राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन मिळणार
मराठी नाटककार संघाचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या निवेदनाची दखल…
राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे मानधन मिळणार
मुंबई (मोहन सावंत यांजकडून)- महाराष्ट्रातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा अदा करण्यात येणारे मानधन गेले सहा महिने मिळाले नव्हते. सदर मानधन तातडीने मिळावे अशी मागणी मराठी नाटककार संघाचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. त्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन शासनाने राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांचे दोन महिन्याचे मानधन एकत्रितपणे अदा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्यातील सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दरमहा अदा करण्यात येणाऱ्या मानधनापैकी मार्च व एप्रिल महिन्यांचे मानधन एकत्रितपणे अदा करण्यात येत असून येत्या आठवड्याभरात ते संबंधितांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी नुकतीच दिली आहे.
राज्यातील वृद्ध कलावंत व साहित्यिकांना १९५५ – ५६ पासून अ, ब व क या वर्गीकरणानुसार मासिक मानधन दिले जाते. कोविड -१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, उर्वरित मानधनसुद्धा लवकरात लवकर एकत्रितपणे अदा करण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग कलाकारांच्या अडचणी जाणून त्यांच्या पाठिशी यापुढेही समर्थपणे उभा राहील आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी कलावंत आणि साहीत्यिकांना आश्वस्त केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्नित मराठी नाटककार संघाचे अध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मानधन मिळणार असून महाराष्ट्रातील वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.