संपादकीय… आदर्शाला सलाम!

सन्मानिय चंद्रकांत तावडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करणारा विशेष अंक वाचण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा!

संपादकीय…

आदर्शाला सलाम!

माननीय श्री. चंद्रकांत तावडे याचं दुःखद निधन झाल्याचं कळलं आणि अतीव दुःख झाले. खूपशा आठवणी जाग्या झाल्या.

आदर्शवत माणसाचा देह जातो, पण त्याच्या स्मृती सदैव हृदयी तेवत राहतात. मा. श्री. चंद्रकांत तावडे यांच्या सोबतच्या अनेक भेटी, अनेक प्रसंग, अनेक आठवणी, अनेक घटना आजही हृदयात जशाच्या तशा आहेत.

ह्या जीवन प्रवासामध्ये आमच्यातल्या लहान-मोठ्या सीमारेषा धूसर होऊन एक मैत्रीचे नातं निर्माण झालं. त्यांना खूप जवळून पाहण्याची, अनुभवण्याची सुवर्णसंधी मला मिळाली.

त्यांचे वागणे अगदी साधे आणि सोपे; पण शिस्तीचे व जबाबदारीचे! त्यात कृत्रिमता नसायची, कसलाही स्वार्थ नसायचा. अगदी दिलखुलासपणे ते दोस्ती जपायाचे. त्यांचे हे वागणं नेहमीच मला सकारात्मक उर्जा देऊन जायचे. त्यातूनच सर्वांना मदत-सहकार्य करणाऱ्या आदर्श माणसाचे दर्शन घडायचे!

आपल्या आयुष्यात कळत-नकळत आलेल्या, अवतीभवती वावरून गेलेल्या, मनात रुतून बसलेल्या काही प्रेरणादायी व्यक्ती असतात. त्या व्यक्तींविषयी मनात अतीव आदर असतो- त्यांच्याबद्दल प्रेम वाटते. मा. चंद्रकांत तावडे साहेब त्यापैकी एक होते.

त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्याने अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध होते. त्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना मदत केली.

मार्च १९९३ मध्ये माझी मा. तावडे साहेबांची मंत्रालयात ओळख झाली. तेव्हा ते माननीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांचे अंगरक्षक होते. त्यांच्या सज्जनत्वाच्या अनेक गुणांपैकी एक म्हणजे त्यांनी या पदाचा कधी बडेजावपणा मिरवला नाही की कधी कुणाला कमी लेखले नाही. हे त्यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य होते. नेहमीच त्यांनी निरपेक्षवृत्तीने काम केले. शक्य तेवढी मदत त्यांनी अनेकांना केली. याबाबत माझा स्वत:चा अनुभव आहे. त्यावेळेस मा.बॅ. मर्झबान पात्रावाला राज्यमंत्री यांच्या आस्थापनेवर शासकीय कर्मचारी पद रिक्त असल्याचे कळले. जर `आपण माझी शिफारस केली तर तेथे माझी नियुक्ती होईल’ असं मी तावडे साहेबांना सांगितले. दुसऱ्याच दिवशी मला मंत्रालयात बोलावून थेट मा. पात्रावाला साहेबांच्या दालनात भेट घडविली. माझ्या इतर मंत्री आस्थापनेवर केलेल्या कामाचा अनुभव सांगून माझे जवळचे नातेवाईक आहेत; अशी शिफारस तावडे साहेबांनी केली. त्यामुळे माझी नियुक्ती तिथे झाली. ह्याची सदैव जाणीव ठेवून मी संधीच सोनं केलं.

त्यानंतर आजर्यंत आम्ही कधी दूरध्वनी, तर कधी प्रत्यक्ष भेटून संपर्कात होतो. आज ते आपल्यात नाहीत; हे मन स्वीकारत नाही. बहिणाबाईंनी सांगितलंय, `जगण्या मरण्यात फक्त एका श्वासाचं अंतर!’ पण तो एक श्वास विश्वासाचं खूप मोठं नातं निर्माण करतो. हे नातं तावडे साहेबांशी निर्माण झालं आणि ते निरंतर मी जपण्याचा प्रयास करणार आहे.

माझा वडीलधारी भाऊ गेल्याचं दुःख मला आहे. ह्या वडीलधाऱ्या भावासाठी चार ओळी लिहून प्रसिद्ध कराव्यात असे मला वाटले आणि पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून ते तुमच्यासमोर आणले आहे.

गेली अठरा वर्षे पाक्षिक `स्टार वृत्त’ हे नियतकालीक आध्यात्मिक संदेश देते. पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून नेहमीच सकारात्मक, विधायक आणि सामान्य लोकांसाठी पत्रकारिता करण्यात आली. म्हणूनच तावडे साहेबांसारख्या आदर्शवत व्यक्तीमत्वाचे सद्गुण अनेकांपर्यंत जावेत; अशी माझी इच्छा असल्याने हा प्रयास केला.

ह्या विश्वात अनेकजण येतात आणि जातात; पण तावडे साहेबांसारखे महान कर्तृत्ववान व्यक्तीमत्व निरंतर प्रत्येकाच्या मनात-हृदयात अमर राहतं. कुठलाही मनुष्य येताना काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही रिकाम्या हाताने जातो. असं म्हणतात. पण हे अर्ध सत्य आहे; असं मी मानतो. कारण तावडे साहेबांसारखी कर्मयोगी माणसं येताना काहीही घेऊन येत नसली तरी जाताना मात्र सगळ्यांचे प्रेम, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा आपल्यासोबत घेऊन जातात. कारण उभ्या आयुष्यात आपल्या प्रत्येक कृतीतून ते प्रेम, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा सगळ्यांना वाटत असतात. अशा मा. चंद्रकांत तावडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्मास ईश्वर चरणी चिरशांती लाभो; ही प्रार्थना!

ह्या अंकासाठी लेख, छायाचित्र देणाऱ्यांचा मी ऋणी आहे. कारण माझ्या वडीलधाऱ्या आदर्श बंधूला अर्थात आदर्श व्यक्तीमत्वाला सलाम करता आला!

-श्री. मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’

You cannot copy content of this page