`अनिरुद्ध पहाट-४’ गुरुगीता- सद्गुरु माहात्म्याची सर्वोच्च पाऊलवाट!

।। हरि ॐ।।

जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्श दिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गदर्शन  करीत राहते. गुरुगीता श्रद्धायुक्त श्रवणाने व पठणाने सुद्धा सद्गुरु भक्तीचे माहात्म्य समजून येतेच; त्याचबरोबर आपसूकपणे सद्गुरूंचे नामस्मरण व गुणसंकीर्तन आपल्याकडून सहजपणे केले जाते. गुरुगीतेतून जगाला अंतिम सत्याचा, सर्वोच्च आनंदाचा मार्ग समजावून दिला आहे. तसेच गुरुगीता समजून घेतल्याशिवाय सद्गुरूंचे नामस्मरण व गुणसंकीर्तन पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून आजपासून थोडक्यात गुरुगीता पाहूया!

कैलासशिखरे रम्ये, भक्तिसंधान-नायकम् । प्रणम्य पार्वती भक्त्या, शंकरं पर्युपृच्छत ॥१॥

रम्य अशा कैलास शिखरावर, भक्तीचे साधन सांगण्यात कुशल असलेल्या श्रीशंकराला, भगवान शिवाला, भक्तीपूर्वक नमस्कार करून मोठ्या भक्तिभावाने पार्वतीने प्रश्न विचारला.

श्रीदेव्युवाच ।
ॐ नमो देवदेवेश, परात्पर जगद्‌गुरो।
सदाशिव महादेव, गुरुदीक्षां प्रदेहि मे ॥२॥

पार्वतीदेवी म्हणाली, हे देवांच्या देवा, परात्पर म्हणजे महानाहून महान अशा सद्गुरो, तुला प्रणाम ! सदा कल्याणप्रद शिवा, सर्व स्थळ, काळ व्यापून असणाऱ्या महादेवा, मला गुरुदीक्षा द्यावी. ॥२॥

केन मार्गेन भॊ स्वामिन्,
देही ब्रह्ममयो भवेत् ।
त्वं कृपां कुरु मे स्वामिन्,
नमामि चरणौ तव ॥३॥

हे स्वामिन्, देहधारी असूनही कोणत्या मार्गाने गेले असता ब्रह्ममय होता येईल ते कृपा करून सांगावे. हे स्वामी, हे गुरुदेव, मी आपल्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करते. ॥३॥

ईश्वर उवाच ।
ममरूपासि देवी त्वं,
त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहम् ।
लोकोपकारकः प्रश्नो,
न केनापि कृतः पुरा ॥४॥

हे देवि, तू माझेच दिव्य रूप, स्वरूप आहेस. तू प्रसन्न व्हावीस म्हणून सांगतो. सर्व लोकांना उपकारक असा हा प्रश्न पूर्वी कोणीही केला नाही. ॥४॥

दुर्लभं त्रिषु लोकेषु,
तच्छृणुष्व वदाम्यहम् ।
गुरुं विना ब्रह्म नान्यत्,
सत्यं सत्यं वरानने ॥५॥

हे श्रेष्ठ पार्वती ! तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्त्व मी सांगतो ते ऎक. श्रीगुरुच सदोदित ब्रह्म होय. श्रीगुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही. हे सत्य मी तुला द्विरुक्तीने सांगतो. ॥५॥

वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानि च ।
मंत्रयंत्रादिविद्याश्च, स्मृतिरुच्चाटनादिकम् ॥६॥

वेदशास्त्रे, पुराणे, इतिहास इ. तसेच मंत्रयंत्रादि विद्या, स्मृतिउच्चाटन, तीर्थ, व्रत, तप, साधना कितीही घडली तरी संसारबंधनातून मुक्तता होत नाही. ॥६॥

शैवशाक्तागमादीनि, अन्यानि विविधानि च ।
अपभ्रंशकराणीसह, जीवानां भ्रांतचेतसाम् ॥७॥

शैव, शाक्त, शास्त्रे, आणि इतर विविध पंथ चित्तभ्रांत जिवांना चुकीचा समज गैरसमज करून देण्यास मात्र कारणीभूत होतात. ॥७॥

यज्ञो व्रतं तपो दानं, जपरतीर्थं तथैव च।
गुरुतत्त्वमविज्ञाय, मूढास्ते चरते जनाः ॥८॥

यज्ञ, व्रत, तपश्चर्या, दानधर्म, जप, तीर्थयात्रा करणारे लोक जोवर गुरुतत्त्व जाणत नाहीत तोपर्यंत मूर्खासारखे भटकतात, वागतात. ॥८॥

गुरुबुद्धयात्मनो नान्यत्
सत्यं सत्यं न संशयः ।
तल्लाभार्थ प्रयत्नस्तु,
कर्तव्यो ही मनीषिभिः ॥९॥

ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. गुरुविषयी पूज्य बुद्धी, श्रद्धा असली की मग गुरुभक्ताला दुसरे काही कर्तव्य नाही, हे अगदी खरे (द्विवार सत्य) होय. ॥९॥

गूढविद्या जगन्माया,
देहे चाज्ञानसंभवा ।
उदयः स्वप्रकाशेन,
गुरुशब्देन कथ्यते ॥१०॥

ह्या देहात अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रूपात राहाते. आत्मप्रकाश वा आत्वविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरू शब्दाने तो उदय दर्शविला जातो. सद्गुरू स्वयंप्रकाशी असतो. ॥१०॥

सर्वपापविशुद्धात्मा,
श्रीगुरोः पादसेवनात् ।
देही ब्रह्म भवेद्यस्मात्,
तत्कृपार्थं वदाभि ते ॥११॥

श्रीगुरुचरणाच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते. त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप बनतो. त्या गुरुकृपेचे तत्त्व, तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो. ॥११॥

श्री शिवशंकराची आद्य आणि सर्वश्रेष्ठ भक्त म्हणजेच पार्वती माता! तिला साक्षात भगवान श्री शिवशंकरांनी सांगितलेले गुरुमाहात्म्य अतिशय पवित्र, शुभ आणि आमच्या जीवनात सद्गुरुंची कृपा प्रवाहित करणारे निश्चित आहे. (क्रमशः)

-`स्टार वृत्त’ ०३०५२०२५

अनिरुद्ध पहाट-१ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

अनिरुद्ध पहाट-२ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

अनिरुद्ध पहाट-३ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

 

error: Content is protected !!