अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराने ८ लाख परीक्षार्थींचे करोडोंचे नुकसान!

मानसिक, शारीरिक नुकसानाची मोजमाप कशी करणार?

“आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण ६२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये!” असे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २३ सप्टेंबर २०२१ रोजी ट्विटरद्वारे केले आणि २५ व २६ सप्टेंबर रोजी परीक्षा देणाऱ्या ८ लाख परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्यात.

त्यावेळी अनेक परीक्षार्थींनी सोशल मीडियाच्याद्वारे परीक्षेसंदर्भात होत असलेल्या अडचणी समस्या मांडल्या होत्या. एवढंच नाहीतर सदर परीक्षा घेण्यासाठी जेव्हा ‘न्यासा’ला कंत्राट दिलं गेलं तेव्हाही सदर कंपनीबाबत अनेकांनी आक्षेप नोंदविले होते; परंतु त्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष करून मंत्रालयात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी अगदी २५ सप्टेंबर रात्री १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत अतिविश्वास ठेवला आणि शेवटी आरोग्य मंत्र्यांना रात्रीच निवेदन करणं भाग पडलं.

“आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षा घेण्यासाठी नेमलेल्या ‘न्यासा’च्या अकार्यक्षमतेमुळे हा निर्णय घेतला. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करुन लवकरच परीक्षा घेण्यात येईल!” असे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी ट्विटरद्वारे केले. सदर परीक्षा आज आणि उद्या होणार होत्या.

८ लाख परीक्षार्थी होते, किमान प्रत्येकाचा सरासरी खर्च ५०० रुपये पकडला तरी ४० कोटी रुपयांचे नुकसान आणि किमान प्रत्येकाचा सरासरी खर्च १००० रुपये पकडला तरी ८० कोटी रुपयांचे नुकसान सुशिक्षित बेकारांचे झाले आहे. सदर कंपनीला ठेका देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून आणि सदर कंपनीकडून किमान ८० कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करून वसुली केली पाहिजे व ती रक्कम त्वरित परीक्षार्थींच्या खात्यात जमा केली पाहिजे!

सन्मानिय आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी हे करून दाखविले पाहिजे; अन्यथा राज्यकर्त्यांचा धाक नाही असे होईल आणि ८ लाख परीक्षार्थींचे सुमारे ४० लाख कुटुंबीय राज्यकर्त्यांना शिव्याशाप देतील!

८ लाख परीक्षार्थींचे आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झालेले आहे. त्यास जबाबदार कोण? आतातरी अपयशी आणि जनतेला जीवघेणा त्रास होणाऱ्या कारभाराविरुद्ध ठोस निर्णय व्हायलाच हवेत.

आरोग्य विभागाचा कारभार खरोखरच `राम भरोसे’ चालला आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार वर्ग -१ चे अधिकारी असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हे अधिकारी मंत्र्यांना अक्षरशः खोटी, दिशाभूल करणारी माहिती देतात आणि त्या माहितीच्या आधारे मंत्रीगण कारभार हाकत असतात. शेवटी अशी नामुष्की ओढवते आणि जनता मंत्र्यांनाच दोष देते. निवडणुकीला मंत्री सामोरे जातात अधिकारी नाही. म्हणूनच राज्यकर्ते म्हणून कठोर निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि ती जनेतला समजली पाहिजे.

You cannot copy content of this page