ग्रामीण कष्टकरी शेतकऱ्यांसाठी नियम शिथिल करणे आवश्यक

विमान प्रवासामध्ये सामाजिक अंतराचे वावडे, तर एस. टी. मध्ये नियमाची अमंलबजावणी का? – भाई चव्हाण

कणकवली:- `देशांतर्गत विमान प्रवासी सेवा सुरु झाली. वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये दाखविण्यात येणाऱ्या दृश्यांमध्ये विमानातील प्रवासी सामाजिक अंतर न पाळता लगत-लगतच्या बैठकामध्ये बसलेले दिसत होते. रेल्वेमधून प्रवास करणारेही प्रवासी सामाजिक अंतर पाळताना अभावाने दिसतात. मात्र शासनाने एस. टी. प्रवासामध्ये सामाजिक अंतर पाळण्यासाठी ५० टक्के प्रवाशांची अट लादली आहे. हा भेदभाव का? असा प्रश्न आज अनेकासमोर उभा ठाकला आहे!’ असे मत कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, पत्रकार भाई चव्हाण यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.

राज्य परिवहन महामंडळाने चार दिवसापासून प्रवासी वाहतूक सेवा सुरु केली आहे. या सेवेची घोषणा करताच खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आपला शेतमाल शहरात जाऊन विकायला मिळेल, अशी भाबडी आशा निर्माण झाली होती. पण एस टी. ने त्यावर नांगर फिरविला. पावसाळा तोंडावर आला आहे. शासनकर्ते खरीप पिकांची बेगमी करा, असे म्हणत आहे. मात्र बी-बियाण्याची बेगमी करावयाची असेल तर शहरात जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही, एस. टी. सेवा ही राज्यातील बळीराजाची धमणी आहे. मात्र गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एस. टी. च्या गाड्या केवळ तालुका ते तालुका शहर एवढ्या मार्गावर धावत आहेत. एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यातील शहरामध्ये काही कामानिमित्त बाहेर पडल्यास परत यायला एस. टी. मिळण्याची शाश्वती नसल्याने कोणी प्रवास करायला धजावत नाही. त्यामुळे अशा मार्गावरील फेऱ्या केवळ डिझेल जाळून प्रदूषण करण्याचे आणि एस. टी. ला तोट्यात लोटण्याचे काम करीत आहेत, असे स्पष्ट करून चव्हाण म्हणतात, त्याऐवजी खेड्यापाड्यातील सलग मार्गावरील गावातून दिवसाकाठी दोन-तीन फेऱ्या सोडल्यास शेतकऱ्यांना स्वत:कडील काजू, आंबा, फणस, कोकम, जांभूळ आदी उत्पादने शहरात आणून विकता येतील. चार पैसे हातात आल्यावर तो बी-बियाणे आदी शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करू शकेल. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ग्रामीण भागात फेऱ्या तातडीने सुरू करायला हव्यात. प्रवाशांनी आवश्यक काळजी घेऊन सामाजिक अंतर राखून प्रवास करायला हवा. मात्र सद्य परिस्थितीत ही अट काही प्रमाणात शिथिल करायला हवी.

You cannot copy content of this page