सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अंकुश डामरे यांची समाजाप्रती तळमळ आत्मसात करुया!

स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना!

कणकवली:- “असलदे गावातील विकास प्रक्रियेत व सरस्वती हायस्कुल नांदगाव या शैक्षणिक संस्थेच्या उभारणीमध्ये गावचे माजी सरपंच स्वर्गीय अंकुश डामरे यांचे मोठे योगदान होते. त्यांनी संपूर्ण जीवनात एक सामाजिक बांधिलकी स्वीकारत केलेले कार्य आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या काळात त्यांनी केलेले कार्य व समाजाप्रती ठेवलेली तळमळ आत्मसात करुया!” अशा शब्दांत स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या प्रथम स‌मृतीदिनी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहताना भावना व्यक्त केल्या.

असलदे डामरेवाडी येथे डामरे कुटुंबियांच्यावतीने स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाला असलदे गावाचे सरपंच चंद्रकांत डामरे, असलदे सोसायटी चेअरमन पत्रकार भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, सिंपनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अनिल तांबे, पत्रकार नरेंद्र हडकर, उद्योजक सुरेश डामरे, सुनिल डामरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल तांबे म्हणाले की, स्वर्गीय अंकुश डामरे यांनी त्यावेळी असलदे गावासाठी व पंचक्रोशीसाठी केलेलं काम अतुलनीय आहे. गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, सरस्वती हायस्कुल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. नांदगाव पंचक्रोशीत माध्यमिक शिक्षणाची सोय होण्यासाठी सरस्वती हायस्कुल उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. कारण त्यांना त्यावेळी शिक्षणाचे महत्व समजले होते. गावाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आम्हाला कधीही विसरता येणार नाही. गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी गावात एखादे सुसज्ज वाचनालय उभे करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. अशाप्रकारे कार्य करून आपण स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या स्मृती निरंतर जपू शकतो.

सोसायटीचे चेअरमन पत्रकार भगवान लोके आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, स्वर्गीय अंकुश डामरे यांनी त्याकाळात स्वतंत्र असलदे ग्रामपंचायतीचे आणि शेतकऱ्यांच्या सोसायटीचे रोपटे लावले. ते इवलेशे लावलेले रोपटे आज खूप मोठे विस्तारले आहे. त्यावेळी सोसायटीचे रोपटे लावले नसते तर मी आज तुमच्यासमोर सोसायटीचा चेअरमन म्हणून आलोच नसतो. त्यांनी केलेल्या निःस्वार्थी श्रमातून सरस्वती हायस्कुल उभे राहिले आणि पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. स्वर्गीय अंकुश डामरे यांनी पंचक्रोशीतील शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी दूरदृष्टीने निर्णय घेतले आणि त्यावर अंमलबजावणी केली. त्यांचा आदर्श घेऊन आता आम्ही पुढील वाटचाल करीत आहोत.

स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकार नरेंद्र हडकर म्हणाले की, स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आपल्या जीवनात गावाच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व दिले. असलदे – कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी केलेली विकासाची कामे आजही उभी आहेत. त्यावेळी बांधलेल्या विहिरी आजही आपणास पाहावयास मिळतील. अशाप्रकारची दर्जेदार कामे त्यावेळी स्वर्गीय अंकुश डामरे यांनी करून घेतली. सरस्वती हायस्कुल उभारण्यासाठी त्यांनी जे अपार कष्ट केले; ते निरंतर स्मरणात राहतील. शिक्षणाचं महत्व त्यांनी त्याकाळात ओळखलं आणि हायस्कुल उभं केलं म्हणून पंचक्रोशीत शैक्षणिक विकास झाला. ह्याचा विचार करून भविष्यात असलदे गावात एक सुंदर वाचनालय उभे राहायला पाहिजे आणि सामाजिक कार्य झाले पाहिजे.

श्री. जयराम डामरे यांनी भावुक होऊन म्हणाले की, आपले जीजी अद्यापही आपल्यात आहेत! जरी शरीराने गेले तरी त्यांचे विचार आपल्यासोबत कायम आहेत. या कार्यक्रमात सरपंच चंद्रकांत डामरे यांनीही स्वर्गीय अंकुश डामरे यांना श्रद्धांजली वाहिली.

भजन झाल्यानंतर श्री. नंदादिप वंजारे बुवा आयोजकांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून देतात. जेणेकरून श्री ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार होईल. छायाचित्रात डावीकडून असलदे गावचे सरपंच श्री. चंद्रकांत डामरे, श्री. नंदादिप वंजारे बुवा, सामाजिक कार्यकर्ते सुरेश डामरे आणि इतर मान्यवर

त्यानंतर भजन सम्राट श्री. प्रकाश पारकर बुवा आणि भजन सम्राट श्री. नंदादिप वंजारे बुवा ययांचा आध्यात्मिक संगीत डबलबारी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री. प्रकाश पारकर बुवांनी स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुंदर गजर म्हटला; तर श्री. नंदादिप वंजारे बुवांनी प्रथम स्मृतिदिनानिमित्त भजनाचा कार्यक्रम ठेवण्यामागील आध्यात्मिक मीमांसा स्पष्ट केली. दोनही बुवांनी अतिशय सुंदर भजन केले.

error: Content is protected !!