सामान्य मानवजातीसाठी सगुण भक्तीच का आवश्यक आहे…
माझे माझ्या सद्गुरू साईनाथांवर खूप प्रेम आहे आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांवर ही तितकेच प्रेम व श्रद्धा आहे; मग मी आता इतर सदेह स्वरूपात असणाऱ्या सद्गुरूची भक्ती का करावी?
सर्वप्रथम मी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा… की हे सद्गुरुतत्व जे आता मला त्याच्या देहरुपात दिसू शकेल असे समोर नाही; परंतु तरीही त्याचे अस्तित्व १०८% आहेच हा माझा विश्वास खरोखर एक खूप छान गोष्ट आहे…. परंतु त्याच सद्गुरुंच्या अवतार कालावधीत जर मी जन्मलो असतो तर तेव्हा ही हाच प्रश्न पडला नसता हे कशावरून?
उदा. १) स्वामी समर्थ महाराज देह रूपात असताना त्यांच्या अवतार कालावधीत समजा मी नृसिंह सरस्वती महाराज ह्यांचा भक्त आहे; तर मी स्वामींची भक्ती का करावी? तसेच
२) साईनाथांच्या अवतार कालावधीत समजा मी स्वामींचा भक्त आहे; मग मी साईनाथांची भक्ती का करावी?
अशावेळी मला हे लक्षात घायला हवे की माझ्या मनातील हा प्रश्न माझ्या प्रत्येक जन्मात जसाच्या तसाच आहे. पण माझ्या हे सुद्धा लक्षात आला पाहिजे की हा सद्गुरू सुद्धा प्रत्येक अवतार कार्यात त्या युगाला साजेसे आणि आवश्यक असणारे रूप भक्तांच्या कल्याणासाठी मनुष्यदेह धारण करून येत असतो. त्यावेळी `तो’ स्वतः आदर्श जीवन शैली स्वीकारतो आणि भक्तांनी जीवनात कसे वागावे? ह्याचे मार्गदर्शन करतो. त्यातूनच त्याला भक्तांना उचित मार्गावर आणायचे असते. भक्तांच्या चुकांना व पापांना क्षमा मिळावी म्हणून `तो’ सदैव क्रियाशील असतो.
प्रभू राम हेच श्रीकृष्ण होते; तेच पुढे श्री दत्तात्रेय महाराज म्हणून आले; तेच पुन्हा नृसिंह सरस्वती महाराज बनून आले; तेच पुढे स्वामी समर्थ बनून आले; तेच पुन्हा सद्गुरू साईनाथ बनून आले. प्रत्येक अवतारात त्या सद्गुरूंचे रूप वेगळे होते व त्या त्या जन्मानुसार त्याचा पेहराव सुद्धा वेगळावेगळा होता. स्वामी जेव्हा साई रूपात आले तेव्हा त्यांचे वस्त्र वेगळे होते; तरी त्यांची कृपा, कार्य व मुळ सद्गुरू तत्व तेच आहे; ही महत्वाची गोष्ट नेहमी आपल्या लक्षात असली पाहिजे.
साधी गोष्ट बघूया ना…. लहान असताना आपल्याला काही हवं असेल तर आपण आपले आईबाबा जे आपल्या समोर सदेह आहेत त्यांच्या जवळच मागतो. अगदी हक्काने हट्ट करतो. आपले आजी आजोबा ह्या जगात जर आता सदेह नाहीत तर त्यांच्या फोटोकडे पाहून मागत नाही.
आपल्या जीवन कालावधीत देहरूपात नसलेल्या सद्गुरूंशी नातं जोडणं आपणास तेवढंस सहजपणे जमत नाही; कारण आपण सामान्य मानव आहोत. पण आपल्यावर प्रेम करणारे, सदैव आपल्या पाठीशी राहणारे, उचित सल्ला देणारे, आपली काळजी घेणारे सद्गुरु तत्व जेव्हा मनुष्य देहात असते तेव्हा त्याच्याशी प्रेमाने जोडून राहणे सहजपणे जमते; एवढंच नाहीतर तेच सद्गुरु तत्व जेव्हा अगोदरच्या सद्गुरू तत्वांची, परमात्म्याच्या अवतारांची ओळख करून देतो, त्यांचे माहात्म्य सांगतो तेव्हा त्यांची भक्तीसुद्धा आमच्याकडून होते. त्यांच्या प्रेम प्रवासात आपण न्ह्याऊन जातो. तेव्हाच आपले प्रेम व भक्ती अधिक दृढ होण्यास मदत होते म्हणूनच आपण सगुण सद्गुरूरूपाची भक्ती करणं आवश्यक आहे.
समजा आपण पूर्वी एका वैद्याकडे जात असू; त्याचे औषध घेतल्यावर आपल्याला गुण येत असे; परंतु कालांतराने ते वैद्यबुवा वयस्कर झाले व देवाघरी गेले. पण सर्व वैद्यकी त्यांनी त्यांच्या मुलास शिकविली व त्यांच्या मुलाने आधुनिक कालानुरूप आणखी प्रगत आधुनिक उपचार पद्धती देखील आत्मसात केली व त्यांच्या वडिलांइतकेच कौशल्य प्राप्त केले; मग आता आपल्याला रोग मुक्त व्हायचे असेल तर जो सद्य काळात वैद्यकी करत आहे; अशा डॉकटरकडे जाणेच भाग आहे. जो पूर्वीच्या मूळ वैद्याचाच अंश आहे; कारण तेच सत्य आहे. त्याला नाकारणे म्हणजे रोगमुक्त करू शकणाऱ्या उपचारपद्धतीपासून स्वतःला वंचित ठेवणे; हे आपल्याला समजलं पाहिजे.
केवळ निर्गुण निराकाराकडे म्हणजेच केवळ मोकळ्या आकाशाकडे पाहून हात जोडल्यास आपली भक्ती व विश्वास दृढ होणे फारच कठीण आहे आणि म्हणूनच मूर्ती पूजन हे सगुण भक्तीचेच प्रतीक मानले गेले आहे आणि हे सर्व तो दयाळू परमात्मा नक्की ओळखतोच. म्हणूनच तो पुन्हा पुन्हा मानव जन्म घेऊन आपल्यामध्ये येत असतो. मग अशावेळी त्या सद्गुरूच्या सद्य स्वरूपावर कुतर्की बुद्धीने किंवा द्विधा मनस्थितीने अविश्वास दाखविण्यापेक्षा कुतूहलापोटी किंवा जिज्ञासूवृत्तीने त्याला ओळखून त्याच्या अवतार कार्याविषयी अधिकाधिक जाणून घेणे; हेच आपल्यासाठी हितकारक असते; हे आपल्याला समजून घेतले पाहिजे.
सगुण म्हणजेच पृथ्वीवर सदेह असलेल्या सद्गुरुची भक्ती का करावी? ह्याचे परमपूज्य सद्गुरू बापूंनी विज्ञानाच्या आधारे दिलेले सुरेख विश्लेषण आपण पाहूया.
आज आपण Quantum Physics बघतो, म्हणजे काय? अणूतील इलेक्ट्रॉन्सचे विभाजन केले, पुन्हा पुन्हा विभाजन केले की शेवटी अशी अवस्था येते, जे उरतं ते कण आहेत आणि कण नाहीत पण. उर्जा आहे पण आणि नाही पण. एकाच वेळेस तो matter / practical / waves/ engery सगळं आहे. या basic level ला quanta म्हणतात. सूक्ष्म = quanta. ह्याला न्यूटनचे नियम लागू पडत नाहीत. भौतिक दुनियेचे नियम आणि quantum physics चे नियम ह्यात मोठा फरक आहे. भौतिक दुनियेत आपण ज्या भावनेवर, विचारावर, वस्तूवर लक्ष केंद्रित करतो, ते ध्येय आपलं होतं आणि quantum physics मध्ये ज्या गोष्टीवर फोकस करतो ती गोष्ट अदृश्य होते. स्थूलामध्ये आपण ज्या गोष्टीवर फोकस करतो ती मिळते, तर सूक्ष्मामध्ये ज्या गोष्टीवर फोकस करतो ती त्या जागेवरून नाहीशी होते, नष्ट होत नाही. ती आपल्याला दुसरीकडे शोधावी लागते. ती वस्तू एक सेकंदाचा एक हजारावा सेकंद, त्याचा एक हजारावा सेकंद आणि त्याचा १०० वा हिस्सा एवढ्या काळात ती निघून जाते. सारं विश्व क्षणभंगूर आहे, कळलं? इथे टाईमचे फोकस करण्याचे परिमाण वेगवेगळे आहेत. प्रत्येकजण इलेक्ट्रॉन-प्रोट्रॉनने बनलेले असतात. तुमच्यामध्ये आणि दगडामध्ये इलेक्ट्रॉन व प्रोट्रॉन आहेत म्हणजे तुम्ही दगड आहात का? quantum physics आणि स्थूल भौतिकाचे नियम वेगवेगळे असले तरी दोन्हीकडे महाप्राण आहे.
हनुमंत स्वत:ला ‘रामाचा दास’ म्हणवून घेतो आणि रामसीता त्याला ‘तात’ म्हणतात. जानकी माता म्हणते –
“कहेहु तात अस मोर प्रणामा । सब प्रकार प्रभु पुरनकामा । दीनदयाल बिरुदु संभारी । हरहु नाथ मम संकट भारी।’’
वाल्मिकी रामायणात, एकनाथ रामायणात असाच उल्लेख आहे. स्थूलामध्ये हनुमंत रामाचा दास आहे आणि quantum physics मध्ये सूक्ष्मामध्ये हनुमंत रामाचा तात आहे. आम्ही स्थूलात वावरतो म्हणून आम्हाला सगुण भक्ती करावी लागते आम्ही डोळे बंद करुन निराकारावर फोकस करू शकत नाही.
न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना ।
आणि सप्रेम जंव भक्ती घडेना । कळी उघडेना मनाची।
-सतीशसिंह पेडणेकर
दुबई