माणगाव येथे ‘आंतरपिढी स्नेहबंध’ विषयावर जनजागृती कार्यक्रम!
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ कायदे तज्ञ व संस्थेच्या अध्यक्षा निर्मला सामंत- प्रभावळकर यांची मार्गदर्शक उपस्थिती!
जेष्ठ नागरिकांविषयी आदर, कृतज्ञता व पिढ्यानपिढ्यांतील स्नेहबंध दृढ करण्यासाठी जनजागृती उपक्रम!
सावंतवाडी (मोहन सावंत):- जेष्ठ नागरिकांविषयी आदर, कृतज्ञता व पिढ्यानपिढ्यांतील स्नेहबंध दृढ करण्यासाठी ज
नजागृती उपक्रम अंतर्गत माणगाव येथे ‘आंतरपिढी स्नेहबंध’ विषयावर जनजागृती कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून त्यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ कायदेतज्ञ निर्मला सामंत- प्रभावळकर यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार) यांच्या अंतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) मुंबई व प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (RRTC) मुंबई यांच्या वतीने तसेच माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन (IDOP) २०२५ च्या पार्श्वभूमीवर “आंतरपिढी स्नेहबंध” या विषयावर एक दिवसीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास महाराष्ट्रातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ कायदे तज्ञ व संस्थेच्या अध्यक्षा निर्मला सामंत- प्रभावळकर यांची मार्गदर्शक उपस्थिती लाभणार आहे. निर्मला सामंत- प्रभावळकर ह्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. मुंबईतील नागरी प्रश्नांवर त्यांनी केलेले कार्य लक्षणीय ठरले. त्यानंतर दादरच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी तेथील प्रशासनाला गतिमान केले. तर महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांनी राज्यातील महिलांच्या समस्यांवर लक्षणीय कार्य केले. राष्ट्रीय महिला आयोगात आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करताना त्यांनी जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व दुर्लक्षित घटक यांच्या प्रश्नावर विधायक कार्य केले आहे. आजही त्या कार्यरत आहेत. ॲड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांनी कायदा महाविद्यालयात अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले असून महाराष्ट्रात त्या नामवंत कायदेतज्ञ म्हणून ओळखल्या जातात. विशेष म्हणजे त्या सिंधदुर्गाच्या कन्या आहेत. त्या स्वतः आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर “आंतरपिढी स्नेहबंध” या विषयावर होणाऱ्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार असून त्यांच्या गेल्या पन्नास वर्षातील सामाजिक कार्याच्या प्रचंड अनुभवाचा लाभ कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना मिळणार आहे.
कार्यक्रम संयोजनाची जबाबदारी सौ. निलीमा येतकर यांच्यावर असून सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांविषयी आदर, कृतज्ञता व पिढ्यानपिढ्यांतील स्नेहबंध दृढ करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक यांनी उपस्थित राहावे; असे आवाहन श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.
आज विशेषतः सिंधुदुर्गामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून त्यातील अनेक जेष्ठ नागरिकांची मुले नोकरी -व्यवसाय निमित्ताने मुंबई- पुण्यासारख्या शहरात राहतात अशा जेष्ठांना त्यांना गावातील शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागते. वैद्यकीय सुविधेसाठी दुसऱ्यांवर अबलंबून राहावे लागते, जमिनी खरेदी – विक्री करणाऱ्या दलालांचा त्रास जेष्ठांना होत असतो. अनेक ठिकाणी एसटी गावात यायच्या बंद झाल्या आहेत; त्यामुळे डॉक्टरकडे जाण्यासाठी- बाजारात जाण्यासाठी जेष्ठांना रिक्षा चालकांवर मदत घ्यावी लागते. अशा अनेक समस्या सिंधुदुर्गातील जेष्ठ नागरिकांच्या आहेत. त्या सर्व समस्यांवरती सकारात्मक चर्चा करून जेष्ठ नागरिकांशी पुढील पिढीने कसे वागावे? त्यांना कसे सहकार्य करावे? ह्याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.










