युवा वर्गाने कोणत्याही चळवळीत समाविष्ट होताना विचार तपासून घ्यावेत!

गोपुरी आश्रमात युवा व्यक्तिमत्व सजग विचार शिबिराच्या सांगता कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मुलांना केले आवाहन!

कणकवली:- `युवकांनी देशाच्या सद्यस्थितीचा विचार करून कोणत्याही संघटनेत अथवा चळवळीत प्रवेश करताना ती चळवळ लोकशाही मूल्यांवर तपासून घेऊन त्या चळवळीत प्रवेश करावा. कोणत्याही चळवळीत भावनात्मक पातळीवर सहभागी होताना सजग विचार करावा.’ असे आवाहन विविध मान्यवरांनी गोपुरी आश्रमाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या व कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान आयोजित, युवा व्यक्तिमत्व विकास व सजग विचार शिबिराच्या समारोपप्रसंगी केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, ज्येष्ठ नागरिक संघ सिंधुदुर्गाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, रवींद्र मुसळे गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार विजय शेट्टी, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, संचालक अर्पिता मुंबरकर, निवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत राणे, समारोप सत्राचे अध्यक्ष राहूल नावरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहभागींना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांनी यांनी सांगितले की, बुद्धीबरोबर शरीरही मजबूत असणे गरजेचे आहे. विचार सकारात्मक हवेत. आयुष्यात जगण्यासाठी चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. स्वातंत्र्यानंतर मला माणसात देवच दिसत नाही. माणसाची प्रवृत्ती वाईट मार्गाकडे वाटचाल करते आहे. पण आपण जीवनाच्या मार्गावर जाताना माणूस म्हणून प्रवास करण्याचा प्रयत्न करा.

पत्रकार विजय शेट्टी म्हणाले की, तुम्ही तुमचा विचार पहिल्यांदा तपासून घ्या. मानवतेच्या आणि मानवाच्या कल्याणाचा विचार भविष्यात स्वीकारण्याचा प्रयत्न करा.वाचाळवीर न होता कृतीवीर व्हा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पहा. पैसा खूप मिळवा; पण तो चांगल्या मार्गाने मिळवा. आपले बौद्धिक आणि त्याबरोबर आर्थिक कल्याणही साधण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर चुकीचा विचार पसरवणाऱ्या संघटनांपासून अलिप्त राहा. माणूस बना आणि मनुष्यत्वाच्या विचारांचा पुरस्कार करा.

रवींद्र मुसळे गुरुजी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोणत्याही संघटनेचा संस्थेचा विचार तुमच्या पुढे आला तर तो विचार तपासून घ्या, त्याची तपासणी करा.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुर्तडकर यांनी सांगितले की, आप्पासाहेबांसारख्या युगपुरुषाच्या छत्राखाली तुम्ही प्रशिक्षण घेतले आहे. या युगपुरुषाच्या विचारांचे आचरण करा. आपल्या शरीरात आणि मनात भीमाची ताकद आणण्याचा प्रयत्न करून जीवन समृद्ध करा असे आवाहनही त्यांनी केले.

अर्पिता मुंबरकर यांनी सांगितले की, भविष्यात व्यसनमुक्त पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच आपण समजून घेतलेले महात्मा गांधी आणि आप्पा साहेबांचे विचार आपल्या परिसरातील शाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास हे मानवी कल्याणाचे विचार तळागाळात पोचविण्यास मदत होईल.

डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी शिबिरातील उपक्रमांची माहिती सांगितली. या शिबिरात महात्मा व गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचे विचार रवींद्रनाथ मुसळे गुरुजी आणि डॉक्टर दिलीप गरुड (पुणे) यांनी समजावून दिले. १) गांधी विचार कालबाह्य झाला आहे का? २) वाचन संस्कृती युवा विकासाची गुरुकिल्ली ३) गांधी व आप्पा यांचे विचार भविष्यातील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी कृती कार्यक्रम ४) `व्यसनमुक्त समाज आणि व्यसनमुक्त युवा’ या विषयांवर गटचर्चा घेण्यात आली. सहभागींनी या विषयांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले.

तसेच ‘छत्रपती संभाजी महाराज आणि युवा’ या विषयावर अमित राऊळ यांनी मार्गदर्शन केले. ‘व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी युवकांची सजगता’ या विषयावर अर्पिता मुंबरकर यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात ‘वाचन संस्कृती विकासातून आम्ही घडत आहोत’.या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. त्यामध्ये सिद्धी वरवडेकर, पल्लवी कोकणी, भाग्यश्री घोगळे, तेजश्री आचरेकर यांनी सहभाग घेऊन वाचन संस्कृतीच्या माध्यमातून आपले विचार प्रगल्भ होण्यासाठी कसे सहाय्यभूत होत आहेत, याचे उपस्थित सहभागींना मार्गदर्शन केले.

या शिबिरात १६ युवती व १५ युवक मिळून ३१ युवा- युवतींनी सहभाग घेतला.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, सहव्यवस्थापक बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे यांनी विशेष मेहनत घेतली. सहभागींनी शिबिरामुळे आपल्या विचारात सजगता येण्यासाठी मदत झाल्याचे समारोपाच्या अनुभव कथनात मत प्रकट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *