माझ्या `मी’ला सद्गुरु चरणांशी समर्पित केल्याने सर्वांगिण विकास!

|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ ||

`मी’ आर्थिक बाबतीत खूपच श्रीमंत आहे; त्यामुळे माझं कधीच अडणार नाही.
`मी’ अभ्यासात खूपच हुशार आहे; त्यामुळे मी बुद्धिवंत आहे.
`मी’ तरुण आहे, बलवान आहे, शरीराने समर्थ आहे; त्यामुळे मी स्वयंभू आहे.
`मी’ उच्चपदस्थ आहे म्हणून माझा दबदबा आहे.
`मी’ सत्तेत असल्याने मी काहीही करू शकतो.
`मी’ खूप मोठा गुंड- गँगस्टर असल्याने कोणालाही कधीही संपू शकतो.
`मी’ असा ताकदवान, बलवान, हुशार आहे. माझं कोणीच वाकड करू शकत नाही.
`मी’ म्हणेन ती पूर्व दिशा! `मी’ म्हणेन तेच सर्वजण ऐकतात. माझी आज्ञा घेतल्याशिवाय कोणीही काहीही करू शकत नाही.

हे कुठपर्यंत? हा `मी’ पणाचा अहंकार तोपर्यंत सुरू असतो जोपर्यंत त्या माझ्या `मी’ला संपत्ती, सत्ता, पदं, हुशारी जोडलेली असते. ज्याक्षणी हा `मी’ एकटा पडतो ना तेव्हा जगाची खरी ओळख होत असते. कधीतरी माझा `मी’ एकटा पडणारच असतो; हे वास्तव स्वीकारता आले पाहिजे.

माझ्याकडे सगळं काही असताना, माझं सगळं काही सुरळीत सुरू असताना खूपजण आपल्याशी जोडलेले असतात. मात्र ज्याक्षणी `मी’ एकटा पडतो तेव्हा मात्र सगळेजण सोडून गेलेले असतात. कालपर्यंत माझ्यासाठी प्राण देण्यास तयार असतात ते आज माझा `मी’ एकटा पडतो तेव्हा कुठे गायब होतात? ते समजत नाही. साध्यासोप्या भाषेत सांगायचे म्हणजे सुखाचे वाटेकरी व्हायला सगळ्यांना आवडतं; पण दुःखात-संकटात साथ द्यायला कोणी तयार होत नाही. दलदलीत बुडत असताना कोणीही त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करणार नाही; उलट माझा `मी’ त्या दलदलीत आणखी कसा रुतत जाईल; याचीच आखणी करणाऱ्यांमध्ये `मी’ ज्यांना आजपर्यंत माझे म्हणायचो तेच असतात.

म्हणूनच माझा `मी’ इतर बाह्य भौतिक गोष्टींनी समर्थ असला तरी त्या `मी’ ला जोपर्यंत सद्गुरु चरणांशी-वचनांशी समर्पित करीत नाही, तोपर्यंत माझा `मी’ जन्मोजन्मीसाठी समर्थ होऊ शकत नाही.

ह्या माझ्या `मी’ला जे काही चिकटलेलं आहे, जे काही मी वैभव मानतो; हे कधी ना कधी संपुष्टात येणार आहे. म्हणूनच माझ्या `मी’ ला शाश्वत साथ देणारा तो एकमेव सद्गुरु असतो. मी माझ्या `मी’ला जेव्हा श्रद्धेने, दृढविश्वासाने सद्गुरूंना समर्पित करतो तेव्हा तो माझा `मी’ उरतच नाही. उरतो फक्त त्याचा सच्चित आनंद! कारण तो आहे सच्चिदानंद! हा आनंद माझ्या जन्मोजन्मी माझ्याबरोबर राहावा; ह्यासाठी ऋषीमुनींनी हजारो वर्षांची तपस्या केली. संतमंडळी अख्ख जीवन त्याला समर्पित करतात. पण ह्या कलियुगात आपल्या भक्तांना साधासोपा मार्ग उपलब्ध व्हावा म्हणून स्वयंभगवान त्रिविक्रमाने अनेक संध्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी आम्हाला सद्गुरूंवर दृढविश्वास ठेवावा लागतो. त्यासाठी नेमकं काय करायचं? हेही सद्गुरूच सांगतो.
१) तो अखिल ब्रह्माण्डात सगळीकडे भरून व्यापलेला आहे.
२) प्रत्येक क्षणाला तो माझ्या सोबतीलाच राहतो आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझी काळजी घेतो, मला सहकार्य करतो, माझ्यावर प्रेम करतो.
३) तो क्षमाशील आहे आणि प्रेमळही आहे. अकारण करण्याचा तो महासागर आहे. तो सच्चिदानंद आहे.
४) तो मला तारणारच आहे. तो तारणहार आहे.
५) तोच आदिमाता चण्डिकेची आणि परमपिता दत्तगुरूंची कृपा माझ्या जीवनात प्रवाहित करतो.
६) त्याच्यावरील श्रद्धा आणि दृढ विश्वासाने तो माझ्या सोबत सदैव राहतो.

ह्या गोष्टींवर माझ्या `मी’चा जेव्हा दृढविश्वास असतो आणि त्याच्या भक्ती-सेवेत `मी’ तल्लीन होऊन जीवन जगतो तेव्हा माझा `मी’ न राहता माझा `मी’ त्याच्यामध्ये समर्पित होतो व माझं जीवन खऱ्या अर्थाने सर्वांगिण सुंदर होतं. त्या सर्वांगिण सुंदर जीवनात मला त्याच्या प्रेमाची, त्याच्या कारुण्याची प्रत्यक्ष अनुभूती येत राहते- प्रचिती येत राहते; अगदी सहजतेने! कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळींमध्ये, समाजामध्ये वावरताना जर माझ्या `मी’ बरोबर त्याची कृपा असेल तर जे काही घडतं तेही माझ्याच भल्यासाठी घडतं राहतं. सगळ्याच गोष्टी, वस्तू आणि घटना माझ्यासाठी सहाय्य्यभूत ठरतात. त्यावेळी ती गोष्ट सहजपणे लक्षात येणार नाही; पण काही वेळ गेल्यानंतर मात्र घडलेल्या घटना आपल्यासाठी किती महत्वाच्या होत्या-आणि त्या तशा का घडल्या ते कळून येतं. वेगळ्या पद्धतीने घडल्या असत्या तर आपलं किती नुकसान झालं असतं? ते कळून चुकतं. तेव्हा आपल्याला त्या सद्गुरुंच्या कृपेची समर्थता लक्षात येते. म्हणूनच माझा `मी’ त्याच्या चरणांशी सदैव नतमस्तक राहू दे; अशी आर्ततेने प्रार्थना करतोय! त्या प्रार्थनेचा तो आनंदाने स्वीकार करणारच आहे. ह्याचीही मला खात्री आहे!

||नाथसंविध्||

-नरेंद्रसिंह हडकर

You cannot copy content of this page