गोपुरी आश्रमात वाचन संस्कृती विकास कार्यक्रम ३० जूनला संपन्न होणार!

कणकवली:- गोपुरी आश्रमाच्या व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने गेली सलग तीन वर्षे युवाईमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचन संस्कृती विकास उपक्रम घेण्यात येतो. वाचन संस्कृती विकास उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून ह्या वर्षाचा पहिला वाचन संस्कृती विकास कार्यक्रम रविवार ३० जून २०१९ रोजी सकाळी ८.४५ ते ११.३० या वेळेत गोपुरी आश्रमाच्या कै.गणपतराव सावंत बहूऊद्देशिय प्रशिक्षण संकुलात (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे- वागदे) येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या इंडियन अॅनिमल फार्म या बहुचर्चित कादंबरीचे `विवेचन आणि लेखकांसोबत चर्चा’ असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कादंबरीचे लेखक प्रा. प्रवीण बांदेकर स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. इंडियन अॅनिमल फार्मच्या वाचन संस्कृती विकास ग्रुपचे पल्लवी कोकणी, रेश्मा पवार, चिंतामणी सामंत, अमित राऊळ, तेजश्री आचरेकर, या कादंबरीचे विवेचन करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष लेखकांशी चर्चा होणार आहे.

वैचारिक प्रगल्भता विकसित होण्यासाठी वाचन संस्कृती टिकली पाहिजे व युवकांमध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून गोपुरी आश्रमाच्या व राष्ट्र सेवा दलाच्यावतीने गेली सलग तीन वर्षे वाचन संस्कृती विकास कार्यक्रम यशस्वीपणे घेतला जातो. गेल्या तीन वर्षात वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून सक्षम विचारांची युवाई घडली. ह्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या श्रेयश शिंदे, अमोल तांबे, मंगल राणे, विक्रांत सामंत, मंजूनाथ पाचंगे, मनिष तवटे, भाग्यश्री घोगळे, राकेश चौहान, नताशा हिंदळेकर, सुशांत वर्देकर, प्रथमेश कांबळे, प्रियांका मेस्त्री, मयुरी पडवळ, नीशा कांबळी, वृदाली हजारे, सिद्धी गुडेकर, प्रथमेश लाड, सागर कदम, नेहा घोणे, अलमास खान, ओमकार महाडेश्वर, वृषाली तांबे, हर्षदा कुलकर्णी, अक्षय मोडक, रोशण खरात, मधुरा गांवकर अशा अनेक युवक-युवतींनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.

आजपर्यंत सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर सर, अर्पिता मुंबरकर, अॅड. देवदत्त परूळेकर, मंगलताई परूळेकर, अॅड. संदिप निंबाळकर, उमेश गाळवणकर, हरिहर वाटवे, प्रा.प्रविण बांदेकर, जेष्ठ कवि- पत्रकार अजय कांडर, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, मेघा शेट्टी, डॉ.शमिता बिरमोळे, अमिता कुलकर्णी आणि गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले आहे.

वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात सहभागी होण्याचे विनम्र आवाहन `गोपुरी आश्रम वाचन संस्कृती ग्रुप’च्या अध्यक्षा सिद्धी वरवडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page