विशेष संपादकीय- भारतीय वायूसेनेचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन!
भारतभूमी ही शूरवीरांची आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही भारतभूमी समर्थ आहे, सक्षम आहे; हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. क्रूरपणे, भ्याडपणे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त तळांवर भारतीय वायुसेनेने सर्जिकल स्ट्राइक करून जगाला दाखवून दिले आहे की भारत हा दहशतवाद्यांच्या विरोधात सक्षमपणे लढा देऊ शकतो. मनःपूर्वक अभिनंदन आहे भारतीय सैन्याचे! आम्हाला आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही भारतवासीय त्यांच्या मागे ठामपणे सर्व मतभेद विसरून उभे आहोत. म्हणूनच आज ब्राह्ममुहूर्तावर देशाने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले करून त्यांचे येथील नामोनिशाण मिटवून टाकले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेली ही दुसरी कारवाई. आज देशातील नागरिकांचा अभिमानाने ऊर भरून आला. जल्लोष साजरा झाला. धन्य ती आमची भारतभूमी आणि धन्य ते आमचे शूरवीर सैनिक!
दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करताना भारताने नेहमीच संयमाची भूमिका घेतली होती, सामंजस्याची पुंगी वाजवली होती, शांतीच्या चिपळ्या वाजविल्या होत्या, पाकिस्तानसमोर अनेकवेळा दहशतवाद्यांच्या विरोधातील पुराव्यांचे पर्वत उभे केले होते, जगासमोर दुःख व राग व्यक्त केला; पण दहशतवाद्यांची आणि त्यांची आरती करणाऱ्या पाकिस्तानची हरामखोरी थांबली नाही. भारताच्या संयमाला कमजोरी समजली गेली. १४ फेब्रुवारीला भारतच्या केंद्रीय पोलीस राखीव दलाच्या जवानांना आत्मघातकी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. त्यात ४० जवान शहीद झाले. त्याला उत्तर देताना भारताने केलेली कारवाई ही समर्थनीयच आहे.
संपूर्ण जग आज दहशतवाद्यांच्या हिंसेपुढे हतबल होत आहे. भारतही त्याचे दुष्परिणाम भोगत आहे; परंतु भारताला नामशेष करण्यासाठी पाकिस्तानातील शासन नेहमीच दहशतवाद्यांना आसरा देते व सहकार्य करते. त्यासाठी भारतातील प्रत्येक हल्ल्यामागे पाकपुरस्कृत दहशतवादी आणि त्यांना सदैव सहाय्य करणारे पाकिस्तान असते. या संदर्भात अनेकवेळा समज देऊनही पाकिस्तान सुधारले नाही. भारताने दिलेल्या संधी नेहमीच पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करून नाकारल्या.
दहशतवाद्यांनी आजपर्यंत देशातील सामान्य नागरिकांना ठार मारले, आमच्या साधनसंपत्तीचा विनाश केला, आमच्या सैन्यावर हल्ले केले, संसदेवर हल्ला करण्याचे कौर्य केले. त्याचे उत्तर भारताने आजपर्यंत दिले. हे जरी वास्तव असले तरी ‘जशास तसे’ या न्यायाने भारत कधीही वागला नाही. पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले. असे किती हल्ले सहन करायचे? देशातील नागरिक मरतात, जवान शहीद होतात. तरीही किती दिवस शांततेचा तह सुरू ठेवायचा? शेवटी भारताने दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राइक करून सडेतोड जबाब दिलेला आहे! भारताने घेतलेली संयमी भूमिका इथे अतिशय महत्त्वाची ठरते. संयमी भूमिका घेतल्यामुळे भारत जगाचं नेतृत्व करू शकतो; हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जैश-ए-महंमद ह्या दहशतवादी संघटनेने पुन्हा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. भारतही आता जबाबदारी स्वीकारतो म्हटल्यावर काय झाले? ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांची राख झाली.
भारत शांतताप्रिय देश आहे; पण भारतावर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही. देशाच्या सुरक्षेमध्ये कोणाची मध्यस्थी आम्हाला मान्य नाही, हे भारतानेही दाखवून दिले. आजचा भारत शांतताप्रिय असला तरी आक्रमक आहे, भारत सहिष्णुता जपणारा असला तरी समर्थ आहे, भारत सुधारण्याच्या संधी देणारा असला तरी त्या संध्या नाकारणाऱ्यांच्या उरावर नाचून त्यांचा सर्वनाश करण्याची ताकद दाखविणारा आहे. कौर्याला नामशेष करण्याचे शौर्य भारताकडे आहे म्हणून `माझा भारत महान आहे.’ या महान देशाविरोधात विनाकारण कटकारस्थान करणारा पाकिस्तान कंगाल भिकारी बनला तरी आपली खोडी सोडत नाही; असं चित्र पुन्हा पाकिस्तानच्या संसदेत आज पाहावयास मिळाले. भारताविरोधात कितीही विषारी भाषण करा, कितीही एकजूठ करा, दहशतवाद्यांना पोसा; पण भारत न्यायाने-नीतीने उभा राहिलेला देश आहे. त्यामुळे पाकिस्तानसारख्या भुरट्या देशासमोर आमची ताकद, आमची कल्पनाशक्ती, आमची निर्णय क्षमता, सर्वच काही वज्रासारखे आहे.
परंतु भारताला येणाऱ्या उद्यासाठी- भविष्यासाठी सर्व स्तरावर खूप मोठी तयारी करावी लागणार आहे. दुसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचा जल्लोष करताना भारतीयांनी गाफील राहता कामा नये.
१) देशातील राज्यकर्ते, विरोधी पक्ष आणि इतर राजकीय पक्ष
२) देशातील सर्व सैन्य, संरक्षण दल, पोलीस दल, सुरक्षा दल
३) देशातील संपूर्ण प्रशासन
४) देशातील सर्व नागरिक
अशा चार स्तरावरील प्रत्येक स्तराने आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि प्रामाणिकपणे कार्यक्षमतेने क्रियाशील झालं पाहिजे. ‘देशासाठी मी आहे, देश माझ्यासाठी नाही!’ ही निर्णायक पण महत्वाची स्वाभिमानी भूमिका जीवनात उतरवली पाहिजे.
राजकारण्यांनी सत्तेसाठी राजकारण करावं; पण दहशतवाद आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तान विरोधातील कोणत्याही कारवाईचा- घटनांचा राजकारणासाठी उपयोग करू नये. आमचा देश सुरक्षित असल्यास आम्ही सुरक्षित राहू, तरच आम्ही राज्यकर्ते होऊ. हे राजकारण्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण निषिद्ध असलं पाहिजे. विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागलं पाहिजे तसं सत्ताधारी पक्षानेही जबाबदारी ओळखली पाहिजे.
देशातील सैन्याने सुरक्षा दलांनी एकत्रित येऊन प्रत्येक हालचाल केली पाहिजे. आपला एकही सैनिक शहीद होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी उचित व अचूक नियोजन झालं पाहिजे.
देशातील प्रशासनाने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी भ्रष्ट आणि गैरकारभार होणार नाही; ह्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे.
तर प्रत्येक नागरिकाने सर्वच पातळीवर सैनिकासारखं सदैव तयारीत राहिलं पाहिजे.
तरच आम्ही खऱ्या अर्थाने जल्लोष करूनही सावध राहू आणि देशाच्या मुळावर उठणाऱ्यांचा नायनाट करण्यास सज्ज होऊ!
पुन्हा एकदा भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयमी नेतृत्वाबद्दल अभिनंदन!