निस्सीम राष्ट्रसेवेचे प्रतिक : कारगील विजय दिन……

लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर,
मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.

आम्ही शाळेत असतानाचा एक प्रसंग आजही आठवतो. पावसाळ्याचे दिवस होते. आम्हाला एक सर होते. ते नेहमी एक गीत गुणगुणत असत. ते गीत म्हणजे…
साँस थमती गयी, नब्ज जमती गयी,
फिर भी बढते कदम को, न रुकने दिया!
कट गये सर हमारे तो कुछ गम नही,
सर हिमालय का हमने न झुकने दिया!

त्यांनीच या गाण्याचा अर्थ सांगितला की, नुकतेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू – काश्मीर या राज्यातील कारगीलवरुन युद्ध झाले. त्यात भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर भारतीय सैनिकांनी २६ जुलै १९९९ रोजी पाकिस्तानच्या सैन्यावर मात करून भारतीय जवानांनी यश मिळवले आहे. हे यश मिळवत असताना प्रत्येक भारतीयांच्या ओठावर हे गाणे होते. आपण सर्वांनी या सैन्याचे सतत स्मरण करणे गरजेचे आहे. या युद्धातील प्रत्येक सैनिकांनी बजावलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तेंव्हापासून २६ जुलै कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो.

हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे आज २६ जुलै. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाला आज एकवीस वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या असंख्य अनाम वीरांनी आपले बलिदान देत या युद्धात भारताची मान उंचावली, त्यासोबतच घुसखोरीच्या माध्यमातून भारताला खिळखिळे करून भारताचा लचका तोडण्याच्या पाकिस्तानच्या मनसुब्यावर पाणी फिरवले. त्या समस्त भारतीय सैनिकांना आजच्या कारगिल विजय दिनानिमित्त मनःपूर्वक अभिवादन!

मुळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाची बीजे सन १९४७ ला झालेल्या फाळणीत आढळतात. तेंव्हापासून पाकिस्तानच्या वा तेथील सत्ताधाऱ्यांच्या वा तेथील व्यवस्थेच्या मनात भारताविषयी एक अनामिक अढी दिसून येते. ही अढी आजपर्यंत कायम आहे. याच अढीपोटी पाकिस्तान नेहमी भारताच्या कुरापती काढत असतो. त्याचाच एक भाग म्हणजे १९६५ चे युद्ध वा १९७२ चे युद्ध असो. त्यामध्ये नाहक काहीतरी मिळविण्याच्या नादात भारताशी पाकिस्तानने युद्ध केले. मात्र पहिल्यांदा स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री आणि दुसऱ्यांदा आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने दोन्ही युद्धात दिमाखात विजय मिळवला. तरीही पाकिस्तानचा युद्धज्वर काही कमी झाला नाही. याचाच एक भाग म्हणजे पंजाब असो वा काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानने अधिकृतरित्या वा अनधिकृतरित्या किंवा भारतातील काहिजनांच्या सहकार्याने सतत घुसखोरी केली. त्यामुळे भारताची मोठ्या प्रमाणात हानी होत होतीच. यावर कहर म्हणजे मे ते जुलै १९९९ यादरम्यान पाकिस्तानने आपल्याचं सैनिकांना मुजाहिद्दीनच्या रुपात घुसखोरी करायला लावली. त्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात झाला. युद्ध म्हणावे तसे दोन देशातील हे युद्ध नव्हते. कारण पाकिस्तानने सतत यापासून आपण वेगळे असल्याचा कांगावा केला. महत्वाचे म्हणजे भारताने या युद्धाच्या शेवटी जेव्हा भारताने वर्चस्व प्रस्थापित केले त्यावेळी भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच मर्यादित ठेवले.

