‘रुपारेल रिअल्टी’ने केली शेकडो रहिवाशांची फसवणूक! ज्येष्ठ नागरिकांचा आत्महत्येचा इशारा!

मुंबई (उन्मेष गुजराथी):- माटुंगा येथील पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची ‘रुपारेल रिअल्टी’ने फसवणूक केलेली आहे, अशी गंभीर बाब उघडकीस आलेली आहे. त्यामुळे रहिवाशी संतप्त झालेले असून, काही ज्येष्ठ नागरिकांनी आत्महत्येचा इशारा दिलेला आहे.

माटुंगा येथे ५० वर्षांपासून ‘नायर महल’ नावाची इमारत होती. एप्रिल २०१३ रोजी ही इमारत पुनर्विकासासाठी ‘रुपारेल रिअल्टी’ (Ruparel Realty ) या कंपनीला देण्यात आली. त्यानुसार रीतसर करारपत्र बनविण्यात आले.

या करारानुसार या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम ३ ते ४ वर्षांत पूर्ण करण्याचे नमूद करण्यात आले. तसेच या इमारतीमधील जागा खाली केल्यापासून नवीन जागेचा ताबा मिळेपर्यंत भाडे देण्याचे ठरले. हे भाडे ८५ रुपये प्रति स्क्वेअर फूट असे ठरविण्यात आले. या भाड्यामध्ये प्रतिवर्षी १० टक्के दरवाढ करून देण्याचेही ठरले होते. तसेच नवीन जागेचा ताबा देताना कॉर्पस फंड देऊन करारानुसार जागा देण्याचेही या करारपत्रात नमूद करण्याचे ठरले.

या करारामधील अटी शर्तींची पूर्तता करणे बिल्डरवर बंधनकारक होते. त्यानुसार पहिल्या वर्षी बिल्डरने भाडे व्यवस्थित दिले. दुसऱ्या वर्षी मात्र दिलेल्या भाड्यात सातत्य नव्हते. त्यानंतर मात्र बिल्डर अमित महेंद्र रुपारेलने (Amit Mahendra Ruparel ) भाडे देण्यास टाळाटाळ करू लागला. आजमितीला येथील असंख्य भाडेकरूंची भाडे थकलेले आहे.

सुनंदा यशवंत सावंत या ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या महिलेचे बिल्डर अमित महेंद्र रुपारेल यांनी तब्बल ६४ लाख रुपये थकविलेले आहेत. आज सावंत व त्यांच्यासारख्या शेकडो रहिवाशांनी त्यांची जागा बिल्डरला देऊन तब्बल ११ वर्षे पूर्ण झालेली आहेत.

या जागेवर बिल्डर आज ४२ माळ्यांची नवीन इमारत Ruparel Iris नावाने बांधत आहे. वास्तविक ही इमारत तीन वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन बिल्डरने दिले होते. मात्र ११ वर्षांनंतरही काम अदयाप चालूच आहे. बिल्डरने ६ वर्षांपासून भाडे देणेही बंद केले आहे.

आज सुनंदा सावंत यांचे वय ७९ तर पती यशवंत यांचे वय ८३ आहे. बिल्डर अमित महेंद्र रुपारेल यांच्या मनमानी कारभारामुळे यशवंत सावंत यांना दोन वेळेला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांची एन्जिओप्लास्टीही करण्यात आली, यासाठी त्यांना ११ लाख रुपये खर्च आला. त्यासाठी त्यांना नातेवाईकांकडून उसने पैसे घायची वेळ आली.

सावंत यांच्यासारखी शेकडो कुटुंबीय या बिल्डरमुळे आज देशोधडीला लागलेली आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या परिस्थितीला बिल्डर अमित महेंद्र रुपारेल हाच कारणीभूत आहे, त्यामुळे त्वरित न्याय न मिळाल्यास आम्ही मंत्रालयासमोर आत्महत्या करू, असा गंभीर इशारा सुनंदा, त्यांचे पती यशवंत व इतर कुटुंबीयांनी दिला आहे.

सावंत कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यांना १५ जुलै २०२२ रोजी याबंधीचे निवेदनही दिले, त्यानंतर १ महिन्यांनी स्मरणपत्रही दिले. मात्र त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नव्याने स्मरणपत्र (reminder) दिले आहे. या स्मरणपत्रातून त्यानी आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे.

म्हाडाच्या सभापतीचे बिल्डरशी आर्थिक संबंध असण्याचा आरोप:

सुनंदा सावंत यांनी १३ एप्रिल २०२२ रोजी ‘म्हाडा’ला यासंबंधी तक्रार केली. त्यानुसार म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी ताबडतोब सुनावणीसाठी बोलावले. या सुनावणीला बिल्डर किंवा त्यांचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. इतकेच नव्हे तर त्यानंतर २८ एप्रिलला म्हाडाच्या ऑफिसमध्ये सावंत यांच्या दोन्ही मुलांना अपमानित केले व त्यांनाच धमकीच्या आवाजात सुनावले. विनोद घोसाळकर व त्यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर या दोघांनी बिल्डरची बाजू रेटून मांडली आणि मूळ विषय अनुत्तरित ठेवला.

यानंतर सावंत यांच्याशी बोलताना बिल्डर अमित महेंद्र रुपारेल यांनी अभिषेक घोसाळकर व त्यांचे १५ ते २० वर्षांपासून घनिष्ठ संबंध आहेत, असाही उल्लेख केला.

या प्रसंगातून बिल्डर अमित रुपारेल व विनोद घोसाळकर यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध आहेत, असा आरोप सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

भाडेकरूंना जागा देण्याअगोदर विकले कमर्शिअल फ्लॅट:
बिल्डर रुपारेल यांनी भाडेकरूंना जागा देण्यापूर्वीच कमर्शिअल जागा व फ्लॅट विकले आहेत, हे सर्वस्वी चुकीचे व नियमबाह्य आहे, असा आरोप सुनंदा व इतर रहिवाशांनी केलेला आहे.

सावंत कुटुंबियांच्या जीवाला धोका:
बिल्डर अमित महेंद्र रुपारेल यांच्याकडून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे, माझे व माझ्या कुटुंबियांचे बरेवाईट झाल्यास रुपारेल यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी माहितीही सुनंदा सावंत यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना दिली.

अमित महेंद्र रुपारेल यांना भोगावे लागणार तळतळाट:
रुपारेल व त्यांच्या संबंधितांना शेकडो भाडेकरूंच्या कुटुंबियांचे तळतळाट भोगावे लागतील, अशी माहितीही सावंत व इतर भाडेकरूंनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना दिली. यासंबंधी प्रतिक्रिया घेण्यासाठी रुपारेल, विनोद घोसाळकर यांना संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.