तळेरेत हायवेचे सर्व प्रश्न सोडविण्याचे उपविभागीय अभियंत्यांचे आश्वासन

तळेरेत हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक व प्रत्यक्ष पाहणी 

सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी मांडला २१ मुद्द्यांचा ऍक्शन प्लान

उपविभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची दिली ग्वाही

तळेरे (संतोष नाईक)- येथील हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक आज ग्रा.प. तळेरे येथे संपन्न झाली व हायवे संबंधित प्रत्यक्ष प्रलंबित समस्याची संयुक्त पहाणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी प्रलंबित प्रश्नाबाबतचा २१ मुद्द्यांचा ऍक्शन प्लॅन मांडला. यावरती उप विभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

तळेरे येथील शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान पादचारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात; यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले होते. त्यावेळी तळेरे येथील महामार्गाशी निगडीत प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लावण्याची आग्रही मागणी राजेश जाधव यांनी हायवे अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याअनुषंगाने मिळालेल्या आश्वासनानुसार आज तळेरे ग्रामपंचायत कार्यालयात संबंधितांची तळेरेवासीयांसह बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस हायवेचे अधिकारी व तळेरे ग्रामस्थ यांच्यामध्ये हायवेच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राजेश जाधव यांनी तब्बल २१ मुद्द्यांचा महत्वपूर्ण असा ऍक्शन प्लॅन प्रभावीपणे मांडला. यामध्ये प्रामुख्याने महामार्गाच्या चौपदरीकरण कामी संपादित करण्यात आलेल्या भुक्षेत्राचा वापर ब्रिज, सर्विस रस्ते व गटारे यांच्याकरिता मंजूर आराखड्यानुसार करण्यात आला नसल्याने त्याबाबत निर्माण झालेल्या विविध समस्यांचा समावेश आहे.

त्याअनुषंगाने सर्विस रस्ते हे विजयदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने सक्षम आहेत का? तसेच वहाळावरील सर्विस रस्त्याचे ब्रिज देखील सक्षम आहेत का? सर्विस रस्ते काही ठिकाणी अरुंद असण्याचे कारण काय? पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे का? वहाळावरील बंधारा ठेकेदार कंपनीने अनधिकृतपणे उध्वस्त कसा केला व त्याची पुनरबांधणी करण्यात येणार का? वहाळालगतच्या दगडी पिचिंग पहिल्याच पावसाळ्यात वाहून कसे गेले? आवश्यक तेथे दिशा – मार्गदर्शक फलक व गतिरोधक यांचे योजना का करण्यात आलेले नाही? अशा विविध प्रश्नांचे उत्तर हायवे अधिकाऱ्यांकडून तळेरेवासियांनी मागितले. तसेच या समस्यांबाबत तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

प्रत्यक्ष पहाणीच्या वेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडची रुंदी ब्रिजपासून साडेपाच मीटर ऐवजी केवळ चार ते साडेचार मीटर असल्याचे हायवे उपअभियंता अतुल शिवनिवार यांच्या समक्ष निदर्शनास आणून देण्यात आले. यामुळे तळेरे येथील महामार्गाचे चौपदरीकरण कामकाज मंजूर आराखड्यानुसार करण्यात आले नसल्याचे हायवे अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांसमोर मान्य केले. त्यामुळे तळेरेवासीयांनी हायवे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत त्रुटी दूर करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे हायवे उपअभियंता अतुल शिवनिवार, शाखा अभियंता डी.जि.कुमावत आणि हायवे ठेकेदार केसीसी बिल्डकॉनचे अधिकारी यांनी पंधरा दिवसांत आवश्यक ती पाहणी करून त्रुटींची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पं. स. सदस्य दिलीप तळेकर, सरपंच सौ.साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी सरपंच शशांक तळेकर, विनय पावसकर, प्रवीण वरूणकर, डाॅ. प्रकाश बावधनकर, ग्रा. पं. सदस्य दीपक नांदलस्कर, उदय तळेकर, राजेश माळवदे, शैलेश सुर्वे, तेजस जमदाडे, मृणाल राणे, चेतन वरुणकर, मोहन भोगले, विजय तळेकर, उमेश कदम, हनुमंत तळेकर, बली तळेकर, राजा पाटील, पप्या कल्याणकर, अमोल सोरप, निलेश सोरप आदी उपस्थित होते.