काश्मीर मधील कारगिल, द्रास, बटालीक व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहेत. येथील हवामान – ४०℃ एवढे असते. त्यामुळे येथील अत्यंत विषम हवामानाच्या आणि कडक हिवाळ्यात दळणवळण वा इतर सुविधा पुरविणे अत्यंत कठीण बनत असल्याने याठिकाणी सैन्य उभे करणे कठीण बनायचे. अशावेळी १९७१ मधील शिमला करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक अलिखित करार झाला की, हिवाळा सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घ्यायची आणि हवामान थोडेसे स्थिर म्हणजेच मानवी जीवनास सुसह्य झाल्यानंतर आपापल्या ठरलेल्या चौक्यावर सैन्याने परत यावे. असा हा करार झाला. परंतु १९९९ च्या उन्हाळ्याच्या वेळी मात्र भारतीय सैन्य आपल्या चौक्यावर परत येण्यापुर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी या सर्व चौक्याचा ताबा घेतला. जानेवारीत १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर प्रचंड गोळीबार करायला सुरुवात केली. त्यामुळे भारतीय सैन्याचे लक्ष तेथे लागले. तोपर्यंत पाकिस्तानने याभागात घुसखोरी केली. या चौक्या म्हणजे किल्ल्यावरील माची सारख्या. त्यामुळे जो या चौक्यांचा वरील बाजूस त्याची युद्धाची बाजू भक्कम. म्हणून सुरुवातीला पाकिस्तानचे पारडे जड होते. हा ताबा पाकिस्तानी सैन्याने घेतल्याने जम्मू-काश्मीर मधील राष्ट्रीय महामार्ग त्यांच्या तोफांच्या टप्प्यात आला. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला. कारण हा महामार्ग ताब्यात घेऊन रसद तोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. १५० ते २०० चौरस किलोमीटरचा परिसरातील १३ ते १८ हजार फूट उंचीवरील जवळजवळ ३०० ठाणी पाकिस्तानने ताब्यात घेतली होती. म्हणजे त्यांच्यावर जाणेदेखील कठीण असताना पाकिस्तानने अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणात तोफखाना, दारुगोळा, आधुनिक शस्त्रास्त्रे, बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. यांच्या मदतीने घुसखोरांनी भारतीय अनेक सैनिक तर टिपलेच त्यासोबतच अनेक विमाने देखील पाडली. यावरून त्यांची सिद्धता दिसून येते. तसेच, चौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगानी भरून टाकला होता. तत्कालीन विचारवंताच्या मते एवढी मोठी तयारी पाकिस्तानने घुसखोरांच्या मदतीने केली आणि भारतीय सैन्याला वा भारतीय गुप्तचर खात्याला याचा पत्ता देखील लागला नाही हे अनाकलनीय आहे. मात्र काही विचारप्रवाहाच्या मते भारतीय गुप्तचर खात्याने हा इशारा दिला होता, मात्र त्या भागातील दळणवळण वा इतर बाबीसाठीची प्रतिकूल परिस्थिती पाहता पाकिस्तान इतकी मोठी घुसखोरी करेल अशी शंका लष्कर वा सरकारला आली नाही. त्यामुळे हा गोंधळ झाल्याचे उघड झाले. परिणामी पाकिस्तानी घुसखोर हे भारताच्या सीमारेषेच्या जास्तीत जास्त आत घुसयाचे, आणि अमेरिकेच्या मदतीने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन त्याठिकाणी हा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, तोपर्यंत स्थानिक पातळीवर भावनिक राजकारण करून लोकांना बंडखोरीस चालना देणे हे हेतू डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तानने जानेवारी महिन्यापासूनच ऑपरेशन बद्र चालवले. परंतु भारत सरकार, प्रशासन आणि लष्कर यांनी तात्काळ पाऊल उचलत याकामी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यात भारतीय भूदलाने ऑपरेशन विजय आणि वायूदलाने ऑपरेशन सफेद सागर हाती घेत संयुक्त कारवायांनी पाकिस्तानचा हा कुटील डाव हाणून पाडला. एक गोष्ट याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. ती अशी की, जर दरवर्षी सारखा हिवाळा मोठा झाला असता तर झोझीला खिंड मोकळी झाली नसती, परिणामी लष्कराला हालचाली करणे कठीण झाले असते. कारण मुख्य रस्त्याच्या एक किलोमीटरवर घुसखोर पोहचले होते. जर त्यांनी हा हमरस्ता ताब्यात घेतला असता तर खुप मोठी हानी भारताला सहन करावी लागली असती. मात्र पाकिस्तानच्या दुर्दैवाने हिवाळा लवकर संपला आणि लष्कराने देखील तात्काळ हालचाली करत जोरदार आक्रमण करत हा रस्ता आधी ताब्यात घेऊन चौक्याकडे जाणारा मार्ग मोकळा केला. हा भूभाग ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळविण्यासाठी पाकिस्तान अमेरिका, चीन यांच्या जोरावर धडपडत होता. परंतु पाकिस्तानचा हाच आक्रस्ताळेपणा त्यांच्या मुळावर उठला आणि त्यांनी पाकिस्तानला मदत करण्याचे नाकारले. या सर्व बाबीमुळे त्यांचे ऑपरेशन बद्र निष्प्रभ झाले. हवाई दलाच्या हल्ल्याने घुसखोरांना मिळणारी मदत थांबली. भुदलानेदेखील कडवा संघर्ष केला. ज्यावेळी भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे भारताच्या विरोधात होती. त्यावेळी भारताने दिवसा प्रतिकार करण्यापेक्षा रात्री प्रतिकार करण्यावर भर दिला. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून युद्धाचा कल भारताच्या बाजूने झुकला. दोन ते तीन आठवड्यात घुसखोरांना पिटाळून लावू अशी अपेक्षा भारत सरकारची होती. मात्र त्यासाठी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी गेला. अनेक जवान शहीद झाले, असंख्य विकलांग झाले. मात्र राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या जवानांनी आपल्या जीवाची बाजी लावून हा परिसर जिंकून घेतला. अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.

