संपादकीय- सामाजिक कार्यातही `मातृत्व’ जपणाऱ्या सामर्थ्यशील निर्मलाताईंना सलाम!

काही व्यक्ती जिथे जातील तिथे समाजाच्या हिताचा विचार करून त्यानुसार कार्य करतात, जे काही काम करतील ते काम समाजाच्या विकासासाठी कसं उपयुक्त ठरेल; हे पाहतात. त्यामुळे अशा व्यक्तींचा नेहमीच आदर केला जातो. समाजामध्ये त्यांना विशेष मान असतो. अशा सन्मानिय व्यक्ती प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांच्या कार्याची दखल समाजाला घ्यावीच लागते. अशाच एका व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षे काम करण्याची सुवर्णसंधी मला प्राप्त झाली. हे माझं सौभाग्य असल्याचं मी मानतो. कारण अशा व्यक्तींच्या मार्गदर्शखाली वावरताना समाजाभिमुख कार्य कसं करावं? हे शिकता आलं. ह्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर!

अ‍ॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर २०१४ साली सह्याद्री हिरकारी पुरस्कार स्वीकारताना…

कालच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अर्बन सेल अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा छोटासा लेखन प्रपंच!

श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी १९९४-९५ मध्ये मुंबईच्या महापौर पदावर असताना मुंबईकरांना दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले. लोकप्रतिनिधी जेव्हा उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि सामाजिक बांधिलकी जपणारा असतो तेव्हा जनतेचे प्रश्न सहजपणे सुटतात. श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर यांच्या महापौर पदाच्या काळात हा अनुभव जनतेने घेतला.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना मी त्यांच्याकडे स्वीय सहाय्य्क म्हणून काम पहिले. त्याकाळात त्यांनी महिला आयोगाचे केलेले कार्य आजही दीपस्तंभाप्रमाणे तळपत असून त्यांच्या कार्याचा आदर्श मानून राज्यात-देशात महिलांसाठी – समाजासाठी कार्य केल्यास दुर्लक्षित समस्या सहजपणे सुटू शकतील. ह्याच काळात निर्मलाताईंच्या १९ वर्षांच्या मुलीवर काळाने झडप घातली. हेमांगीला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर निर्मलाताईंनी तिची किडनी, लिव्हर व डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आणि अमलात आणला. प्रचंड दुःखद प्रसंगातही एका `आईने’ सामाजिक जाणीव ठेवत लेकीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि आपल्या मुलीला मृत्यूनंतरही जीवंत ठेवले. एवढे मोठे सामर्थ्य निर्मलाताईंकडे होते आणि आजही आहे. मातृत्व नेहमीच सर्वसमर्थ आणि देवासमान असतं. हेच मातृत्व त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच जपले आहे. तेच नेहमी मला आदर्शवत वाटते आणि मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो.

निर्मलाताईंनी आपल्यावरील सुसंस्कार जपले आणि त्या सुसंस्कारांची शिदोरी वाटली. राजकारणात असूनही त्यांना राजकारणातील वाईट गोष्टी चिकटल्या नाहीत. त्यांचे ध्येय त्यांना पक्के ठाऊक आहे आणि त्या ध्येयाचा प्रवास सामाजिक बांधिलकीतून सुरु होतो; असं आम्हाला वाटतं. त्यांनी असंख्य पीडितांना, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून दिला. तर नवीन पिढीनेही सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी? ह्याचं ते आवडीने मार्गदर्शन करतात. निर्मलाताई एक समर्थ नेत्या आहेत. त्या पक्षात जातील, ज्या पदावर जातील; तिथून त्या फक्त आणि फक्त समाजाच्या भल्याचाच विचार करून कृती करतील! त्यांच्या संपर्कात आलेले माझ्यासारखे असंख्य लोक हे ठामपणे सांगू शकतात.

निर्मलाताईंना पुढील वाटचालीस माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून तसेच पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि सामाजिक कार्यातही `मातृत्व’ जपणाऱ्या सामर्थ्यशील निर्मलाताईंना सलाम!

– मोहन सावंत
सहसंपादक – पाक्षिक स्टार वृत्त

निर्मला सामंत-प्रभावळकर यांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा!