संपादकीय… आता राणेंनी विकासाचे कमळ फुलवावे!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांची हॅट्रिक रोखली आणि कोकणात कमळ फुलविले. राणे यांच्या विजयाचे व राऊत यांच्या पराभवाचे फॅक्टर तपासण्यापूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी राणे यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्य करावे लागेल. प्रशासनावर वचक असणारा आक्रमक नेता म्हणून राणे यांची ओळख आहे. तो सकारात्मक वचक ठेवून मूलभूत सुविधांसाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागतील!

सिंधुदुर्गात खाजगी रुग्णालये आहेत; पण ती गरीब कष्टकरी जनतेला परवडणारी नाहीत. सरकारी आरोग्य यंत्रणा व्हेंटिलिटरवर आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जो जीवघेणा त्रास होतो तो क्लेशकारक आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक पाऊस पडूनही दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कायमस्वरूपी नियोजन आवश्यक आहे. टँकर मुक्तीची संकल्पना नारायण राणे यांनी यापूर्वी राबविली होती. पण आता पुन्हा टॅंकरद्वारे पाणी आणण्याशिवाय दुसरा पर्याय शोधला पाहिजे. सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात विद्युत पुरवठा २४ तास ठेवण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिन्या असाव्यात आणि विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा दर्जेदार असण्यासाठी खूप मोठे काम करावे लागणार आहे. लवकरच स्मार्ट मीटर बसण्याची प्रक्रिया खाजगी कंपन्यांद्वारे होणार आहे; ती जनतेला लुटणारी तसेच कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय आणणारी असल्याने त्याला विरोध करण्यासाठी जनता पुढे येईल. त्या जनतेचे नेतृत्व राणे यांना करावे लागेल. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळांचे पीक आले असताना शासनाच्या शाळांकडे शासनाकडून दुर्लक्ष होतोय. त्यामुळे कष्टकरी सामान्य जनतेला आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देणे कठीण झाले आहे. ह्या मूलभूत गरजा जर शासन स्तरावर योग्य पद्धतीने पुरविल्या तर कष्टकरी जनतेचा त्रास कमी होऊ शकतो. अवैध धंदे, मटका, जुगार आणि अंमली पदार्थांचा व्यापार आणि त्या व्यापारात असणारे स्थानिक राजकीय पुढारी कोकणच्या स्वर्गाला नरकात रूपांतरित करीत आहेत. याबाबतीत खासदार म्हणून नारायण राणे यांनी मतदारसंघातील राजकीय पार्श्वभूमी नसलेले प्रामाणिक, विद्वान, कार्यक्षम असलेल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांना विश्वासात घेऊन सुसंस्कृत कोकणचा पाया रचला पाहिजे!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत म्हणून दोनदा निवडून जिंकून आलेल्या विनायक राऊत यांचा पराभव झाला; असे ढोबळमानाने म्हणता येईल. देशपातळीवर विशेषतः महाराष्ट्रात गेल्या दोन टर्म पेक्षा कमी जागा भाजपला मिळाल्या. त्यामध्ये नारायण राणे यांचा विजय महत्त्वाचा ठरतो. पुढील निवडणुकीत हा विजय लाखोंच्या मताधिक्याने होण्यासाठी पुढील पाच वर्षात नारायण राणे यांना मतदार संघात खूप मोठे काम करावेच लागणार आहे. आता राणेंनी विकासाचे कमळ फुलवावे; ही मतदारांची इच्छा आहे!

– नरेंद्र हडकर

हेही वाचा…!

असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!

हेही वाचा…!

संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!

हेही वाचा…!

Epaper 1 May 2024