संपादकीय- आदरार्थी सामर्थ्यशील व्यक्तिमत्व!

सन्मानिय श्री. शशिकांत मोरे साहेबांच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करताना नैतिकता जोपासणारी माणसं विरळ असतात म्हणूनच असं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या संपर्कात येतं तेव्हा ते नेहमीच स्मरणात राहतं. कुठल्याही सामाजिक प्रश्नांना त्यांच्याकडे नुसतं उत्तरच नसतं तर ते आक्रमकपणे तो प्रश्न पूर्णपणे सोडवितात. त्यामुळे अशा व्यक्तींना नेहमीच समाजकारणात आदराने पाहिले जाते. अशी एक व्यक्ती आमची परममित्र आहे, आमची मार्गदर्शक आहे; त्या व्यक्तीचे नाव सन्मानिय श्री. शशिकांत मोरे साहेब! ते कोकणातील (जिल्हा-रत्नागिरी) खेड तालुक्यातील `कोरेगाव’चे सुपुत्र!

अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमीच त्यांच्या मनात चीड असते. म्हणूनच त्यांनी `आव्हान’ नावाच्या संघटनेमार्फत अनेक प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावला. त्यांनी हाती घेतलेल्या ह्या चळवळीत समाजातील नामवंत- प्रतिष्ठित मान्यवरांचा नेहमीच सहभाग लाभला. कारण त्यांच्या कार्यातील पारदर्शकता नेहमीच सर्वांना भावते. गेली अनेक वर्षे मराठी नाटककार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलं आहे. लोककलावंतांना विशेषतः कोकणातील दशावतार नाट्यकर्मींना, भजनी बुवांना त्यांनी शासनाकडून अनेक सोयीसवलती मिळवून दिल्या. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी ह्यासंदर्भात केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

सन्मानिय श्री. शशिकांत मोरे साहेब मुंबई जिल्हा उपनगर को.ऑ.हौ.फेडरेशन (लि.) चे संस्थापक-संचालक आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईत अनेक कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायट्या आहेत. त्यांच्या अनेक समस्या असतात. त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संघटित होणे महत्वाचे असते. त्यातून प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून समस्या सोडविणे सोपे जाते. हे लक्षात घेऊन श्री. शशिकांत मोरे साहेबांनी आजपर्यंत केलेले कार्य आदर्शवत आहे. अनेक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना ते नेहमीच उचित मार्गदर्शन करतात, योग्य सल्ला देतात.

सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना ते `मापदंड’ नावाचे वृत्तपत्र मोठ्या सामर्थ्याने चालवितात. पत्रकार म्हणून सामान्य माणसांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध ते नेहमीच लढतात, भ्रष्टाचाराविरुद्ध ते आक्रमकपणे आवाज उठवितात. त्यामुळे त्यांचे लिखाण सडेतोड, भ्रष्टाचार करणाऱ्याच्या मनात धडकी भरविणारं असतं आणि सामान्यांना दिलासा देणारं असतं. आजपर्यंत त्यांनी आपल्या रोखठोक लिखाणातून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. त्यांचा ह्या क्षेत्रातही प्रचंड दरारा आहे. त्यांना सर्वच क्षेत्रात प्रचंड आणि दीर्घ अनुभव आहे. सामाजिक क्षेत्रात धडाडीने क्रियाशील असताना भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष हे पदही अनेक वर्षे होते.

आता मात्र त्यांनी कालच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, परिवहन-संसदीय कार्ये मंत्री विधिज्ञ श्री. अनिल परब आणि मुंबई जिल्हा उपनगर को.ऑ.हौ.फेडरेशन (लि.) चे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी आमच्याकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांनी आमच्या पाक्षिक `स्टार वृत्त’ कार्यालयाला नुकतीच भेट देऊन आम्हाला प्रोत्साहित केलं होतं. सन्मानिय श्री. शशिकांत मोरे साहेब यांच्या आजपर्यंतच्या कार्याला आमचा सलाम!

मोहन सावंत
सहसंपादक- स्टार वृत्त

You cannot copy content of this page