पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र सावंत यांच्या निष्कलंक सेवेला सलाम!

निष्कलंक सेवेला पोलीस दलात खूप मानाचे स्थान आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी मोहाचे क्षण समोर येत असताना पोलीस दलात प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने सेवा करण्याचे व्रत जेव्हा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याकडून घडते तेव्हा त्याचे कौतुक करावेच लागते. आज असेच एक कौतुकास पात्र ठरणारे व्यक्तीमत्व सन्मा. राजेंद्र सावंत काल दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी मी तोडक्या-मोडक्या आणि थोडक्या शब्दात माझ्या भावना व्यक्त करीत आहे.

वांद्रे खेरवाडी पोलीस स्टेशनला सन्मा. श्री. राजेंद्र सावंत कार्यरत असताना त्यांच्याशी माझी ओळख झाली. माझा मुलगा अजिंक्य ह्याच्या पासपोर्टच्या कामानिमित्त मी गेलो असता त्यांनी मला कोणतीही अपेक्षा न ठेवता सहकार्य केले. पोलीस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक माणसाला मनापासून सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती खरोखरच वाखाण्याजोगी! कोणतीही ओळख नसताना त्यांनी मला सहजपणे सहकार्य केले. त्यातून माझी त्यांच्याशी ओळख झाली व पुढे त्यांचे रूपांतर मैत्रीत झाले.

त्यांच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वामुळे त्यांचे राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. प्रामाणिक आणि कार्यक्षम सेवा केल्याने त्यांना मुंबईच्या लाचलुचपत विभागात बढती मिळाली. तिथेही त्यांनी उत्कृष्ट सेवा देत आपली प्रतिभा जोपासली.

त्यांनी पोलीस दलात केलेली सेवा कौतुकास्पद आणि आदर्शवादी आहे. सेवानिवृत्त झाले असले तरी ते भविष्यात समाजाच्या सेवेला निश्चितपणे वाहून घेतील. त्यांना माझ्या परिवाराकडून सेवा निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा! सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनात त्यांना सुख, समाधान, आनंद, कीर्ती आणि सदृढ आरोग्यसह दीर्घायुष्य मिळो; ही परमात्म्याची प्रार्थना! त्यांच्या निष्कलंक सेवेला सलाम!

-मोहन सावंत