`अनिरुद्ध पहाट-७’ तस्मै श्रीगुरवे नमः॥

।। हरि ॐ।।

भारतीय सनातन संस्कृतीमध्ये ज्या श्लोकाला अनन्यसाधारण महत्व आहे असा श्लोक, सर्व श्रद्धावानांच्या आवडीचा श्लोक, सर्व संतांच्या आवडीचा श्लोक जो प्रेमाने, आनंदाने आणि भावयुक्त श्रद्धेने म्हटला जातो तो श्लोक पुढे आला आहे. ह्या श्लोकातून सद्गुरुतत्वाचे माहात्म्य अधोरेखित होते!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः॥३२॥

गुरु स्वतःच ब्रह्मा, विष्णू, सदाशिव होय. गुरुच परब्रह्म होय. अशा श्रीगुरुला नमस्कार करावे.

हेतवे जगतामेव, संसारार्णवसेतवे। प्रभवे सर्वविद्यानां, शंभवे गुरवे नमः॥३३॥

जगाच्या उत्पत्तीचा हेतु, संसारसागर पार पाडणारा सेतू आणि सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदय – स्थान – धातू असणाऱ्या शिवरूप गुरुला नमन असो.

अज्ञानतिमिरांधस्य, ज्ञानांजनशलाकया। चक्षुरुन्मीलितं येन, तस्मै श्रीगुरवे नमः॥३४॥

अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जिवाच्या नेत्रांत ज्याने ज्ञानस्वरूपी अंजन घालून दिव्य चक्षू उघडले आणि त्याला आत्मस्वरूपाचा महानिधि दाखविला त्या श्रीगुरुला नमस्कार असो.

त्वं पिता त्वं च मे माता, त्वं बंधुस्त्वं च देवता। संसारप्रतिबोधार्थं, तस्मै श्रीगुरवे नमः ॥३५॥

संसाररूपी मायेतून जाग येण्यासाठी, संसारातून निवृत्त होण्यासाठी हे गुरो, तूच माझा पिता, तूच माता, तूच बंधू आणि तूच माझी इष्ट देवता होय. अशा तुला नमस्कार.

यत्सत्येन जगत्सत्यं, यत्प्रकाशेन भाति तत्। यदानंदेन नंदंति, तस्मै श्रीगुरवे नमः॥३६॥

ज्याच्या अस्तित्वामुळे जगाला अस्तित्व आले आहे, ज्याच्या प्रकाशाने हे जग प्रकाशते, ज्याच्या आनंदमयी आणि आनंददायी स्वरूपामुळे सर्व आनंदित आणि सुखी होतात, अशा त्या सच्चिदानंदरूप श्रीगुरुला नमस्कार असो.

यस्य स्थित्या सत्यमिदं, यद्बाति भानुरूपतः। प्रियं पुत्रादि यत्प्रीत्या, तस्मै श्रीगुरवे नमः॥३७॥

ज्याच्या अस्तित्वामुळे हे जग खरे, नित्य भासते, जो सूर्यरूप असल्याने सर्वांना प्रकाशित करतो, ज्याच्या प्रीतीमुळे पुत्रादि सर्व प्रिय वाटतात अशा गुरूला नमस्कार असो.

येन चेतयते हीदं, चित्तं चेतयते न यम्। जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादि, तस्मै श्रीगुरवे नमः॥३८॥

ज्याच्यामुळे हे जग ह्या चेतन स्वरूपाने अनुभवास येते, ज्याच्यामुळे ह्या विश्वाला, व्यक्तींना चेतना, सजीवता प्राप्त होते, चित्त ज्याला प्रकाशित करू शकत नाही, जागृति, स्वप्न, सुषुप्ती आदि अवस्था ज्याच्या द्वारा प्रकाशित होतात अशा त्या गुरूला नमस्कार.

यस्य ज्ञानादिदं विश्वं, न दृश्यं भिन्नभेदतः। सदेकरूपरूपाय, तस्मै श्रीगुरवे नमः॥३९॥

ज्याने दिलेल्या ज्ञानामुळे हे विश्व शिवाहून भिन्न अथवा भेदरूप दिसत नाही, अभेदयोग ज्याच्यामुळे साध्य होतो, एक मात्र सत् हेच ज्याचे रूप होय; अशा श्रीगुरुला नमस्कार असो.

‘यस्यामतं तस्य मतं, मतं यस्य न वेद सः’। अनन्यभावभावाय, तस्मै श्रीगुरवे नमः॥४०॥

ज्याला वाटते आपल्याला ब्रह्मज्ञान झालेले नाही, त्याला ते झालेले असते, ज्याला आपण स्वतः ज्ञानी आहोत असे वाटते तो अज्ञानी असतो. गुरुमध्ये भेदभाव नसतो. तो पूर्ण अभेदयोगी असतो. अशा श्रीगुरुला नमस्कार असो.

यस्य कारणरूपस्य, कार्यरूपेण भाति येत्। कार्यकारणरूपाय, तस्मै श्रीगुरवे नमः॥४१॥

जगाचे मूळ कारण सद्गुरु, श्रीगुरुचे कार्य जगत् रूपाने भासते. अशा कार्यकारणरूपी गुरूला नमस्कार असो.

नानारूपमिदं सर्वं, न केनाप्यास्ति भिन्नता। कार्यकारणता चैव, तस्मै श्रीगुरवे नमः ॥४२॥

नानारूपी ह्या विश्वात, कोठेही कसलीही भिन्नता नाही, केवळ कार्यकारणभावच आहे. विविधरूपे ही गुरुहून अभिन्न आहेत. अशा श्रीगुरुला नमस्कार.

सद्गुरुंशिवाय मानवाला मानवपण येईल काय? शक्यच नाही. म्हणूनच सद्गुरुंशिवाय मानवाला तरणोपाय नाही आणि तारणाराही दुसरा कोणी नाही! अशा सद्गुरुला माझा साष्टांग दंडवत!

-`स्टार वृत्त’ ०६०५२०२५

अनिरुद्ध पहाट-६ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

error: Content is protected !!