चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ६ ते ८ जानेवारी २०२५ या कालावधीत दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा, ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली.

या बालमहोत्सवात जिल्ह्यातील कार्यरत बालगृहातील प्रवेशीत बालके, तालुकास्तरावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनावर कार्य करणाऱ्या संस्थामधील काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके व स्थानिक शाळामधील मुले, मुली सहभागी होतील. यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, उंच व लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो-खो, रिले, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.

या कार्यक्रमासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोकण विभागाचे महिला व बाल विकास, विभागीय उपआयुक्त श्रीमती.सुवर्णा पवार, सावंतवाडीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष श्रीमती जे. एम. मिस्त्री, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती. एस. के. कारंडे, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी श्रीमती.कविता शिंपी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अँड. संदेश तायशेटे, बाल कल्याण समितीचे सदस्य अँड. अरुण पणदूरकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अँड. श्रीमती. नम्रता नेवगी, बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. अमर निर्मळे, बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. श्रीमती. माया रहाटे, बाल न्याय मंडळ सदस्य श्रीमती. कृतिका कुबल, पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ, वेताळ बांबर्डे विभाग संस्था अध्यक्ष रघुनाथ गावडे, पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था सचिव नागेंद्र परब आदी उपस्थिती राहणार आहेत.