कणकवली कॉलेज लसीकरण केंद्रावर नियोजन नसल्याने जनतेला नाहक त्रास

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली येथील आरोग्य यंत्रणेने नियोजन न केल्याने लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आणि शारीरिक दुरीचा फज्जा उडाला. तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आणलेल्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली. ह्या संदर्भात ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने वैद्यकीय अधिक्षक- उपजिल्हा रुग्णालय कणकवली, जिल्हा शल्य चिकित्सक-सिंधुदुर्ग आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

यासंदर्भात ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालय कणकवली मार्फत कणकवली कॉलेज येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. काल पाहणी केली असता सदर ठिकाणी गैरसोयी असल्याचे निदर्शनास आले. ह्या ठिकाणी शारीरिक दुरी राखली जात नाही. लसीचा दुसरा डोस देण्याचे काम सुरु आहे: परंतु सदर दुसरा डोस कोणत्या तारखेला घ्यावा, ह्याची डोस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना कल्पनाच नव्हती म्हणून विनाकारण गर्दी होत आहे आणि यासंदर्भात आरोग्य कर्मचारी डोस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना काहीच माहिती माहिती देत नाहीत. माहिती मिळविण्यासाठी येणाऱ्यांची एकाच ठिकाणी गर्दी होते. ह्या गर्दीमध्ये कोविड-१९ पॉजिटिव रुग्ण असल्यास अनेकांना त्याची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या ठिकाणी सॅनिटायझरची सोय करण्यात आलेली नाही.

सदरचे लसीकरण केंद्र रुग्णालयापासून लांब असल्याने जर लस घेतल्यानंतर एखाद्याला त्रास झाला तर तिथून रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय नाही. इथे चौकशी कक्ष असणे आवश्यक आहे. कारण आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सहजपणे माहिती दिली जात नाही. याबाबत योग्य ते नियोजन त्वरित करून लसीकरण केंद्रावर डोस घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना त्रास होणार नाही; ह्याची दक्षता घ्यावी; अशी मागणी निवेदनाद्वारे ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गने केली आहे.

सावंतवाडी तालुक्यात लसीकरण केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी आदल्या दिवशी संबंधितांना फोन करून बोलाविले जाते. त्यामुळे अनावश्यक गर्दी होत नाही आणि जनतेला त्रासही होत नाही. कणकवली कॉलेज लसीकरण केंद्रातही आदल्या दिवशी संबंधितांना फोन करून कळविल्यास दुसरा डोस घेणाऱ्यांची गर्दी होणार नाही. अशी जनतेतून मागणी होत आहे. `बुचडे’ नावाचा आरोग्य कर्मचारी चौकशी करण्यासाठी येणाऱ्या लोकांना उडवाउडवीची उत्तरे देतो, अशीही नाराजी अनेकांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.