भावी काणेकर हिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या काव्यसंग्रहाचे कौतुक करण्यात आले.
भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आई वडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन दिले आहे. अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रजीमध्ये कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असुन तो ऑनलाइन उपलब्ध झालेला आहे.
यावेळी भावी काणेकर हिच्या मार्गदर्शिका उर्मी कुडतरकर ह्यांनी भावीच्या लिखाणाचे व तिच्या क्षमतेचे कौतुक केले. तिच्या शिक्षिका अनुपमा राठी ह्यांनी भावीच्या कवितांतील सामाजिक भान, पर्यावरण व निसर्गाची जाण व तिच्या कल्पनेची भरारी पाहून आपण कसे अचंबित झालो ते सांगितले. सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांना अभ्यासाव्यतिरिक्त आवडत्या छंदांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तर प्रकाशक विवेक मेहेत्रे ह्यांनी ह्या कवितासंग्रहाची वैशिष्ट्ये, छपाईचा प्रवास सांगून हे पुस्तक डिजिटल स्वरूपात किंडलवर तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट या वेबसाइटवरही खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. ठाण्यातील वाविकर आय इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालिका डॉ. वैशाली वावीकर ह्यांनी अध्यक्षपदावरुन बोलताना ‘भावीच्या इंग्रजी कविता का व कशा वेगळया आहेत’ ह्याचे प्रतिपादन केले. हसत-खेळत संपन्न झालेल्या या प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. हेमा काणेकर यांनी तर आभार मंदार काणेकर यांनी मानले.