विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षक-शिक्षकेतर वर्गावर अन्याय नको!
तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संतोष वरेरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
देवगड:- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षक-शिक्षकेतर वर्गावर अन्याय होऊ आणि त्यांना न्याय मिळावा; ह्यासाठी शासनाने त्वरित उचित कार्यवाही करावी असे निवेदन जेष्ठ समाजसेवक तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संतोष बापू वरेरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहे.
तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार संतोष वरेरकर आपल्या निवेदनात म्हणतात की,
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्यास संस्था स्तरावर नेमणूक केलेल्या शिक्षकांवर उपासमारीचा वेळ!
महाराष्ट्र राज्याच्या धोरणानुसार संपूर्ण राज्यभर सन २०१२ पासून शिक्षक-शिक्षकेतर भरती बंदी आहे. तसेच आपण आता सन २०१८ पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीस मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून २०१२ पासून शिक्षक भरती केली आहे. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांची सहा ते सात वर्षे सेवा झाली आहे. संबंधित शिक्षकांनी संस्थास्तरावर दिलेल्या तुटपुंज्या मानधनावर अध्यापनाचे काम केले आहे. आता आपण पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्यास संस्था स्तरावर नेमणूक केलेल्या शिक्षकांवर उपासमारीचा वेळ येणार आहे. तरी आपण याबाबतीत योग्य ती दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
वर्ग पूर्ण क्षमतेने सुरु करून ऑनलाईन वर्ग बंद करावेत!
तसेच यापुढे राज्यातील सर्व शाळांमधील वर्ग पूर्ण क्षमतेने सुरु करून ऑनलाईन वर्ग बंद करावेत; अशी विनंती करण्यात येत आहे.
आवश्यक्तेनुसार शिक्षक-शिक्षकेतर पदे मंजूर करावी!
तसेच आपल्या शैक्षणिक धोरणानुसार भाषेसाठी एक शिक्षक, विज्ञान व गणितासाठी एक शिक्षक व समाजशास्त्र विषयासाठी एक शिक्षक असे धोरण अवलंबिले आहे. परंतु मराठी विषयाचा शिक्षक इंग्रजी व हिंदी विषयाचे अध्यापन करेल काय किंवा गणित विषयाचा शिक्षक विज्ञान विषय चांगल्याप्रकारे शिकवू शकतो काय? याचे आपण शिक्षण तज्ञांशी बोलून परीक्षण करणे आवश्यक आहे. नपेक्षा या धोरणांमध्ये बदल करून विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे शिक्षक संचमान्यता न करता आवश्यक्तेनुसार शिक्षक-शिक्षकेतर पदे मंजूर करावी; अन्यथा विद्यार्थांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होणार आहे.
डोंगरी भागासाठीही विद्यार्थी पटसंख्येचे निकष शिथील करावेत!
तसेच शहरी भागाप्रमाणे डोंगरी भागासाठीही विद्यार्थी पटसंख्येचे निकष शिथील करावेत अन्यथा डोंगरी भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसत आहे. परिणामी गरीब आणि होतकरू विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षकेतर कर्मचारी भरती आवश्यक!
तसेच शिक्षकेतर कर्मचारी लिपिक शिपाई पदे सन २०१२ पासून भरती बंदी आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच शाळांमधून लिपिक तसेच शिपाई पदे रिक्त झाली आहेत ती पदभरती करणे संदर्भात निर्णय होणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनुकंपा भरती अद्याप झाली नाही. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक कामकाज थांबू नये व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून रिक्त लिपिक पदे, शिपाई पदे तसेच अनुकंपा तत्वावर संस्था स्तरावर तुटपुंज्या मानधनावर नेमणूक दिलेल्या आहेत; परंतु मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे अनुकंपा तसेच शिक्षकेतर लिपिक, शिपाई भरती कायम मान्यता प्रस्ताव कित्येक वर्ष प्रलंबित आहेत. त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याला जबाबदार कोण? तरी या सर्व बाबींचा आपण महोदयांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून उचित कार्यवाही करावी; अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.