात पादुका प्रदान सोहळा संपन्न होईल आणि त्यांनतर २०२५ साली ‘रामराज्य-२०२५’ ह्या अनिरुद्धांच्या संकल्पनेच्या विश्वात जेव्हा आपण श्रद्धावान पादुका प्रदान सोहळ्यात असणार आहोत; तेव्हा आपण सर्व सुखाच्या, आनंदाच्या, समाधानाच्या, यशाच्या, तृप्तीच्या, भक्तीच्या, भक्तिभाव चैतन्याच्या सर्वोच्च स्थानी असू; ह्याची सुखद कल्पना आम्ही नक्कीच करू शकतो. कारण १९९६ पासून सुरु झालेल्या ह्या प्रवासात आपण कुठल्या तरी एका क्षणी सामील झालो आहोत. त्यामुळे आम्हाला एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; तो आमचं जन्मोजन्मीचं जीवन सर्वांगिण सुंदर करण्यासाठी सर्व काही करतोय. तो दिवस अर्थात ‘रामराज्य-२०२५’ चा तो क्षण आमच्याजवळ वेगाने येत आहे. ह्यासाठी प्रत्येक क्षण आमच्यासाठी अनमोल आहे. पुढील काही दिवसात आमच्यासाठी आणखी नव्या संध्या नव्हेतर सुवर्णसंध्या आमच्या जीवनात बापू आणून देणार आहेत. त्या सुवर्णसंध्या आमच्या जीवनात यायच्या असतील तर आमच्याकडे श्रद्धा आणि सबुरी ही दोन नाणी असणे महत्त्वाचे आहे. आता आम्हाला वेध लागले आहेत ते रामराज्य २०२५ चे आणि त्यापूर्वी मिळणाऱ्या सुवर्णसंध्यांचे!

|| नाथसंविध् ||

-नरेंद्रसिंह हडकर