महामार्गाच्या जवळच्या चौक्यांपैकी भारतीय सैन्याला आक्रमणांत मदत करणारी टायगर हिल व तोलोलिंग शिखर भारताच्या ताब्यात आली आणि युद्धाचे रूप पालटले. यासोबतच बटालिक, तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागातील तर महामार्गालगतचा पॉईंट ४५९० तर या युद्धातील सर्वात उंच शिखर म्हणजे पॉइंट ५३५३ हीसुद्धा जिंकून घेतली. ज्यावेळी भारतीय सैनिक आपापल्या चौक्यांचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी या घुसखोरांनी पाच सैनिकांच्या निर्घृण हत्या केल्या होत्या. त्यामुळे चिडलेल्या भारतीय सैनिकांनी शेवटचा घुसखोर बाहेर काढेपर्यंत युद्ध सुरू ठेवले. भारताचे ५३७ जवान शहीद झाले तर पाकिस्तानचे ३००० घुसखोर ठार झाले. १४ जुलै रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र भारताच्या ज्या चौक्या पाकिस्तानने घुसखोरीने मिळवल्या होत्या. त्या सर्व चौक्या ताब्यात घेऊन तेथे भारताचा तिरंगा २६ जुलै रोजी फडकला. म्हणून २६ जुलै हा कारगील विजय दिन साजरा केला जातो.

सन १९६५ आणि १९७१ साली भारत – पाकिस्तान यांच्यात युद्धे झाली. ही दोन्ही युद्धे भारताने जिंकली. मात्र कारगिल युद्धावेळची परिस्थिती ही खूपच भिन्न होती. कारण प्रतिकूल हवामान, अत्यंत उंचावरील चौक्या, समोरून अत्याधुनिक शस्त्रांचा वापर, पूर्णपणे शत्रूच्या ताब्यात युद्धभूमी यामुळे हे युद्ध भारतीय सेनेसाठी एक नवे आव्हान ठरले होते. तरीही भारताच्या तिन्ही दलांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून पाकिस्तानला नामोहरम केले. यात भारतीय सैन्याची चिकाटी, ध्येयासक्ती, अजोड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती अभिमानास्पद होती. म्हणूनच जवळपास २०० किलोमीटरचा प्रदेश भारताच्या ताब्यात राहिला. या युद्धाचे परिणाम असे झाले की, भारताची सैन्याची शक्ती, तिन्ही दलातील सुसंवाद, खंबीर प्रशासन आणि संयमी नेतृत्व यांची ओळख जगाला झाली. त्याउलट ज्या पाकिस्तानने मुजाहिद्दीनींच्या रुपात पाठविलेल्या मृत सैनिकांना ताब्यात घ्यायला नकार दिला. त्यावेळी त्यांचेही दफन भारतीय सैनिकांनी केले. म्हणून भारतीय सैन्यांची मानवतावादी ओळख दृढ झाली.

