बोध कथा- भुलथापांचा राजा आणि सत्य सांगणारा आरसा!
एके काळी एक मोठे आणि समृद्ध राज्य होते!
त्या राज्याचा राजा मात्र अडाणी, स्वार्थी आणि सत्तेच्या नशेत होता.
त्याला जनतेच्या समस्या जाणून घ्यायच्या नव्हत्या!
त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती;
जनतेने त्याची स्तुती करावी!
म्हणून त्याने आपल्या दरबारात काही भाट ठेवले.
राजा काहीही बोलला की ते टाळ्या वाजवायचे.
राजाने चुकीचा निर्णय घेतला?
“महाराजांची दूरदृष्टी!”
राजाच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला?
“राज्याच्या विकासासाठी कठोर निर्णय!”
मंदिरातील पैशांचा गैरव्यवहार झाला?
“धर्मकार्याची नवी पद्धत!”
जनतेला त्रास झाला?
“शत्रूंचे कारस्थान!”
आणि जो कोणी यावर प्रश्न विचारायचा…
त्याला लगेच राजद्रोही ठरवले जायचे!
पण त्या राज्यात एक माणूस होता!
त्याचे नाव होते सत्यदर्शी.
तो राजाचा शत्रू नव्हता.
त्याला सत्ता नको होती.
पद नको होते.
फायदा नको होता.
त्याला फक्त आपल्या राज्याचे भले हवे होते.
एक दिवस त्याने राजाला सांगितले,
“महाराज, राज्यातील रस्ते खराब झाले आहेत.
जनतेला पाण्यासाठी त्रास होत आहे.
शेतकरी अडचणीत आहेत.
सरकारी कार्यालयात सामान्य माणसाला कामासाठी चकरा माराव्या लागत आहेत.
भ्रष्टाचार वाढला आहे.
आणि मंदिरांच्या देणग्यांचाही पारदर्शक हिशेब नाही.”
दरबारात शांतता पसरली.
राजाचा चेहरा लाल झाला. तो म्हणाला,
“माझ्या राज्यात सर्व काही उत्तम चालले आहे!
तू जनतेत असंतोष पसरवत आहेस.
तू राज्यद्रोही आहेस!”
भाट ओरडले…
“राजद्रोही! राजद्रोही!”
सत्यदर्शीला दरबारातून हाकलून देण्यात आले.
काळ पुढे सरकत गेला…
राजाच्या घोषणा मात्र वाढत राहिल्या.
“सुवर्णयुग आले!”
“जनता सुखी आहे!”
“राज्य प्रगती करत आहे!”
टाळ्या वाजत राहिल्या…
पण जमिनीवरचे वास्तव बदलत नव्हते.
रस्ते तुटत होते.
पाणी कमी होत होते.
रोजगार घटत होता.
महागाई वाढत होती.
भ्रष्टाचार वाढत होता.
जनता त्रस्त होत होती.
आणि राजाच्या तिजोरीतला पैसा…
हळूहळू गायब होत होता.
पण राजाला काहीच कळत नव्हते.
कारण त्याच्या सभोवताली फक्त एकच प्रकारचे लोक होते…
“महाराज, आपण महान आहात!” म्हणणारे!
आणि मग एक दिवस…
राज्यावर भयंकर संकट आले.
दुष्काळ पडला.
धान्याची कमतरता निर्माण झाली.
पाणी संपले.
जनता अन्नासाठी राजवाड्याच्या दारात जमा झाली.
राजाने आपल्या मंत्र्यांना विचारले;
“मदतीसाठी ठेवलेला पैसा कुठे आहे?”
सगळे शांत!
“धान्याची कोठारे कुठे आहेत?”
शांतता!
“पाण्याची व्यवस्था का केली नाही?”
शांतता!
राजाने भाटांकडे पाहिले.
तेही पहिल्यांदाच गप्प होते.
कारण…
खोट्या स्तुतीने कोठारे भरत नाहीत!
खोट्या घोषणांनी विहिरीत पाणी येत नाही!
आणि टाळ्यांच्या आवाजाने भुकेल्या पोटाची आग शांत होत नाही!
राजाला अचानक सत्यदर्शीची आठवण झाली.
त्याला शोधून आणण्यात आले.
राजाने विचारले;
“माझे राज्य असे का झाले?”
सत्यदर्शी शांतपणे म्हणाला;
“महाराज…
राज्य एका दिवसात नष्ट होत नाही.
ते आधी सत्य गमावते.
नंतर प्रामाणिक माणसे गमावते.
नंतर व्यवस्था गमावते.
आणि शेवटी…
जनतेचा विश्वास गमावते.
आपल्या दरबारात आरसा ठेवण्याऐवजी आपण भाट ठेवले.
म्हणून आपल्याला आपला चेहरा कधीच दिसला नाही.”
राजा स्तब्ध झाला.
तेव्हा सत्यदर्शीने शेवटचे वाक्य सांगितले—
“महाराज,
राजाला शत्रूंपेक्षा भाट अधिक धोकादायक असतात.
शत्रू तुमच्या कमजोरीवर हल्ला करतो; पण भाट तुमची कमजोरी तुम्हालाच सामर्थ्य असल्याचा भ्रम देतात!”
राजाच्या डोळ्यांत पहिल्यांदा भीती दिसली.
कारण त्याला समजले होते;
राजवाड्याच्या भिंती मजबूत असल्या तरी,
जनतेचा विश्वास ढासळला की सिंहासन जास्त काळ टिकत नाही!”
तात्पर्य…
स्वार्थी राजा स्वतःची स्तुती ऐकतो;
दूरदृष्टीचा राजा स्वतःची चूक ऐकतो.
भाट राजाला सुखावतात;
निर्भीड नागरिक राज्य वाचवतात.
भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण आणि सत्य बोलणाऱ्यांना शिक्षा मिळू लागली की, राज्याचा ऱ्हास सुरू झालेला असतो.
आणि लक्षात ठेवा—
राजा कितीही शक्तिशाली असला,
तरी सत्यापेक्षा मोठा नसतो!”
“ज्या दिवशी प्रजा प्रश्न विचारणे थांबवते,
त्या दिवशी सत्तेचा गैरवापर सुरू होतो.”
“आणि ज्या दिवशी सत्य बोलणाऱ्याला राजद्रोही म्हटले जाते,
त्या दिवशी राज्याच्या पतनाची घंटा वाजलेली असते!
कारण…
सत्ता कायमची नसते!
पण इतिहासाचा आरसा कायमचा असतो!
-विजय हडकर










