शिक्षणतज्ञ श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या हिमानी परब यांचा सत्कार
मुंबई:- दादर येथे “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या कुमारी हिमानी परब यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
साधी राहणी, उच्च विचार व सात शैक्षणिक अर्हता असलेले उच्च विद्या विभूषित सिंधुदुर्गचे भूमिपुत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी राबवित असलेल्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व मुंबई सीमा शुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत श्री. सत्यवान यशवंत रेडकर व त्यांचे मित्र, एसएनडीटी महिला विद्यापीठ मध्ये कार्यरत, निदेशक यांचे स्वीय सहाय्यक, श्री. श्रीकांत दगडू साळेकर यांनी मल्लखांब या क्रीडा प्रकारात अर्जुन पुरस्कार प्राप्त, सिंधुकन्या कुमारी हिमानी परब यांचा दादर येथील समर्थ व्यायाम शाळा येथे सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला.
कुमारी हिमानी परब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रमाणे कोकणातील इतर विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात उत्तुंग यश संपादीत करावे व कोकणाचे तसेच महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पुढे न्यावे; असे श्री. सत्यवान रेडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. तेथे उपस्थित अन्य खेळाडूंना शासनाच्या विविध खेळाडू कोट्याअंतर्गत असणाऱ्या विविध शासकीय नोकरी संदर्भातील संधींचा लाभ घ्यावा; असे आवाहन त्यांनी केले.