भाजप सहकार आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी मोहन सावंत यांची नियुक्ती!

मुंबई ( प्रतिनिधी ) – भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सहकार क्षेत्रात व प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले नेते मोहन सावंत यांची नियुक्ती मुंबईचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर यांनी केली आहे. आज दादर, मुंबई येथे झालेल्या भाजपा सहकार आघाडीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाची सहकार आघाडी सहकार नेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, नामदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. मुंबईतही सहकार आघाडीचे कार्य अधिक व्यापक आणि सक्षम करण्यासाठी मुंबईचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर नेहमीच अग्रस्थानी असतात. आज दादर येथे भारतीय जनता पक्षाची सहकार आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी मोहन सावंत यांची निवड करण्यात आली. त्यावेळी भाजपा सहकार आघाडीचे उपाध्यक्ष संतोष दरेकर, रवींद्र जयस्वाल, मुंबई सचिव श्रीमती. शिल्पाताई गुरव, जिल्हा अध्यक्ष अमोल खरात, रतीश साटम, सचिन हनवते, आनंद देऊळकर व समस्त सहकार आघाडीचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मोहन सावंत यांची मित्रमंडळी मायकल परेरा, सुधीर हडकर, कुंभार, लुईस विलफ्रेड पिंटो, किसन सावंत, नितीन जोशी, चैतन्य हडकर उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष सहकार आघाडी मुंबईचे महामंत्री सुधाकर कदम यांनी मोहन सावंत यांचा परिचय करून दिला. मोहन सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीचे प्रदेश संयोजक, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबईचे अध्यक्ष सुनिल बांबुळकर व मुंबईचे महामंत्री सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी सहकार क्षेत्रात कार्यक्षमतेने कार्य करणार आहे. मला सहकार क्षेत्रात कार्य करण्याची संधी दिली त्याबद्दल मी वरिष्ठांचा आभारी आहे. त्यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास कार्यातून सार्थकी लावीन!”
श्री. मोहन सावंत हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांना आरोग्य विभाग, राज्य निवडणूक आयोग, मंत्रालय, राज्य महिला आयोग, म्हाडा येथे विविध शासकीय पदांवर काम केल्याचा दीर्घ अनुभव आहे. तसेच अनेक सहकारी संस्था व सेवाभावी सामाजिक संस्थांवर ते कार्य करीत आहेत. ते स्टार वृत्त चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन अर्थात महिलांसाठी पुनर्वसन आणि संशोधन केंद्र ह्या विख्यात न्यासावर सरचिटणीस ह्या पदांवर कार्यरत आहेत. तसेच पाक्षिक `स्टार वृत्त’ ह्या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणूनही ते काम पाहतात. मोहन सावंत उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आणि आणि ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहेत. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दांडगा संपर्क आहे.
मोहन सावंत यांची भाजपच्या सहकार आघाडीत मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.










