विशेष संपादकीय- राजकारणातील गँगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच!
राजकीय शत्रूला बंदुकीच्या गोळीने मारलं जातंय, पोलीस स्टेशनला गोळीबार केला जातोय आणि राजकारणातील गॅंगवॉर जोपासला जातोय. राजकीय शत्रूला थेट जाहीरपणे कॅमेरासमोर सांगितले जाते तुझा बाप’ वेगळाच आहे, तू असा दिसतोस- तू तसा दिसतोस… असा छिनालपणा केला जातोय. हे सगळं गलिच्छ आहे. ज्या महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हेतर जगात अभिमानाने घेतले जाते, त्या महाराष्ट्रात राजकारणातील गॅंगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच आहे. हा लोकशाहीचा खून आहे. लोकशाहीशी राजकारण्यांनी केलेला छिनालपणा आहे. हे सगळंच किडलंय, सडलंय! असं का घडतंय?
सर्वसामान्य जनता आज अनेक समस्यांनी ग्रासलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगारी वाढतेय, भ्रष्टाचाराला सामान्य मतदार वैतागलाय, आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे, गरीब आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही, कामगार मालकांच्या अरेरावीच्या दबावाखाली चिरडला जातोय; असे एक नाही हजारो प्रश्न-समस्या असून राजकारणात ह्या विषयांवर मार्ग काढण्यासाठी चर्चा आवश्यक असताना थेट गोळीबारी करून – छिनालपणा करून आजचे राजकीय नेते जनतेसमोर कोणता आदर्श निर्माण करीत आहेत? ही राक्षसी क्रूरता थांबणार कधी?
कोणी कोणाला मारले? कोणी कोणावर गोळीबार केला? कोणी कोणाला आईबहिणीवरून शिव्या घातल्या? हे महत्वाचे नसून जो काही राक्षसी प्रकार सुरु आहे तो थक्क करणारा आहे. राजकारणातील निर्माण होणारी अमाप संपत्ती हेच एकमेव कारण ह्या सगळ्यांसाठी आहे. हे वास्तव आहे. ह्याची जबाबदारी कोण घेणार?
लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी राजकारणातील गॅंगवॉर आणि छिनालपणा थांबलाच पाहिजे. ह्यासाठी सर्व राजकारण्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे. प्रशासनाने आणि न्यायालयांनी कोणाच्याही दबावाखाली न येता आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे; अशी अपेक्षा ठेवण्यापलीकडे आपल्या हातात काही नाही. सर्वसामान्य म्हणून मतदार राजा ह्या सगळ्या घाणेरड्या प्रकारांनी सुन्न झालेला आहे.
हेही वाचा!