नुकसानीचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय
तातडीची सर्व मदत पुरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
रत्नागिरी दि. 25 :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना चिपळूण येथे सांगितले. वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्ह्याच्या स्तरावर याबाबत यंत्रणा उभारण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आले होते. त्यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव व मदत कार्य याबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सिताराम कुंटे, माजी मंत्री रविंद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.
उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडेलत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्दयांवर अडचणी येऊ नये यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत असेही ते म्हणाले. केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान तसेच गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर तसेच हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राकडून आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मागणी केली जाणार आहे.
बैठकीत आरंभी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी झालेल्या नुकसानीबाबत व बचाव कार्य आणि मदत याबाबतची माहिती बैठकीत सादर केली.
पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव आदी मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत होते.
साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका – महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो
“तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहोच फोडला. “आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा”, असा टाहोच एका महिलेने फोडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांचे आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.
यावेळी आमचं सर्व नुकसान झालं. आमचा माल भिजला. होतं नव्हतं सर्व गेलं. असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यावर तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.