वाटद कवठेवाडी शाळेच्यावतीने मातृदिन उत्साहात
खंडाळा (प्रतिनिधी):- आपण दरवर्षी वर्षभर विविध उपक्रमाच्या वा कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध प्रकारचे दिन साजरे करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत आपल्याला जन्म देणाऱ्या आईच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातृदिन साजरा करण्यात आला.
सध्या सर्वत्रच कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या कोविड – १९ या आजाराचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेक प्रतिबंधात्मक निर्बंध शासनाच्यावतीने लावण्यात आले आहेत. त्या नियमांचे पालन करत या दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आले. त्यामध्ये आपल्या आईच्या कार्याप्रति आदर आणि आईच्या कार्याचे महत्व पटवून देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आईला पत्र लिहून तिच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या आईला पत्र लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यानंतर याच दिनाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येक सुखदुःखात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतानाच त्या सुखदुःखावर मात करतानाच नवी प्रेरणा देणारी वात्सल्यामुर्ती म्हणजे आई. याच आईचे पूजन करून तिचे विद्यार्थ्यांचे हस्ते औक्षण करण्यात आले. हा क्षण सर्वच आईसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनात्मक बनला होता.
या दोन्ही उपक्रमाची माहिती सध्या शाळा बंद असल्याने ऑनलाइन पद्धतीने शाळेतील शिक्षक श्री. माधव अंकलगे आणि श्री. गोविंद डुमनर यांनी दिली. त्यानंतर ज्यांच्याकडे मोबाईलवरून ऑनलाइन पद्धतीने व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांना फोनवरून सुचना देण्यात आल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आईप्रती असणारे प्रेम आणि तिचे महत्व आपल्या पत्रातून व्यक्त केले आणि आपल्या आईप्रती असणारा पूज्यभाव आईचे पूजन करून व्यक्त केला.
सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने आणि कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील दोन्ही शिक्षक हे सध्या आपत्कालीन सेवेतून पोलीस मित्र, आरोग्य मित्र आणि माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी या उपक्रमात असतानाही शाळेतील विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून म्हणजेच मुख्यालय न सोडता मातृदिनसारखा अत्यंत उपयुक्त आणि संस्कारक्षम उपक्रम राबविल्याबद्दल पालकामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास बारगुडे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सखाराम तथा अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा वैशाली कुर्टे, शिक्षणतज्ञ भाऊ धनावडे, सदस्य श्वेता धनावडे, रमेश तांबटकर, स्वाती धनावडे, निकिता कुर्टे यांच्यासह सर्वच पालकांचे सहकार्य लाभले.