विशेष लेख… राणेंच्या विजयाचे शिल्पकार!

नारायण राणे विनायक राऊत मताधिक्य आमदार
१) कुडाळ ९२४१९ ५०४२४ +४१९९५ नितेश राणे
२) सावंतवाडी ८५३१२ ५३५९३ +३१७१९ दीपक केसरकर
३) कुडाळ ७९५१३ ५३२७७ +२६२३६ वैभव नाईक
४) रत्नागिरी ७४७१८ ८४७५५ -१००३७ उदय सावंत
५) चिपळूण ५९९९२ ७९६१९ -१९६२७ शेखर निकम
६) राजापूर ५३३८५ ७४८५६ – २१४७१ राजन साळवी
पोस्टल ३१७५ ४१३२ -९५७
४४८५१४ ४००६५६ ४७८५८

 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणेंचा विजय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी धक्कादायक आहे. कारण शिवसेनेला साथ देणाऱ्या मतदार संघात दोन वेळा निवडून आलेल्या विनायक राऊतांचा पराभव करणं तेवढं सोप्प नव्हतं. राणेंच्या विजयात आमदार नितेश राणे, दीपक केसरकर आणि वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य निर्णायक ठरले.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकट असलेले आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून २६ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळणे; ही धोक्याची घंटा नाईकांसाठी निश्चितच आहे; मात्र उदय सामंत, शेखर निकम यांच्या मतदारसंघातून राऊतांना मताधिक्य मिळते ही बाब सुद्धा महायुतीचा धर्म बुडविण्यासारखं आहे. खऱ्याअर्थाने निष्ठेने काम करीत राजन साळवी यांनी राऊतांना आणि केसरकर यांनी राणेंना सहकार्य केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते.

विनायक राऊत यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या प्रचंड नाराजी समोर हात टेकावे लागले. प्रचार करण्यासाठी गावागावात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज लागते, नियोजन लागते आणि विशेष म्हणजे हे सगळं करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च सहजपणे उमेदवाराला करावाच लागतो. पण राऊत हा खर्च करण्यात कमी पडले. त्यामुळे अनेक निष्ठावंत प्रामाणिक शिवसैनिक हतबल झाले. मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा घेऊन वातावरण निर्मिती होत असली; तरीही प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचावेच लागते. त्याला ‘अर्थपूर्ण’ दिलासा द्यावाच लागतो. याकडे राऊतांनी पूर्णतः दुर्लक्ष केला; असा आरोप आता त्यांचेच कार्यकर्ते करीत आहेत आणि तो खरा असावा!

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आमदार नितेश राणेंनी अनेक सरपंच व स्थानिक नेत्यांना आपलेसे करून घेतले‌. काही ठिकाणी विकासाच्या कामांचा जोरदार शुभारंभ केला. या घटनांकडे राऊतांनी आणि त्यांच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. आज निष्ठेच्या भाकऱ्या खाऊन पोट भरणारे राजकारणात खूप कमी आहेत; अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत! असे असताना राऊत यांनी निष्ठेच्या भाकऱ्या खाऊन प्रचार करा म्हणून सांगणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारखे होते.

अगदी राऊतांना सोडण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांनी अगदी मातोश्रीशी निष्ठावंत असलेल्या नेत्यांशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनीही तुमचा फायदा असेल तिथे जा! हा सल्ला दिला. पाण्यासारखा पैसा ओतल्याशिवाय निवडणुका लढविता येत नाहीत; हे राऊतांना माहीत नाही असे नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे यांचा हा पराभव नसून तो राऊतांचा आहे; अशी भूमिका सिंधुदुर्गातील उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्ते घेत आहेत!

वैभव नाईक यांना आयटीकडून चौकशीच्या फेऱ्यात अडकविले गेले. त्यांना त्रास दिला गेला. त्याचे राजकारण दोन्ही बाजूने झाले, तरीही नाईकांनी समर्थपणे प्रतिकारही केला. पण ती चौकशी थांबावी अथवा प्रलंबित राहावी; यासाठी तर राणेंना मदत केली नाही ना? असा प्रश्न अनेकजण आज उपस्थित करीत आहेत!

नारायण राणे यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून काही प्रमाणात आमदार वैभव नाईक आणि खुद्द विनायक राऊत यांच्याकडे पाहता येईल! आमदार नितेश राणेंसमोर उद्धव शिवसेनेला रोखण्याचे काम होते; पण ह्यापुढे शिंदे शिवसेनेलाही रोखण्यासाठी ते प्रयत्न करतील. कालच शिंदे शिवसेनेच्या खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजप प्रवेश तेच सांगतोय.

हेच विजयाचे शिल्पकार भविष्यात कोणाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करतात; त्यावरून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या राजकारणाची दिशा ठरेल.

You cannot copy content of this page