थोडक्यात सांगायचे झाल्यास हे युद्ध पाकिस्तानच्या विघ्नसंतोषी वृत्तीमुळे त्यांच्यासाठीच आत्मघाती ठरले. पण एक बाब लक्षात घ्यावी लागेल की, ज्या गतीने पाकिस्तानने युद्धात आघाडी घेतली होती. त्यावरून त्यांचे पूर्वनियोजन दिसून येते. त्याहूनही भारताने त्यांच्यावर मिळविलेला विजय हा लक्षणीय आहे. भारताचे त्यावेळचे प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संयमी नेतृत्व दाखवतानाच भारतीय सैन्यावर दाखविलेला विश्वास महत्वाचा होता. या युद्धात अजून एक महत्वाची बाब म्हणजे भारतातील असंख्य असणाऱ्या सर्व पक्षीयांची एकजूट. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वांनीच याकामी एकी दाखवली.

आज या घटनेला २१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्या असंख्य वीरांना अभिवादन करताना नक्कीच त्यांचा पराक्रम पाहून प्रत्येक भारतीयांची मने प्रफुल्लित होतात. देशभर विविध ठिकाणी या राष्ट्रवीरांचे स्मरण करणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. आपण भारतीय या नात्याने या सर्वांचाच अभिमान बाळगला पाहिजे. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे हे सैनिक सीमेवर अखंड पहारा देतात. त्यामुळे आपण सर्वजण देशात सुरक्षित राहतो. कोणत्याही प्रकारच्या मान – सन्मानाची अपेक्षा नाही, मोठेपणाची हाव नाही, किंवा कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. सलग चोवीस तास एकाच ठिकाणी लक्ष्यावर नजर रोखुन हे सैनिक उणे तापमानात देशाची सेवा करत असतात. एकदा सीमेवर गेलेले सैनिक परत येतील की नाही याचीही तमा न बाळगता राष्ट्रसेवेसाठी तत्पर असतात. जात – पात – धर्म – भाषा यापलीकडे जाऊन मी भारतीय या एकाच नात्याने स्वतःला गुंफून घेत कार्य करणे हे आदर्शवत आहे. परंतु दुर्दैवाने याच देशात देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणारे सैनिक आहेत. मात्र त्याच देशात देशाला विकणारे, देशात राहून जाती – पातीच्या – धर्माच्या नावाने विभागणी करणारे, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचे नुकसान करणारे आहेत. काहीजणांना तर देशाचे सोडा गावाचेदेखील देणेघेणे नसते. त्यांना फक्त स्वतःची झोळी भरण्यातच धन्यता असते. असे विदारक चित्र असले तरीही भारतीय सैन्याने आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही. हीच सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. ज्याप्रमाणे सैनिक आपल्या ध्येयापासून किंचितही ढळत नाही त्याप्रमाणे या देशातील तरुणांनी देशाच्या भवितव्याचे ध्येय हाती घेतले पाहिजे.

भारतीय सैन्याचे महत्व सांगणारे एक विधान इतिहासात सापडते. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन यांना काहीजणांनी प्रश्न विचारला होता. भारताचे स्वातंत्र्य किती दिवस टिकणार? त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले की, जोपर्यंत भारतात पोस्ट, रेल्वे आणि भारतीय सैन्य आहे तोपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला आणि स्वातंत्र्याला कसलाही, कुणाकडूनही धोका नाही. १९९९ चे कारगीलचे युद्ध त्याचेच उदाहरण आहे.

पुन्हा एकदा या सर्व राष्ट्रविरांना मनःपूर्वक अभिवादन आणि सर्वांना कारगील विजय दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!