भजन व कीर्तनाच्या नंदादीपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही गडद अंधार असला तरी एक दीप लावताच जो प्रकाश पडतो त्याने अंधार नाहीसा होतो! महाकाय अज्ञानरूपी अंधार नाहीसा करण्यासाठी ज्ञानरूपी प्रकाश देणारा इवलाचा दीप पुरेसा ठरतो! हे सामर्थ्य प्रकाशाचे आहे, ज्ञानाचे आहे, परमात्म्याच्या भक्तीचे आहे, सद्गुरुच्या चरणांचे आहे, समाजाची सेवा करण्याचे आहे. भजन-कीर्तन-नामस्मरणाचे आहे, खऱ्याखुऱ्या संतांनी दाखविलेल्या देवयान पंथाचे आहे, भगवंतावरील प्रेम, श्रद्धा व सबुरीचे आहे. म्हणूनच सनातन भारतीय वैदिक धर्मात प्रकाशाला अर्थात दीपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा दिप जेव्हा देवापाशी प्रज्वलित केला जातो तेव्हा तो ‘नंदादीप’ होतो! अशाच एका परमात्म्याच्या निस्सीम भक्ताचा अर्थात श्रद्धावान ह. भ. प. श्री. नंदादीप वंजारे बुवा यांचा आज वाढदिवस! त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा लेखनप्रपंच!
भजन आणि कीर्तन हे समाजप्रबोधनाचे अतिशय प्रभावी माध्यम! माणसाला माणूसकी, सत्कर्म, धर्म शिकविण्यासाठी आणि त्याला सुसंस्कृत- सुसंस्कारित करण्यासाठी, परमात्म्याचे नामस्मरण- भक्ती करण्यासाठी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून प्रयास करणारे ह. भ. प. श्री. नंदादीप वंजारे बुवा यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेली सेवा आदर्शवत आहे.
आनंद युवा संघाच्या माध्यमातून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलेले सत्कार्यही वाखाणण्याजोगे आहे. नवोदित कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात ते नेहमीच पुढाकार घेतात. ज्या युवक – युवतींना भजन शिकायचे आहे त्यांना ते प्रशिक्षित करतात. समाज सुसंस्कारित झाल्यास अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत! सनातन भारतीय वैदिक धर्माचे अधिष्ठान जपण्यासाठी त्यांची मनापासून असलेली तळमळ नेहमीच जाणवते! “भविष्यात काय होईल माहित नाही; पण मी माझं कार्य परमेश्वराला स्मरून प्रामाणिकपणे करीत राहणार! त्यातून नक्कीच परमात्म्याला अभिप्रेत असणारे कार्य घडेल!” हे त्यांचे बोल त्यांच्या ज्ञानाचा, प्रामाणिकपणाचा व सामर्थ्याचा सद्गुण प्रकट करतात. ते स्वतः प्रसिद्धपासून दूर राहतात. त्यांना त्यांची स्तुती आवडणार नाही; परंतु त्यांचे कार्य समाजासमोर मांडणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो! चांगल्या उचित गोष्टी समाजासमोर आल्या तरच समाज प्रबोधन होऊ शकेल! म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांचे कौतुक करीत आहोत! ते त्यांनी परमात्म्याच्या चरणी अर्पण करावे!
ह. भ. प. श्री. नंदादीप वंजारे बुवा यांना आमच्या पाक्षिक ‘स्टार वृत्त’ परिवारातर्फे वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत व त्यांना सदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य मिळो; ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना!
-नरेंद्र हडकर
संपादक- पाक्षिक ‘स्टार वृत्त’