विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीची आज दादरला जनजागृती सभा!

अनुभवी तज्ञ विद्युत स्मार्ट मीटरचे खरे वास्तव सांगणार!

सभेस उपस्थित राहण्याचे मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांचे आवाहन!

मुंबई (अजिंक्य सावंत)- विद्युत स्मार्ट मीटर योजना सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटात टाकणारी आणि कामगारांच्या नोकरीवर गदा आणणारी असून त्याबाबत वास्तव समजून सांगण्यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने जाहीर जनजागृती सभेचे आयोजन केले आहे. सदर सभा आज रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, शारदा टॉकीज शेजारी, दादर पूर्व येथे होणार असून त्यावेळी त्या विषयातील तज्ञ- अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. सदर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विद्युत स्मार्ट मीटर ही शासनाने आणलेली योजना राज्यातील करोडो सर्वसामान्य जनतेला आर्थिक लूटमार करणारी ठरणार आहे. तसेच ग्राहकांचा मूलभूत अधिकार नाकारण्याबरोबर ठराविक भांडवलदारांचे हित साधणारी व कामगारांच्या नोकरीवर गदा आणणारी आहे. त्यामुळे विद्युत स्मार्ट मीटर योजनेची सविस्तर माहिती जनतेला असावी; यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीने जनजागृती सभा आयोजित केलेली आहे. त्यावेळी या विषयातील तज्ञ व अनुभवी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस व कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष व कामगार नेते सुहास सामंत, कामगार एकता कमिटीचे सहसचिव व कामगार नेते गिरीश भावे, लोक राज संघटन ऑल इंडिया कौन्सिलचे सदस्य अशोक कुमार, मुंबई उच्च न्यायालयात स्मार्ट मीटर विरोधातील जनहित याचिकेची बाजू मांडणारे जेष्ठ विधिज्ञ अरविंद तिवारी, अपघात निवारण समितीचे माजी सदस्य हर्षद स्वार मार्गदर्शन करून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. सदर जनजागृती सभेसाठी सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page