नए विचारों से नया भारत जोडो ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच हजार विद्यार्थ्यांशी साधला संवाद

मुंबई:- ‘अशिक्षा, असंस्कार, अनाचार छोडो, नये विचारोसे नया भारत जोडो’,असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरूणाईला दिला आहे. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली तरी देशांतर्गत परिस्थिती उत्तम असून येत्या तीन ते सहा महिन्यात देश आर्थिक प्रगतीत पुन्हा आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांसमोर त्यांनी देशातील युवा पिढीकडून असलेल्या अपेक्षांची मांडणी केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची दिलखुलास उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक श्री.लुईस यांच्या समवेत राष्ट्रगीत गायले तर शेवटी ‘राष्ट्र विजयी हो हमारा’ ही कविता म्हणून विद्यार्थ्यांची मनं जिंकली. आय.आय.एम.यू.एन. (इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स) द्वारे आयोजित इंडीयाज इंटरनॅशनल मुवमेंट फॉर युनाईट नेशन्स या कार्यक्रमात ते बोलत होते. या संस्थेचे संस्थापक रिषभ शहा यावेळी उपस्थ‍ित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती ही सर्वांना सामावुन घेणारी आहे, ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आपली संस्कृती आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या आपल्या सुप्रसिद्ध भाषणात याचीच महती सांगितली होती. हाच विचार तरूणांमार्फत विश्वात पसरविण्यासाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरणार आहे. सध्या आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या ही तरूणांची आहे. या तरूण लोकसंख्येचा उपयोग मानव संसाधन म्हणून करणे आवश्यक आहे. यापूर्वी युरोप, जपान, कोरिया आणि चीन या देशांना त्यांच्या देशात असलेल्या तरूणांच्या या लोकसंख्येचा फायदा घेता आला आहे. आपला देश पाच ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. त्यात राज्याने हे एक ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट ठेवले आहे. यात मुंबईची मोठी भूमिका असणार आहे. हे करत असतांना राज्यातील ४० हजार गावांमध्ये विकास करायचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणातूनच हे साध्य होणार आहे. त्यासाठी लागणारं कौशल्य प्रशिक्षणही आवश्यक आहे.

स्वतःच्या उद्धाराबरोबरच समाजातील एका तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची जबाबदारी आजच्या प्रत्येक युवकाने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी उपस्थ‍ित विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांवरील प्रश्नांना श्री. फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिली.

देशात अधिकृत प्रवेश घेणाऱ्यांचे स्वागतच, पण..

भारतात आलेल्या काही लोकांचे नागरिकत्व रद्द केल्यासंदर्भातही एका विद्यार्थीनीने यावेळी प्रश्न विचारला, तिला उत्तर देताना एन आर सी अंतर्गत केल्या गेलेल्या कारवाई बद्दल बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले, देशात अधिकृतपणे प्रवेश घेऊन येणाऱ्या नागरिकांचे देश नेहमीच स्वागत करतो, मात्र अनधिकृतपणे देशात येऊन देश विघातक कृत्य करणाऱ्यांना देशात थारा नाही.

आर्थिक मंदी आणि राज्याची परिस्थ‍िती

जगभरात आर्थिक मंदी आलेली असतांना तरुणांनी मुख्यमंत्र्यांचं याविषयावरचं मत जाणून घेणं महत्वाचं माणलं त्यांच्या या विषयावरच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात आणि राज्यात उद्योगस्नेही धोरण आखण्यात आले आहे. नविन आणि सर्वंकष अशी टॅक्स प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. बॅन्क साल्व्हन्सी प्रणालित सुधारणा करून त्यातील अडचणी दूर करण्याबरोबरच पारदर्शकता आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे राज्यातील आर्थिक परिस्थिती आटोक्यात असून येत्या तीन ते सहा महिन्यात देश आर्थिक क्षेत्रात पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरे येथील वृक्षतोड

पर्यावरण संवर्धन हा तरुणाईचा आवडता विषय. त्यासंदर्भातील चर्चेत असणारा प्रश्न म्हणजे आरे येथे मेट्र्रोच्या कामांसाठी होत असलेली वृक्ष तोड, त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे, न्यायालयानेही शासन करीत असलेली कामे योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. जे वृक्ष तोडले जात आहेत ते जंगल नाही. मुंबईत चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे कार्बन फुट प्रिंट एवढे जास्त आहे की या प्रदुषणामुळे होणारी हानी जर आपल्याला भरून काढायची असेल तवृक्ष र किमान दोन कोटी वृक्ष आपल्याला मुंबईत लावावे लागतील जे शक्य नाही, त्यामुळे मेट्रो आल्याने हे कार्बन फुटप्रिंट कमी होणार आहे. त्याचबरोबर जेवढ़े तोडले जातात तेवढेच पुन्हा रोपण करण्यात येत आहेत. विकास आणि पर्यावरण या दोन्हीचा समतोल राखण्यात येत आहे.

पालकांची पसंती ही शासकीय शाळेपेक्षा खासगी शाळेकडे का आहे, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेतला. सन २०१४ मध्ये राज्याचे रॅंकीग १८ व्या क्रमांकावर होते, गेल्या पाच वर्षात शालेय शिक्षण विभागाने शासकीय विद्यालयांचे डिजिटलायजेशन केले शिक्षकांना प्रशिक्षित केले. त्यामुळे शासकीय शाळांकडे विद्यार्थी परतू लागले आहेत आता राज्याचे रॅंकिग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मिशन मुस्कान

ह्युमन ट्रॅफिकींग करून भीख मागणारे मुलं या विषयावर चिंता व्यक्त करणाऱ्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. फडणवीस म्हणाले, रेल्वे स्टेशनवर येणारी सुमारे २० हजार मुलं ही पालकांकडे परत नेऊन देण्यात मिशन मुस्कान अंतर्गत पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे देशातील हजारो मुलं ही ह्युमन ट्रॅफिकींग पासून वाचली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेचे हे यश आहे.

आय.आय.एम.यू.एन ही एक युवकांची संघटना आहे ज्यामध्ये सुमारे सव्वीस हजार युवा कार्यरत आहेत. २२ देशातील १६० शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतातील सुमारे साडेसात हजार शाळांमधील दहा लाख विद्यार्थ्यांचे हे सगळ्यात मोठे ऑफलाईन सोशल नेटवर्क आहे.

You cannot copy content of this page