कोकणातील नेत्यांची बदनामी थांबवा!

सूर्यावर थुंकण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहिल्याने थोबाडावर स्वतःच्याच थुंकीचे थरावर थर लागले तरी स्वतःची थुंकलेली थुंकी चाटण्यात धन्यता मानणारे कित्येक नेते पक्षाच्या प्रमुखांनी पोसलेले असतात. कारण त्यांचा वापर कधीही कसाही करून घेता येतो. त्यांना माहीमच्या खाडीत फेका किंवा कमळात बसवा; त्यांना कशाचीही पडलेली नसते. फक्त समोरच्यावर खोटेनाटे आरोप करीत राहायचे आणि समोरच्याला संपविण्यासाठीच काम करीत राहायचं; हाच त्यांचा धंदा असतो. त्यातून जमल्यास जमेल तेवढ ब्लॅकमेलिंग करायचं आणि आपली पोळी भाजायची.

कोकणातील अनेक नेत्यांवर भाजपच्या किरीट सोमय्या यांनी नाहक आरोप केले आहेत. २०१६ साली नारायण राणे यांच्यावर प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप करून थेट पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी करणारे किरीट सोमय्या नारायण राणे केंद्रात अर्थात मोदी सरकारात मंत्री होताच भेट घ्यायला दिल्लीत जातात. अशी अनेक उदाहरणं आहेत. नारायण राणे यांच्यावरील आरोपांचे नेमके काय झाले? नारायण राणे केंद्रात मंत्री होतात आणि किरीट सोमय्यासारखे भाजपचे ओरिजनल नेते हात चोळीत बसतात. त्याच नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी जावे लागते; हा किरीट सोमय्या यांच्या विश्वासाहर्तेचा प्रश्न असून यापुढे किरीट सोमय्या यांचे आरोप म्हणजे बदनामी करण्याचे `षडयंत्र’ आहे; हे समजून यायला जनता काही दुधखुळी नाही.

किरीट सोमय्या यांनी कोकणातील लोकप्रिय नेत्यांची मुद्दामहून वेळोवेळी बदनामी केली आहे. कारण कोकणातील नेते त्यांच्या राजकीय कारकिर्दीला लगाम घालतात; असा त्यांचा समज आहे. राजकारणात फक्त खोटेनाटे आरोप करून कोणीही मोठे होत नाही; नाहीतर किरीट सोमय्या केंद्रात मंत्री दिसले असते. ह्याची जाणीव सोमय्यांनी ठेवायला हरकत नाही. कारण कोकणातील नेत्यांनी आपापल्या पक्षात तन मन धन अर्पण करून निष्टेनें काम केलंय. म्हणून ते राजकारणात मोठे झाले.

किरीट सोमय्यांनी आता कोकणातील अनिल परब यांच्यासह अनेक नेत्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपूर्वीचा संचयनीचा घोटाळा (?) समोर आणून सोमय्यांना काय साध्य करायचे आहे? चौकशी यंत्रणा ह्या सरकारच्या इशाऱ्यानुसार काम करतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सोमय्यासारख्या नेत्यांनी आरोप करायचे आणि चौकशी यंत्रणांनी नोटीसा पाठवायच्या… शरद पवार यांनाही ईडीची नोटीस गेली आणि पुढे काय झाले ते महाराष्ट्राने पहिले. नारायण राणे यांच्यावर आरोप केल्याने नारायण राणे संपले नाहीत; तर ते केंद्रात मंत्री झाले. हा खोटारडेपणा सोमय्यांनी आतातरी सोडावा. ह्या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरही खोटेनाटे आरोप करण्याऱ्यांची अवलाद निपजली. पण छत्रपतींचे तेज आजही तळपत आहे. ह्याचे भान ठेवले नाहीतर सोमय्या राजकारणाच्या पटलावरून कधी अस्त पावतील; ते त्यांनाही समजणार नाही.

हेच किरीट सोमय्या ज्यांच्यावर आज आरोप करतात त्यांचीच भविष्यात भेट घ्यायला जातील. हाच त्यांचा इतिहास आहे. कोकणी माणूस इतिहास घडवितो; नासवत नाही. कोकणातील नेत्यांना संपविण्याची `किरीटरी प्रवृत्ती’ आजची नाही. तरीही कोकणची माती नेहमीच सह्याद्रीला पेलवते आणि तो सह्याद्रीच हिमालयाला समर्थ करतो. हे सोमय्यांसारख्यांनी ध्यानी घ्यावे! तूर्तास पुरे!

एक हाडाचा कोकणी माणूस
-मोहन सावंत

You cannot copy content of this page