सिंधुदुर्ग मधील दिवीजा वृध्दाश्रमात अनोखा विवाह सोहळा!

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे (कणकवली तालुका) येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुलसी विवाह साजरा केला. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी व्हीलचेअरवर असलेल्या अविवाहित आजोबांचे लग्न तुळशी सोबत अगदी थाटात लावले गेले.

दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना लग्न सोहळ्यात घेऊन जाणे शक्य नाही. त्यांच्या वयाचा व तब्येतीची विचार करता त्यांना लग्नाला नेणे शक्य नाही, तरीही या आजी आजोबांना विवाहाचा आनंद उपभोगता यावा या करता तुलसीचा विवाह एका अविवाहित आजोबांसोबत अगदी तांदूळ निवडणे, हळद लावणे, निम सांडणे, पुण्यवचन, रुखवताचा थाट मांडून आणि नवऱ्याची सागर संगीत वरात काढून नवरा तुळशी समोर बोहल्यावर चढवला. दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी सुरेल आवाजात मंगलाष्टके गायली आजी आजोबांनीही त्यांना साथ दिली.

थरथरल्या हातानी तुळशीच्या गळ्यात माळ घालून वयाच्या 80 व्या वर्षी आजोबांनी तुळशी सोबत विवाह केला. आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू ओघळून आले. आजोबांना लग्न सोहळ्या नंतर जोरदार फाटक्यांच्या व सनई चौघड्याच्या आवाजात दिविजा वृद्धाश्रमातील परिसर दुमदूमला. त्यानंतर आइस्क्रीम व लग्नपंगती बसल्या. अशा शाही थाटात एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने आगळावेगळा तुलसी विवाह पार पाडण्यात आला. आजोबांना विचारले असता एवढी एकच इच्छा आयुष्यात राहिली होती, तीही दिविजा वृद्धाश्रमाने पूर्ण केली असे भावोद्गार काढले.

वृध्दाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी या मागची संकल्पना सांगितली की, आजी आजोबांना मनातून लग्न सोहळ्याला जायचे असते. परंतु शारीरिक व मानसिक दृष्ट्या थकल्या मुळे त्यांना दिविजा वृद्धाश्रमातुन बाहेर पडणे शक्य नसते. तर तुळशी सोबत आजोबांचा विवाह करून लग्नाचा आनंद दिविजा वृद्धाश्रमातच करता यावा यासाठीचे आयोजन केले जाते. ह्या कार्यक्रमास आश्रमातील कर्मचारी, ग्रामस्थ व मुंबई हुन राजू सावंत कुटुंबीय उपस्थित होते.

दिविजा वृद्धाश्रम हा आश्रम नसून एक जीवनाची व दुसरी विनींग खेळण्याचे 50 आजी आजोबांचे एक मायेचे घर आहे. अशा या मायेच्या कुटुंबाला आपल्या सारख्या दानशूर व्यक्तीच्या मदतीची फार गरज असल्याचे शेट्ये यांनी यावेळी सांगितले.

(छायाचित्र- असलदे येथील दीविजा वृध्दाश्रमातील आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यातील नवरदेव बनलेले 80 वर्षांचे आजोबा विवाह विधी करताना, सोबत वृध्दाश्रमातील कर्मचारी व ग्रामस्थ दिसत आहेत. छाया : एन. पावसकर)