पी.एम. केअर्समार्फत देशभरात ५५१ पीएसए प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रकल्प उभारणार
नवी दिल्ली:- रुग्णालयांतील प्राणवायूची उपलब्धता वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पी.एम.केअर्स निधीतून देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधे ५५१ समर्पित प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय प्राणवायु निर्मिती सयंत्रांच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला सैद्धांतिक मान्यता देण्यात आली आहे. ही सयंत्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. ते म्हणाले, की ही सयंत्रे जिल्हा पातळीवर प्राणवायु उपलब्ध करण्यास मोठी चालना देतील.
ही समर्पित सयंत्रे,विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालयातील विशिष्ट सरकारी रुग्णालयांत स्थापित केली जातील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत यांची खरेदी करण्यात येणार आहे.
पी.एम.केअर्स निधीतून या वर्षाच्या प्रारंभी देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये अतिरिक्त १६२ समर्पित प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय प्राणवायु निर्मिती प्रकल्प स्थापित करण्यासाठी २०१.५८ कोटी रूपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात ( पीएसए) प्राणवायु निर्मिती संयंत्र स्थापित करण्यामागील मूळ उद्दीष्ट सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे अधिक सबलीकरण करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात स्वत:ची प्राणवायु निर्मिती सुविधा असणे, याबद्दल सुनिश्चित करणे हे आहे.
अशाप्रकारचे स्वत:चे प्राणवायु निर्मिती संयंत्र जिल्ह्यातील मुख्यालयातील रुग्णालयाच्या तसेच जिल्ह्याच्या दैनंदिन वैद्यकीय प्राणवायूच्या गरजा पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, द्रवरुप वैद्यकीय प्राणवायु (एलएमओ) हा प्राणवायुची अतिरीक्त आवश्यकता पूर्ण करणारी यंत्रणा (टॉपअप) म्हणून काम करेल. जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांतील प्राणवायु पुरवठा आकस्मिकपणे खंडित होऊ नये आणि कोविड-१९ रूग्ण किंवा इतर रुग्णांना अशा प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास त्यांना हव्या तेवढ्या प्रमाणात नियमितपणे प्राणवायु पुरवठा करणे यामुळे सुनिश्चित होणार आहे.