क्षा. म. समाज संस्थेच्या विश्वस्तपदी आमदार रविंद्र फाटक यांची नियुक्ती करण्याची मागणी!
समाज संस्थेच्या विश्वस्त मंडळाला सभासद व समाजबांधवांच्या सह्यांचे सामूहिक निवेदन!
क्षा. म. समाज संस्थेच्या विश्वस्त, सुकाणू, कार्यकारिणी आणि परिवर्तन समितीची संयुक्त सभा २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता घेण्याची आमदार श्री. रविंद्र फाटक यांची समाज संस्थेला सूचना!

मुंबई:- क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आमदार श्री. रविंद्र फाटक यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी सामूहिक मागणी संस्थेचे विद्यमान सभासद, माजी पदाधिकारी, आजी-माजी कार्यकारिणी सदस्य तसेच समाजबांधव व भगिनी यांनी केली आहे. या मागणीसाठी सुमारे २०० हून अधिक जणांच्या सह्यांचे सामूहिक निवेदन संस्थेच्या विश्वस्त मंडळ, अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. यापुढेही अशाप्रकारची निवेदनं समाज संस्थेकडे देण्यात येणार आहेत.
सन १९३५ मध्ये स्थापन झालेली क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था ही समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी गेल्या नऊ दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह मुंबई येथे संस्थेने उभारलेल्या शैक्षणिक संस्था आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे संस्थेला महाराष्ट्रात ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या गौरवशाली परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच संस्थेच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी अनुभवी आणि समाजाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आमदार रविंद्र फाटक यांना राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असून, विविध क्षेत्रांतील त्यांचा लोकसंपर्क आणि प्रशासकीय कामकाजाची जाण संस्थेच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषतः संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे, विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणे, विकासात्मक योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे आणि संस्थेची प्रतिष्ठा वृद्धिंगत करणे यासाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
संस्था ही केवळ शैक्षणिक किंवा सामाजिक संघटना नसून अनेक पिढ्यांच्या योगदानातून उभी राहिलेली समाजाची ऐतिहासिक व अमूल्य ठेव आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार संस्थेला अधिक सक्षम, गतिमान व प्रगतिशील बनविण्यासाठी अनुभवी आणि कर्तृत्ववान व्यक्तींना संस्थेच्या नेतृत्वप्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
संस्थेचे विद्यमान सभासद, माजी पदाधिकारी व आजी-माजी कार्यकारिणी सदस्यांनी एकत्रितपणे केलेल्या या मागणीचा सकारात्मक विचार करून संस्थेच्या घटनेतील तरतुदी व लागू कायदेशीर प्रक्रियेनुसार आमदार रविंद्र फाटक यांच्या विश्वस्तपदाच्या नियुक्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती विश्वस्त मंडळाला करण्यात आली आहे.
आता या सामूहिक निवेदनावर सिंधुदुर्गातील देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील तसेच ठाणे, मुंबई उपनगर व मुंबई शहरातील समाज बांधव भगिनींच्या सह्या आहेत. संस्थेचे विश्वस्त मंडळ काय भूमिका घेते आणि या मागणीबाबत कोणता निर्णय घेते? याकडे संस्थेच्या सभासदांसह समाजबांधवांचे लक्ष लागले आहे. क्षा. म. समाज बांधव भगिनींची मागणी पाहता १८ नोव्हेंबर २०२६ रोजी क्षा. म. समाज परिवर्तन समितीने आमदार आमदार श्री. रविंद्र फाटक यांची भेट घेऊन समाज संस्थेचे विश्वस्त पद स्वीकारण्याची विनंती केली होती. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. दरम्यान क्षा. म. समाज संस्थेच्या विश्वस्त, सुकाणू, कार्यकारिणी आणि क्षा. म. समाज परिवर्तन समितीची संयुक्त सभा रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता घेण्यात यावी; असे पत्र आमदार श्री. रविंद्र फाटक यांनी संस्थेला दिले आहे.
क्षा. म. समाज संस्थेच्या विश्वस्तपदी आमदार रविंद्र फाटक यांची नियुक्ती करण्याची मागणी करणारे सभासद व समाजबांधवांच्या सह्यांचे सामूहिक निवेदन १९ नोव्हेंबर रोजी क्षा. म. समाज संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र वाळके आणि २४ नोव्हेंबर रोजी क्षा. म. समाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी क्षा. म. समाज परिवर्तन समितीचे अध्यक्ष सुनिल जेठे, सरचिटणीस सुरेश डामरे, खजिनदार राकेश कांबळी, उपाध्यक्ष समीर हडकर, क्षा. म. समाज संस्थेचे कार्यकारणी सदस्य अनंत बांदिवडेकर व संदीप धोपटे, माजी उपाध्यक्ष प्रकाश वाळके, तसेच अनिल साळगावकर, सचिन लोके, महेश कांबळी, पत्रकार नरेंद्र हडकर उपस्थित होते.










